IndvsEng : आर. अश्विनच्या यशाचं नेमकं कारण काय? स्पिन की वेग?
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (19:18 IST)
मनोज चतुर्वेदी
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारतासाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
या त्रिकूटाने दुसऱ्या कसोटी सामन्यात 20 पैकी 17 गडी बाद केले. दुसऱ्या डावात भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडचे सर्वच फलंदाज बाद केले.
या सामन्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंची कामगिरीसुद्धा लक्षवेधी ठरली. जॅक लीच आणि मोईन अली यांनी मिळून दोन्ही डावांत भारताचे एकूण 14 बळी घेतले. जो रुटला धरल्यास एकूण 15 विकेट इंग्लंडच्या फिरकीपटूंनी घेतले.
हे पाहिलं तर चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघांच्या फिरकीपटूंना चांगलं यश मिळाल्याचं दिसून येईल. पण तरीही इंग्लंडने फक्त चारच दिवसांत हा सामना कसा गमावला?
खरं तर भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फिरकीपटूंच्या तुलनेत जास्त वेगाने आणि विविधतेने गोलंदाजी केली. क्रिकेटमध्ये फिरकीपटूंना परिस्थितीनुरूप आपल्या गोलंदाजीच्या वेगात बदल करावे लागतात.
भारतीय स्पिन गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विनला या कलेत पारंगत समजलं जातं. आश्विन परिस्थितीप्रमाणे ताशी 80 ते 90 प्रति कि.मी. वेगाने गोलंदाजी करतो.
खेळपट्टी चांगली आणि वेगवान असेल तर कमी वेगाने गोलंदाजी करण्याची आवश्यकता असते. तर फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर वेगाने गोलंदाजी करण्याची गरज असते.
चेन्नई कसोटीत इंग्लंडच्या जॅक लीच आणि मोईन अली या दोन्ही फिरकीपटूंनी गोलंदाजीची गती भारतीय गोलंदाजांप्रमाणेच ठेवली. पण गतीत बदल न केल्याने त्यांची गोलंदाजी खेळून काढण्यात भारतीय फलंदाजांना फारशी अडचण आली नाही.
याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिलं नाही.
सहा ते आठ इंचांचा फरक
भारतीय संघाचे माजी फिरकीपटू मनिंदर सिंह यांनी याबाबत सांगितलं, "गोलंदाजीच्या टप्प्यावरून दोन्ही संघांच्या फिरकीपटूंमधील फरक दिसून आला. भारतीय फिरकीपटूंना घरगुती मैदानांवरील खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे. त्यांना याठिकाणी किती वेगाने गोलंदाजी करावी, याची कल्पना आहे.
टर्निंग खेळपट्टीवर टप्पा सहा ते आठ इंच पुढे ठेवल्यास फलंदाजांना अडचणीत टाकता येऊ शकतं, हे भारतीय गोलंदाजांना माहिती होतं."
मनिंदर सिंह यांच्या मते, "टर्निंग खेळपट्टीवर गोलंदाजी करणं ही एक कला आहे. या कलेत इंग्लंडचे फिरकीपटू थोडे कमी पडले."
अक्षरच्या वेगाने रोखले स्वीप शॉट
अक्षर पटेल आपल्या पदार्पणाच्या सामन्यातील दुसऱ्या डावात पाच विकेट घेऊन हा सामना अविस्मरणीय केला.
उंची आणि गोलंदाजीच्या वेगामुळे मिळालेलं अक्षरला हे यश मिळाल्याचं संजय मांजरेकर यांना वाटतं.
इंग्लंडचे फलंदाज भारतीय उपखंडात आल्यानंतर फिरकीविरुद्ध स्वीप शॉट हे शस्त्र वापरतात. पण अक्षरच्या चांगल्या वेगामुळे त्यांना हा शॉट खेळण्यात अडचणी आल्या.
अश्विनसमोर स्वीप शॉट मारण्याची मोकळीकही मिळू शकत नाही. आश्विन हा अत्यंत चतुर गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
या सर्वांत कुलदीप यादवचा वेग सर्वात कमी आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळताना इंग्लंडच्या फलंदाजांना फारशा अडचणी आल्याचं दिसलं नाही. पण त्यालाही दोन गडी बाद करण्यात यश आलं.
संघातली जागा पक्की करणं अक्षरला अवघड
चेन्नई कसोटीत पदार्पणातच दिमाखदार कामगिरी करणाऱ्या अक्षरची जागा संघात आता पक्की झाली, असं म्हणता येईल का?
मला वाटतं, कसोटी संघातली आपली जागा पक्की करण्यासाठी अक्षरला आणखी मेहनत करावी लागेल.
अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा जखमी झाल्याने अक्षर पटेलला संधी मिळाली होती. जडेजा परतताच त्याचं संघात पुनरागमन होईल. जडेजा फक्त अनुभवी फिरकीपटू नसून फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो सरस आहे.
मनिंदर सिंह यांच्या मते, "भारतीय संघाला रविंद्र जडेजासाठी एक चांगला पर्याय मिळाला, असं म्हणता येऊ शकतं. पण त्यासाठी अक्षरला कामगिरीत सातत्य राखावं लागेल. त्याला आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर तो कशी गोलंदाजी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे."