गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:44 IST)
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रुपाणी यांनी आपलं राजीनाम्याचं पत्र सोपवलं.राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांनी माध्यमांशी संवादही साधला.
 
राजीनाम्यासाठी कुणाचाही दबाव नव्हता. मी माझ्या मर्जीने राजीनामा दिला आहे, आता संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद," असं रुपाणी यावेळी म्हणाले.
"संघटनेतील कुणासोबतच माझी तक्रार नाही.आम्ही संघटनेत एकत्र मिळूनच काम केलेलं आहे. नवं नेतृत्व तयार करण्याची भारतीय जनता पक्षात परंपरा आहे,"असं रुपाणी यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, "गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीत भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला. यामुळे मला काम करत राहण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली.पक्षासह जनतेचं आतापर्यंत मला मोठं सहकार्य मिळालं."
 
"लसीकरणाच्या कार्यक्रमातही गुजरात पुढे राहिला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रशासनाला जाणून घेण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. जे पी नड्डा यांचंही सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. गुजरातच्या नव्या नेतृत्त्वाला माझं कायम सहकार्य लाभेल," असं रुपाणी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती