एकनाथ खडसे: 'होय, मी नाराज आहे, माझ्यावर अन्याय झाला’ - विधानसभा निवडणूक
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (12:16 IST)
बीबीसी मराठीच्या मुलाखतीत एकनाथ खडसेंनी नाराज असल्याचं केलं मान्य, पक्षाचा निर्णय नाईलाजाने मान्य केल्याचं केलं स्पष्ट केलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने आपण समाधानी नसल्याचं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी स्पष्टपणे मांडली आहे. इतकंच नाही तर पक्षाचा निर्णय नाईलाजाने मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बीबीसी मराठी प्रतिनिधी अभिजीत कांबळे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने तिकीट न दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. भाजपने खडसेंच्या जागी त्यांची मुलगी रोहिणी यांना जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे. पक्षाच्या या निर्णयावर तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नावर खडसे म्हणाले, "मी या निर्णयावर समाधानी नाही. मला वाटतं माझ्यावर अन्याय झाला.
40 वर्षं मी पक्षासाठी परिश्रम केले. कष्ट केले. मी पक्षाला सांगितलं होतं की मला 5 वर्षांसाठी संधी द्या. माझे काही ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. पण पक्षाने सांगितलं की तुम्हाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आम्ही मदत करू. पक्षाने सांगितल्यामुळे मी नाईलाजाने मान्य केलं. पण मी फारसा समाधानी नाही आणि माझी मुलगीही समाधानी नाही."
सरकारी भूखंड लाटल्याचे, दाउदच्या बायकोशी फोनवरून बोलल्याचे खोटे आरोप आपल्यावर करण्यात आल्याचं म्हणत चार दशकांच्या आपल्या कामावर पाणी फिरत असेल तर दुःख वाटणं सहाजिक असल्याचंही ते म्हणाले. "मी पक्षाला विचारलं होतं माझा दोष काय सांगा. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. माझा अंडरवर्ल्डशी काहीच संबंध नाही.
सरकारी भूखंडांचे मी शून्य टक्के व्यवहार केले आहेत. पण सरकारला वाटलं की माझी न्यायालयीन चौकशी करावी. केली. अँटी करप्शनकडून दोन वेळा चौकशी झाली. इन्कम टॅक्सच्या चौकशा झाल्या. एवढं सगळं झालं. त्यात काहीच आढळलं नाही. म्हणून सरकारला विचारलं की अजून काही असेल तीही चौकशी करा. पण मला कारण सांगा की माझा गुन्हा काय? 40-42 वर्षं जे काम केलं त्यावर पाणी फेरण्याचं काम होत असेल तर त्याचं दुःख वाटणं स्वाभाविक आहे."
मात्र, पक्षाकडून तिकीट मिळणार नाही, याचा मानसिक तयारी पक्षाने दोन महिन्यांपूर्वीच केली होती, असंही खडसे यांनी सांगितलं. ते म्हणाले, "पक्षाने दोन महिन्यांआधी सांगितलं होतं की काही नवीन जबाबदारी देऊ. नवीन जबाबदारी म्हणजे तिकीट मिळणार नाही. त्यामुळे माझी मानसिक तयारी आधीच झाली होती."
तसंच यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करताना ते राज्यपाल पदाविषयी बोलले होते. मात्र, आपल्याला राज्यपाल पदात रस नव्हता आणि राज्याचं राजकारण सोडून अज्ञातवासात जाण्यातही रस नव्हता, असंही खडसे म्हणाले. मात्र, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता असल्याचं सांगत राज्यपाल पद देऊ केलं तर त्यानुसार निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिली होती, असाही गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी एका प्रचार सभेत केला. त्याविषयी बोलताना खडसे म्हणाले, "त्यांचं म्हणणं होतं की पक्षाने तुमच्यावर अन्याय केला. तुम्हाला तिकीट नाकारलं. ज्या व्यक्तीने 40-42 वर्षं पक्षाला दिली त्याच्यावर अन्याय झाला. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही राजीनामा देऊन राष्ट्रवादीत यावं. तुमच्यासाठी एबी फॉर्म कोरा आहे. पण मी नम्रपणे नकार दिला."
एकनाथ खडसे 1990 सालापासून महाराष्ट्र विधानसभेत आमदार आहेत. विरोधी पक्षनेते, गटनेते म्हणून त्यांनी काम सांभाळलं. 2014 साली आलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क अशी महत्त्वाची खाती होती. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. तेव्हापासून एकनाथ खडसे काहीसे बाजूला फेकले गेले. यंदा तर पक्षाने तिकीटही दिलं नाही.
मात्र, ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय आहेत. पक्ष मोठा करण्यात, भटांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या पक्षाला बहुजनांचा चेहरा देण्यात आपणही खारीचा वाटा उचलला आहे, असं खडसे म्हणाले. ते पुढे म्हणतात, "प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर, गडकरी, मी, आम्ही अनेकांनी हातभार लावून आज जे चित्र उभं केलं आहे, त्याला धक्का लागू नये एवढंच मला वाटतं. त्यामुळे पक्षाच्या ध्येयनिष्ठेशी मी प्रामाणिक आहे."
बाहेरून पक्षात आलेल्यांवर कोपरखळी मारायलाही खडसे विसरले नाही. पक्षाने अनेक बहुजनांना तिकीट दिलं. मात्र, यातले अनेक जण पक्षातले नाहीत तर बाहेरून आलेले आहेत. पक्षात आले आणि पावन झाले. त्यामुळे पुढे काही प्रश्नच नाही, असा चिमटा खडसेंनी काढला. पक्षातल्या जुन्या जाणत्यांनी मेहनत करून हा वटवृक्ष मोठा केला आहे. आता बाहेरून आलेल्या या झाडाच्या सावलीत बसतात. तेव्हा जुन्या-जाणत्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या विधानसभेत नसणार, याचं आपल्याला दुःख असल्याचंही खडसे म्हणाले. यावर बोलताना त्यांनी प्रमोद महाजनांच्या वाक्याचा दाखला दिला. ते म्हणाले, " मला एकदा काही राजकीय कारणांमुळे विधानसभेतून तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं. तेव्हा स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी एक माझ्याविषयी एक वाक्य म्हटलं होतं. ते म्हणाले होते, कुंकुवाविना सुवासिनी ही कल्पनाच सहन होत नाही. तसंच महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ खडसे नाही, ही कल्पनाच मला सहन होत नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत मी नसणं, याचं दुःख प्रमोदजींना होतं. ही अवस्था आज महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. मला खात्री आहे की अनेक दिवस, अनेक वर्ष एकनाथ खडसेची उणीव जनतेला जाणवेल."