लतिफा : दुबईच्या गायब झालेल्या राजकन्येच्या प्रकरणातला नवा 'ट्विस्ट' काय आहे?
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (19:00 IST)
दुबईच्या शासकाची मुलगी लतिफा अल मक्तूम 2018 मध्ये आपल्या देशातून पळ काढत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर लतिफा यांनी मित्रांना एक व्हीडिओ संदेश पाठवला. आपल्या वडिलांनी 'ओलीस' ठेवल्याचा आरोप केला आणि आपला जीव धोक्यात असल्याचेही सांगितले.
राजकुमारी लतिफा यांच्या या व्हीडिओचे फुटेज बीबीसी पॅनोरमाच्या हाती लागले आहे. बोटीतून पळून जात असताना कमांडोंनी पकडले असून त्यांना तुरुंगात आणले आहे असं त्या व्हीडिओमध्ये लतिफा सांगत आहेत.
लतिफा यांच्याकडून आता मात्र गुप्त संदेश येणं बंद झालं आहे. यामुळे तिच्या मित्रांनी संयुक्त राष्ट्र संघाला याप्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) लतिफा कुटुंबासोबत असून सुरक्षित असल्याचं यापूर्वीच सांगितलं आहे.
2018 मध्ये लतिफाची भेट घेतल्यानंतर तिला 'अस्वस्थ तरुणी' म्हणणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी मानवाधिकार दूत मेरी रॉबिन्सन यांनी आता राजकन्येच्या कुटुंबीयांनी तिचा 'मोठा विश्वासघात' केला आहे असं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवी हक्क उच्चायुक्त आणि आयर्लंडचे माजी अध्यक्ष रॉबिन्सन यांनी लतिफाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.
त्या म्हणाल्या, "मला सतत लतिफाची काळजी वाटते. परिस्थिती फार बदलली आहे आणि आता मला वाटते याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे."
लतिफाचे वडील शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम हे जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रप्रमुखांपैकी एक आहेत. ते दुबईचे शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आहेत.
लतिफाला पकडल्यानंतर त्यांना दुबईला नेण्यात आलं. अनेक महिने त्यांनी गुप्तपणे व्हीडिओ बनवले. त्या आपल्या बाथरूममधून व्हीडिओ बनवत होत्या. कारण हीच एकमेव जागा होती ज्याठिकाणी दरवाजा बंद करता येणं शक्य होतं.
या व्हीडिओ संदेशांमध्ये त्या सांगतात-
आपल्याला बोटीतून बाहेर काढत असताना सुरक्षा दलांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी एका अमिराती जवानाला 'लाथ मारली आणि संघर्ष केला' आणि तो किंचाळत नाही तोपर्यंत त्याचा चावा घेतला.'
मशीनमधून विजेचा झटका देण्यात आला आणि त्या बेशुद्ध झाल्या. एका खासगी विमानातून त्यांना दुबईला नेण्यात आले.
दरवाजा आणि खिडक्या बंद असलेल्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. खोलीबाहेर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य आणि कायदेशीर मदत दिली गेली नाही.
लतिफा यांची मैत्रिण टीना जोहाएनन, मामे भाऊ मार्कस एसाबरी आणि डेविड हाए यांनी लतिफाला पकडण्यात आले असून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती बीबीसीला दिली. या सर्वांनी लतिफाची सुटका व्हावी यासाठी एक मोहीम सुरू केली आहे.
लतिफाच्या सुरक्षेसाठी त्यांनी पाठवलेले व्हीडिओ संदेश सार्वजनिक करण्याचा आव्हानात्मक निर्णय त्यांनी घेतला असल्याचं ते सांगतात.
याच लोकांनी दुबईतील एका घरात राहत असताना लतिफाशी संपर्क साधला होता.
लतिफाला कुठे ठेवण्यात आले होते याचा तपास पॅनोरमाने स्वतंत्रपणे केला.
कोण आहेत दुबईचे शासक ?
शेख मोहम्मद यांनी एक अतिशय यशस्वी शहर उभारले आहे. पण त्यांच्या शहरात असहमतीला स्थान नाही आणि न्यायव्यवस्था ही स्त्रियांविरुद्ध भेदभाव करणारी आहे, असं मानवाधिकार कार्यकर्त्यांचे मत आहे.
शेख मोहम्मद यांचा घोड्यांच्या शर्यतीचा मोठा उद्योग आहे. ते राजघराण्यांसह इतर शाही सोहळ्यांमध्येही उपस्थित राहतात. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबतही त्यांचा फोटो आहे.
राजकन्या लतिफा आणि त्यांच्या सावत्र आई यांच्यासंदर्भात शेख मोहम्मद यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांची पत्नी हया बिंत अल हुसैन 2019 मध्ये आपल्या दोन मुलांसह लंडनला पळून गेली.
पळून जाण्यासाठी बोटीचा मार्ग
लतिफाने (35) पहिल्यांदा वयाच्या 16 व्या वर्षी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वेळेस आपला फिटनेस प्रशिक्षक जोहाएननच्या मदतीने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
24 फेब्रुवारी 2018 रोजी लतिफा आणि जोहाएनन हे एका बोटीसह जेट स्की घालून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर पोहचले. याठिकाणी फ्रेंच व्यावसायिक हर्व जॉबर्ट अमेरिकन झेंडे लागलेल्या यॉटमध्ये त्यांची वाट पाहत होते.
आठ दिवसांचा प्रवास केल्यानंतर भारताजवळ पोहचल्यानंतर कमांडो पथकाने बोट ताब्यात घेतली. जोहाएनन सांगतात की, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे लतिफा बाथरूममधून बाहेर आली. बंदुकीचा धाक दाखवत त्यांना पकडण्यात आले.
लतिफा दुबईला पोहचली आणि यानंतर त्यांचा काहीच पत्ता नाही.
जोहाएनन यांना दुबईत दोन आठवडे ताब्यात ठेवले होते. इतर काही लोकांना सोडून देण्यात आले.
भारत सरकारने या संपूर्ण घटनाक्रमात आपला सहभाग होता किंवा नाही याबाबत अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2018 मध्ये लतिफा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एक व्हीडिओ रेकॉर्ड केला होता. पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला. यात त्या सांगतात, "हा व्हीडिओ तुम्ही पाहत आहात असाल तर याचा अर्थ चांगला नाही. कारण एकतर माझा मृत्यू झाला आहे किंवा मी अत्यंत वाईट परिस्थितीत आहे."
याप्रकरणाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता व्यक्त करण्यात आली. त्यांना सोडण्याची मागणीही केली गेली. संयुक्त अरब अमिरातीवर दबाव आल्यानंतर त्यांनी रॉबिन्सनला भेटण्याचा निर्णय घेतला.
रॉबिन्सनची भेट
राणी हयाच्या निवदेनानंतर रॉबिन्सन डिसेंबर 2018 मध्ये दुबईला आल्या. दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने त्यांची भेट लतिफाशी झाली.
रॉबिन्सन यांनी पॅनोरमाला सांगितले की, राणी हया यांनी लतिफा यांना बायपोलरचा आजार असल्याचे सांगितले पण त्यांना तो आजार नव्हता.
आपण लतिफाची चौकशी केली नव्हती कारण त्यांना 'आणखी धक्का' द्यायचा नव्हता.
या घटनेच्या नऊ दिवसांनंतर संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुरावा म्हणून रॉबिन्सनसोबत लतिफाचा फोटो प्रसिद्ध केला आणि राजकन्या सुरक्षित असल्याचे सांगितले.
रॉबिन्सन यांनी सांगितले, "फोटो सार्वजनिक करण्यात आल्यानंतर मला कळाले की माझी फसवणूक झाली आहे. ही घटना धक्कादायक होती आणि मी पूर्णपणे अवाक् झालो."
2019 मध्ये दुबईच्या सत्ताधारी कुटुंबातील आणखी एक वाद इंग्लंडमधील उच्च न्यायालयापर्यंत पोहचला. शेख यांची पत्नी राणी हया आपल्या दोन मुलांसह यूकेमध्ये पळून गेली आणि शेखपासून संरक्षणासाठी त्यांनी अर्ज केला.
गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती शोध आदेश जारी करत शेख मोहम्मद यांनी 2002 आणि 2018 मध्ये लतिफा यांना बळजबरीने आणण्याचा आदेश दिला होता. 2000 मध्ये ब्रिटनमध्ये लतिफाची धाकटी बहीण राजकन्या शमसा हिचेही अपहरण केले होते. त्यांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
न्यायालयाला आढळले की शेख मोहम्मद यांनी 'कायम असे शासन केले ज्याठिकाणी दोन तरुण मुलींना आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यात आले.'
लतिफा यांचा व्हीडिओ संदेश सार्वजनिक करताना जोहाएनन यांनी सांगितले की, त्यांच्याशी संपर्क होऊन आता बराच काळ झाला आहे. हे व्हिडिओ जारी करण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केला.
त्या सांगतात, "लतिफा यांची इच्छा असावी की आपण त्यांच्यासाठी लढा देऊ आणि हार मानू नये असे मला वाटते."
लतिफा यांच्या सद्यस्थितीबाबत बीबीसीने दुबई आणि संयुक्त अरब अमिराती सरकारकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.