इरिट्रिआ: या देशात फेसबुक तर सोडाच, लोकांना इंटरनेटही माहिती नाही

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (11:13 IST)
आफ्रिकेतील्या जुलमी देशांपैकी एक असं इरिट्रिआचं वर्णन केलं जातं. नागरिकांच्या राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्यावर या देशात प्रचंड बंधनं आहेत.
 
हे फार आश्चर्यकारक नाही, कारण इथिओपियापासून 1993 साली स्वतंत्र झाल्यापासून इरिट्रिआत एकाच पक्षाचं सरकार आहे. इसाईस अफवेरकी हे राष्ट्राध्यक्ष आहेत.
 
सरकारने विरोधी पक्ष आणि स्थानिक खासगी प्रसारमाध्यमांवर बंदी घातली आहे. सरकारवर टीका करणाऱ्या काही टीकाकारांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. तरुण मुलांना सैन्यात भरती होणं सक्तीचं आहे.
 
सरकारच्या जुलमी धोरणामुळे इरिट्रिआमधून अनेकांनी पळ काढला आहे. काहींनी सहारा वाळवंट, भूमध्य समुद्राची अवघड वाड पत्करून युरोप गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
 
बीबीसीच्या अमाहारिकच्या जिबाट तमीराट यांनी इरिट्रिआ सरकारच्या निगराणीखाली या देशाला भेट दिली. सरकारचं नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर किती जाचक नियंत्रण आहे, याचा अंदाज तुम्हाला येईल.
 
1. सिमकार्ड मिळणं दुरापास्त
सरकारी मालकीच्या इरिटेल कंपनीतर्फे इ रिट्रिआमध्ये टेलिकॉम सेवा पुरवली जाते. कंपनीची सेवा वाईट आहे आणि सरकारचं कंपनीवर नियंत्रण आहे.
 
इरिट्रिआमध्ये इंटरनेटचा वापर फक्त एक टक्का असल्याचं इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या अहवालात म्हटलं आहे.
 
इरिट्रिआमध्ये सिमकार्ड मिळवणं हे कदाचित अमेरिकेचा व्हिजा मिळवण्याइतकंच कठीण. सिमकार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना स्थानिक सरकारकडे अर्ज दाखल करावा लागतो.
 
जरी तुम्हाला सिमकार्ड मिळालं तरी त्याच्या माध्यमातून इंटरनेट वापरता येत नाही, कारण मोबाईल डेटा नावाचा प्रकारच इथे अस्तित्वात नाही.
 
लोकांना केवळ वायफायच्या माध्यमातून इंटरनेट वापरता येतं, पण त्याचा वेग अगदी संथ असतो. ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया वेबसाईट्स वापरण्यासाठी नेटिझन्स VPNसारखं व्हर्च्युअल खासगी नेटवर्क वापरतात, जेणेकरून सरकारची सेन्सॉरशिप टाळता येऊ शकेल.
 
सिमकार्ड मिळण्यात असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, बहुतांश नागरिक अजूनही सार्वजनिक फोन सुविधेचा वापर करतात. आमच्या भेटीदरम्यान सुरुवातीचे चार दिवस आम्हीही याच फोन्सच्या माध्यमातून संपर्क केला. त्यानंतर तीन सदस्यीय बीबीसी टीमला मिळून एक सिमकार्ड मिळालं. हे आम्हाला इरिट्रिआ सोडताना परत करायचं होतं.
2. ATM नाही, बँकेतूनच काढावे लागतात पैसे
नागरिक त्यांच्या बँकेच्या खात्यातून किती पैसे काढू शकतात, यावर सरकारने नियंत्रण आणलं आहे. इरिट्रिआचं चलन नाकफा आहे. एखाद्या नागरिकाच्या खात्यात कोट्यवधी रुपये असले तरी तो प्रत्येक महिन्यात 330 डॉलर्स एवढीच रक्कम काढू शकतो.
 
अस्मारा ही इरिट्रिआची राजधानी. इथे आम्ही एका व्यक्तीला भेटलो. 1986ची टोयोटा कोरोला गाडी विकत घेण्यासाठी त्याला दर महिन्याला 5,000 नाकफा, असे 11 महिने पैसे काढावे लागले. त्यानंतर त्याने गाडी विकणाऱ्याला 55,000 नाकफा रोख रक्कम दिली आणि उरलेले 55,000 बँकेद्वारे ट्रान्सफर केले.
 
सगळी रक्कम बँकेद्वारे ट्रान्सफर व्हावी, असं सरकारला वाटतं, परंतु रोख रकमेची चणचण असल्याने दुकानदारांना रोख रक्कम हवी असते.
 
लग्नासाठी अपवाद केला जातो. लग्नंसमारंभ हे मोठे सोहळे असतात आणि त्यासाठी 5,000 नाकफापेक्षा जास्त खर्च येतो.
 
एखाद्या घरी लग्न ठरलं असेल तर यजमानाला स्थानिक सरकारकडे जावं लागतं. "मला 5,000 नाफकेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी द्या," अशी विनंती स्थानिक सरकारने बँकेकडे करावी लागते.
 
पैसे काढण्यावर सरकारने निर्बंध का लादले आहेत, यासंदर्भात इरिट्रिआच्या नागरिकांनी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. लोकांनी अधिकाअधिक पैशांची बचत करावी आणि चलनवाढ नियंत्रणात राहावी, यासाठी सरकार असं करत असावं, असं लोकांना वाटतं.
 
काहींच्या मते सरकारला लोकांचे व्यवहार आवडत नाहीत, म्हणून पैशाची आवक कमी करतात.
 
इरिट्रिआमध्ये ATM नाहीत. गाडी विकत घेतलेल्या व्यक्तीने कहाणी सांगितली. इथिओपिया आणि अन्य काही देशातलं युद्ध संपुष्टात आल्यानंतर गाडी घेतलेला व्यक्ती इथिओपियाला पोहोचला. तिथे माणसं ATMमधून पैसे काढताना पाहून तो अचंबित झाला.
 
3. देशात केवळ एकमेव टीव्ही स्टेशन
इरिट्रिआमध्ये इरि टीव्ही हे एकमेव टीव्ही चॅनेल आहे. हे चॅनेल सरकारी मुखपत्रासारखंच आहे. मात्र तुमच्याकडे डिश टीव्ही असेल तर तुम्ही बीबीसी, असेना टीव्ही अन्य काही चॅनेल्स पाहू शकतात.
 
CPJ अर्थात द कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट या संघटनेच्या मते इरिट्रिआमध्ये माध्यमांवर असलेले निर्बंध जगात सगळ्यात जाचक आहेत. उत्तर कोरियापेक्षाही एरिट्रिआमध्ये माध्यमांना फारसं स्वातंत्र्य नाही.
 
जर्मनीच्या 'डॉएच वेल'नुसार रेडिओ स्टेशनच्या सॅटेलाईट ब्रॉडकास्टिंगमध्ये सिग्नल जॅममुळे अडथळा निर्माण होतो. सरकारी नियंत्रणातील इंटरनेटमुळे परिस्थिती अवघड असते.
 
इरिट्रिआमध्ये बंदिस्त समाजरचना आहे, याच्याशी देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री येमाने मेसकेल सहमत नाहीत. शहरातल्या 90 टक्क्यांपेक्षा घरांमध्ये डिशसेवा आहे, ज्याच्या माध्यमातून 650 चॅनेल्स दिसू शकतात. त्यांनी याला पुष्टी देण्यासाठी काही फोटोही ट्वीट केले.
 
4. एकमेव ब्रुअरी
इटालियन इंजिनियर लिग्वी मेलओटिआ यांनी 1939मध्ये स्थापन केलेली 'अस्मारा ब्रुअर' ही आजही देशातली एकमेव ब्रुअरी किंवा मद्यनिर्मिती कारखाना आहे.
 
अगदी आतापर्यंत नागरिकांना दिवसाला दोन बीअर प्यायला परवानगी होती. त्यामुळे न पिणाऱ्या मंडळींना बरोबर घेऊन जात ते त्यांच्या वाटच्या बीअरही संपवायचे.
 
काही महिन्यांपूर्वी या ब्रुअरीचं नूतनीकरण झालं. आता बीअर पुरेशा प्रमाणात मिळते, असं आम्हाला इथे भेटलेल्या काही जणांचं म्हणणं आहे.
 
इटलीची वसाहत इथे होती आणि इथे रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मेलओटिआ इरिट्रिआत आला होता. ब्रुअरीसाठी बाजारपेठ असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो यासाठीच ओळखला जातो.
 
5. तरुण मुलांना स्थलांतर करायचं आहे
पासपोर्ट मिळणं स्वप्नवत आहे, असं एका तरुण मुलाने रात्री जेवताना आम्हाला सांगितलं. मात्र राष्ट्रीय सेवा केल्याखेरीज पासपोर्ट मिळत नाही, असं त्याने सांगितलं. राष्ट्रीय सेवेअंतर्गत लष्करात काम करणं अपेक्षित असतं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून पाठिंब्याचं पत्र मिळतं. मात्र तोपर्यंत माणूस चाळिशीत पोहोचतो, असं एकाने सांगितलं.
 
पासपोर्ट मिळाला आणि देश सोडून गेलो, असं होत नाही. देश सोडण्यासाठी एक्झिट व्हिसा मिळतो. तो मिळेल याची कोणताही हमी नाही. कारण देश सोडणारी माणसं परतत नाहीत, हा अनुभव असल्याने सरकार एक्झिट व्हिसा देत नाही.
 
त्यामुळे इरिट्रिआ नागरिक अवैध पद्धतीने इथिओपिया आणि सुदान येथे स्थायिक होत आहेत.
 
अन्य सहारा वाळवंट आणि भूमध्य समुद्रमार्गे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र वाळवंटात भूकेने तडफडून किंवा समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे.
 
इरिट्रिआ हा सर्वाधिक स्थलांतरित पाठवणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानी आहे. इरिट्रिआतून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या 507,300 एवढी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थलांतर एजन्सीनेच ही माहिती दिली आहे.
 
इरिट्रिआतून बाहेर पडणारे बहुतांश नागरिक इथिओपिया, सुदान मध्ये जातात. अनेकजण युरोपात म्हणजे जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये जातात.
 
तरुण देश सोडून जात असल्याचं चित्र आहे, त्याचवेळी वृद्ध नागरिक अस्मारामध्ये रिकामा वेळ कसा घालवायचा या विवंचनेत दिसतात.
 
इरिट्रिआची लोकसंख्या किती, याबाबत अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून इरित्रेने जनगणना घेतलेली नाही.
 
World Population Review नुसार इरिट्रिआची लोकसंख्या 35 लाख असल्याचा अंदाज आहे.
 
5. मात्र राजधानी सुंदर आहे
इटलीचा फॅसिस्ट वर्चस्ववादी नेता बेनिटो मुसोलिनीला अस्माराला पिकोलो रोमा म्हणजे दुसरं रोम करायचं होतं. 1930च्या दशकात त्याने नव्या रोमन साम्राज्याची उभारणी केली.
 
अस्माराला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. आधुनिकवादी शहरी वास्तूरचना असं युनेस्कोने म्हटलं आहे. विसाव्या शतकात आफ्रिकन शैलीत या शहराची उभारणी करण्यात आली.
 
इरिट्रिआमध्ये राजकीय आणि आर्थिक अडचणी आहेत मात्र अस्मारा हे बघण्यासारखं शहर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती