आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना थेट तुरुंगवास

बुधवार, 22 एप्रिल 2020 (22:01 IST)
आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे आता कोणीही आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास त्यांना तुरुंगवास आणि आर्थिक दंड सोसावा लागू शकतो, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की, कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी देशाला वाचवण्याचे काम करत आहेत. अशावेळी त्यांच्यावर हल्ले होणे ही गोष्ट दुर्दैवी आहे. मात्र, आता ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर अध्यादेश जारी केला आहे.  
 
त्यानुसार एखाद्या हल्ल्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना गंभीर इजा झाल्यास संबंधित व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. तसेच त्यांना एक ते पाच लाखांपर्यंत आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो. यासाठी साथ रोग नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात आल्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर ३० दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल. यानंतर संबंधित व्यक्तीला तुरुंगावस आणि आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती