जिनीलिया झळकणार 'या' मराठी सिनेमात, फर्स्ट लूक जाहीर करताना म्हटलं...

गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (15:13 IST)
जिनीलिया देशमुखला आपण केवळ हिंदीच नाही, तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळी भाषांमधील चित्रपटांमधून काम करताना पाहिलं आहे. पण आता जिनीलिया मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
 
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर जिनीलियाने तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचं पोस्टर आणि फर्स्ट लूक तिच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे.
 
या सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असेल. रितेशने यापूर्वी 'लय भारी' आणि 'माऊली' या मराठी सिनेमांमधून काम केलं आहे... पण आता रितेश केवळ अभिनेत्याच्याच भूमिकेत नाहीये, तर या चित्रपटाचा तो दिग्दर्शकही आहे.
 
रितेश-जिनीलियाच्या सिनेमाचं नाव आहे 'वेड'.
 
सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना रितेश आणि जिनीलियानं म्हटलं आहे, 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो, पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे.'
 
"दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला.
 
तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या."
 
'एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय'
आपल्या ट्विटरवरून जिनीलियाने या चित्रपटासंबंधीच्या आपल्या भावनाही शेअर केल्या आहेत.
 
तिने म्हटलं आहे की, "माझा जन्म महाराष्ट्रातलाच. मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले. तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं.
 
रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतीये. मराठीत काम करतांना मला एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय."
 
तुम्ही मराठीतही मला तितकंच प्रेम द्याल ही खात्री आहे, असंही जिनीलियाने म्हटलं आहे.
 
जिनीलियाचं करिअर
मुंबईतल्या मंगलोरियन कॅथलिक कुटुंबात वाढलेल्या जिनीलियानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'तुझे मेरी कसम' मधून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं होतं. रितेश देशमुखचाही हा बॉलिवूड डेब्यू होता.
 
पुढच्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मस्ती' सिनेमातही पुन्हा एकदा रितेश आणि जिनीलिया एकत्र झळकले होते.
 
दरम्यानच्या काळात तिनं तेलुगू आणि तमीळ सिनेमातही काम करायला सुरूवात केली होती. धनुष, अल्लू अर्जुन, सिद्धार्थ, ज्युनिअर एनटीआर, जयम रवी अशा दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत जिनीलियानं भूमिका साकारल्या.
 
2006 ते 2008 या काळात तिनं साउथमध्ये हॅपी, बोमारिल्लू, रेडी, धी, चेन्नई कढाल असे चित्रपट केले.
 
2008 मध्येच तिनं बॉलिवूडमध्ये 'जाने तू या जाने ना' हा हिट सिनेमा दिला.
 
त्यानंतर तिने तेरे नाल लव्ह हो गया, लाइफ पार्टनर, फोर्स, चान्स पे डान्स असे चित्रपट केले.
 
फेब्रुवारी 2012 मध्ये जिनीलिया रितेश देशमुखसोबत विवाहबद्ध झाली.
 
लग्नानंतर तिनं जय हो, लय बारी, फोर्स 2 अशा चित्रपटांतून कॅमिओ रोल केले.
 
2018 साली रितेश देशमुखचा माऊली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जिनीलिया या सिनेमाची निर्माती होती.
 
रितेश आणि जिनीलियाचा स्वतःचा एक फूड ब्रँड आहे. 'इमॅजिन मीट्स' असं या ब्रँडचं नाव आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती