पी. व्ही. सिंधू ठरली 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर'
सोमवार, 9 मार्च 2020 (10:59 IST)
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पहिल्यावहिल्या 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराची मानकरी ठरली. राजधानी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात सिंधूची या पुरस्कारासाठी घोषणा झाली. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि बीबीसीचे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
2019मध्ये पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा झाली होती.
"मी बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर टीमचे आभार मानते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. बीबीसी इंडियानं सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसंच माझ्या चाहत्यांचेही आभार मानते," पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिंधून तिच्या भावना व्यक्त केल्या.
आतापर्यंत 5 वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक पी. व्ही. सिंधूच्या नावावर जमा आहेत. तसंच ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
"हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करते, जे सदैव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, त्यांनीच मला भरभरून मतं दिली आहेत. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर या पुरस्कारानं आम्हाला अजून पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. सगळ्या तरुण महिला खेळाडूंना माझा संदेश आहे की, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. कठीण परिश्रम ही यशाची गुरुकुल्ली आहे. भारतीय महिला खेळाडू लवकरच देशाला अनेक पदकं मिळवून देतील, याचा मला विश्वास आहे."
2012मध्ये वयाच्या 17व्या वर्षी सिंधूनं जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या अव्वल 20मध्ये स्थान पटकावलं. शेवटच्या 4 वर्षांमध्ये ती पहिल्या 10मध्ये होती. बिनतोड स्मॅशचा ताफा ताब्यात असलेल्या सिंधूकडून भारतीयांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रचंड अपेक्षा आहेत.
भारतीय खेळातील उल्लेखनीय कामगिरी आणि त्याद्वारे अनेक पिढ्यांना प्रेरित केल्याबदद्ल प्रसिद्ध क्रीडापटू पी.टी.उषा यांना जीवनगौरव अचिव्हमेंट अवार्ड देण्यात आला.
सगळ्या संकटांना तोंड देऊन पी.टी. उषा यांनी 100हून अधिक आंतरराष्ट्रीय पदकं कमावली. Indian Olympics Associationनं त्यांना शतकातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हमून सन्मानित केलं आहे. 35 वर्षांपूर्वी पी. टी. उषा यांचं ऑलिम्पिकचं पदक एका शतांश सेकंदाने हुकलं. 1984च्या लॉस एंजिलिसच्या स्पर्धेत 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी फेब्रुवारी महिन्यात 5 महिला खेळांडूंचं नामांकन करण्यात आलं होतं.
यामध्ये धावपटू द्युती चंद, मानसी जोशी, बॉक्सिंगपटू मेरी कोम, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि कुस्तीपटू विनेश फोगट या पाच खेळाडूंचा समावेश होता. या 5 महिला खेळाडूंची निवड देशभरातल्या क्रीडा पत्रकारांनी केली.
3 फेब्रुवारी 2020ला मतदान सुरू झालं आणि सोमवारी 24 फेब्रुवारीला मतदान संपलं.