जेव्हा डॉक्टरच बनला ‘विक्की डोनर’: वंध्यत्वतज्ज्ञच निघाला 49 मुलांचा बाप

नेदरलँडच्या एका वंध्यत्वरोग तज्ज्ञाने त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांसाठी त्यांच्या परवानगीशिवाय स्वत:चं वीर्य वापरल्याची बाब उघडकीस आली आहे. अशा पद्धतीने तो डॉक्टर आज 49 मुलांचा बाप आहे. जॅन करबाट असं या डॉक्टरांचं नाव आहे. त्यांचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं. बिजड्रॉप या शहरात त्यांचं क्लिनिक होतं. DNA चाचणीत हा सगळा प्रकार उघडकीला आला आहे. न्यायाधीशांनी या चाचण्यांचे अहवाल सार्वजनिक करण्याचा आदेश दिल्यानंतर या प्रकाराची माहिती कळली.
 
या मुलांपैकीच एक होता जोई. ही माहिती समोर आल्यावर तो म्हणाला, "करबाट माझे वडील आहे, हे अखेर मला कळलं. म्हणून आता हा विषय माझ्यासाठी संपलाय." "11 वर्षं शोध घेतल्यानंतर आता मी निवांतपणे जगू शकतो. माझ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालं याचा मला आनंद आहे," असं तो NOS या डच वाहिनीशी बोलताना म्हणाला. या 49 मुलांचं कोर्टात प्रतिनिधित्व करणारे टिम ब्युटर्स म्हणाले, त्यांना आनंद झालाय की अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर अखेर हे सत्य समोर आलंय.
 
"याचाच अर्थ असा आहे की ज्या मुलांची चाचणी झाली आहे, ते आता सुटकेचा नि:श्वास टाकू शकतात," त्यांनी NOSला सांगितलं. करबाट यांना पहिल्यांदा 2017 मध्ये काही पालकांनी कोर्टात खेचलं होतं, कारण त्यांच्या मुलांचं या डॉक्टरांशी नातं आहे, असा संशय त्यांना आला होता. एका मुलाच्या शरीराची रचना डॉक्टरशी अगदी मिळतीजुळती होती, असं त्यांनी कोर्टात सांगितलं होतं. मात्र वयाच्या 89व्या वर्षी डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर एप्रिल 2017मध्ये त्यांच्या घरून काही वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.
 
दाट शंका
2017 मध्येच न्यायाधीशांनी DNA चाचणीला परवानगी दिली. मात्र या प्रकरणातले सर्व अहवाल येईपर्यंत DNA चाचणीचे निकाल गुप्त ठेवावे, असं कोर्टाने सांगितल्याची बातमी स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. यावर्षी फेब्रुवारीत रोटरडॅम जिल्हा न्यायालयाने हे अहवाल सार्वजनिक करण्याचा आदेश दिला. यातून करबाट यांनी आपल्या क्लिनिकमध्ये स्वतःचंच वीर्य वापरल्याचा दाट संशय आता खरा ठरलाय, असं वक्तव्य 'रेक्स अडव्होकेट' या विधी संस्थेच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलं आहे.
 
करबाट स्वतःची ओळख वंध्यत्व निवारणच्या क्षेत्रातील प्रणेते म्हणून करून द्यायचे. 2009 मध्ये त्यांचं क्लिनिक बंद करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रुग्णांच्या माहितीत फेरफार केल्याचा, डोनरची आणि तसंच त्यांच्या अहवालांची खोटी माहिती देण्याचा आरोप होता. तसंच एक डोनरकडून सहा मुलांसाठीच वीर्य घेण्याच्या नियमाचंही उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती