फडणवीस सरकारनं गुजरातमधील कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द

गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (10:48 IST)
राज्य सरकारनं तत्कालीन भाजप सरकारच्या काळात गुजरातमधील कंपनीला दिलेलं कंत्राट रद्द केलं आहे. याशिवाय फडणवीस सरकारनं चार साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बँक हमी रद्द केली आहे.  
 
महाराष्ट्र पर्यटन महामंडळानं (MTDC) गुजरातमधील 'लल्लूजी अँड सन्स' या कंपनीला घोड्यांसंदर्भातील एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या आयोजनाचं कंत्राट दिलं होतं. मात्र यामध्ये मोठी आर्थिक अनियमितता असल्याचं सांगत सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे.
 
321 कोटी रुपयांच्या या करारानुसार नंदुरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या आयोजनाचं सर्व काम या कंपनीला देण्यात आलं होतं. 28 नोव्हेंबरला महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रमुख सचिव अजॉय मेहता यांनी हा करार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
 
याव्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी 310 कोटी रुपयांची मदत देण्याचा फडणवीस सरकारनं घेतलेला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला आहे.
 
पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी, धनंजय महाडिक यांच्या भीमा साखर कारखान्यास 85 कोटी, विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यास 100 कोटी आणि काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याला 75 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती