छत्तीसगडमध्ये ITBP जवानाने 5 सहकाऱ्यांवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

बुधवार, 4 डिसेंबर 2019 (18:09 IST)
- आलोक प्रकाश पुतुल
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात इंडो-तिबेटियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (ITBP) एका कॅम्पमध्ये झालेल्या गोळीबारात 6 जवान ठार झाले आहेत.
 
नारायणपूर जिल्ह्याचे एसपी मोहीत गर्ग यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
 
जिल्ह्याच्या कडेनार क्षेत्रातील एका कॅम्पमध्ये बुधवारी सकाळी 8 वाजता जवानांमध्ये गोळीबार झाला. यात 6 जवान ठार तर इतर 2 जवान गंभीर जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व जवान आयटीबीपीच्या 45 व्या बटालियनचे होते.
 
जखमी जवानांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूरला नेण्याची तयारी सुरू आहे.
 
जवानांविषयी अधिकृत माहिती
ठार झालेल्या जवानांपैकी 2 हेड कॉन्स्टेबल तर 4 कॉन्स्टेबल होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
 
मृतांमध्ये हिमाचल प्रदेशातील बिलापूरमधील महेंद्र सिंह, पश्चिम बंगालच्या वर्धमानचे सुरजीत सरकार, पंजाबच्या लुधियानातील दलजीत सिंह, पश्चिम बंगालच्या पुरुलियातील विश्वरूप महतो आणि केरळच्या कोझिकोडेतील बिजीश कुमार यांचा समावेश आहे.
 
या पाचही जवानांवर पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातून येणाऱ्या मसूद-उल-रहमान नावाच्या कॉन्स्टेबलने गोळ्या झाडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
जखमी जवानांमध्ये केरळमधील तिरुअनंतपूरम जिल्ह्यातील एस. बी. उल्लास आणि राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील सीताराम दून यांचा समावेश आहे.
 
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयटीबीपीच्या या बटालियनमध्ये परस्पर वाद झाल्यानंतर मसूद-उल-रहमान यांनी स्वतःच्या बंदुकीतून आपल्याच सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. यात पाचही जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर गोळीबार करणाऱ्या जवानाने स्वतःवरही गोळी झाडली.
 
हा गोळीबार का झाला, जवानांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला, याचं कारण अजून कळू शकलेलं नाही, असंही एस. पी. मोहीत गर्ग यांनी सांगितलं आहे.
 
या घटनेनंतर आयटीबीपीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. शिवाय जिल्हा मुख्यालयातूनही पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 
छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी घटनेवर खेद व्यक्त केला आहे. तसंच नारायणपूरचे पोलीस निरीक्षक आणि बस्तरचे पोलीस महासंचालक यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती