नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट नोटीस
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (13:46 IST)
नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.एका खासगी कंपनीचं कर्ज थकवल्याप्रकरणी पोलिसांनी ही नोटीस पाठवल्याचं वृत्त मिळाले आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीच्या कर्ज प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.कंपनीनं 65 कोटींचं कर्ज थकवल्या प्रकरणी नीलम आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दिली होती.
DHFL कडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. नीलम राणे या कर्जासाठी सहअर्जदार होत्या.
तसंच, नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठीही 40 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं आहे.त्यापैकीदेखील जवळपास 34 कोटींची थकबाकी असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी नोटीस जारी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील हे पत्र पाठवण्यात आलं आहे.तक्रारीनंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नोटीस जारी केली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.