तायवानमध्ये महिलेच्या डोळ्यात सापडल्या चार जिवंत माश्या
एका महिलेच्या डोळ्यात चार माशा सापडल्याची घटना तायवानमध्ये घडली आहे. 'ही' नावाची 28 वर्षीय महिला झुडपं कापत असताना विशिष्ट प्रकारच्या माश्या तिच्या डोळ्यात गेल्या.
फुयीन विद्यापीठ आणि हॉस्पिटलचे डॉ. हाँग चि टिंग यांनी बीबीसीला सांगितलं की या महिलेच्या डोळ्यात चार मधमाश्या पाहिल्यावर त्यांना मोठा धक्का बसला.
त्या महिलेला आता रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून त्या लवकरच बऱ्या होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या विशिष्ट प्रकारच्या माशीला Sweat bee असं म्हणतात. ती घामाकडे आकर्षित होते. तसंच या माश्या कधीकधी अश्रूही पितात. कारण त्यात मोठ्या प्रमाणात प्रथिनं आहेत असं Kansas Entomological Society च्या एका अभ्यासात दिसून आलं आहे.
त्या सगळ्या जिवंत होत्या
'ही' त्यांच्या एका नातेवाईकांच्या स्मृतीस्थळापाशी तण उपटण्याचं काम करत होत्या. त्याचवेळी या माश्या त्यांच्या डोळ्यात गेल्या. चीनमध्ये नातेवाईकांच्या स्मृतीस्थळाला सजवण्याची एक प्रथा असते. त्यासाठीच ही तिथे गेल्या होत्या.
जेव्हा त्यांच्या डोळ्यात थोडा वारा गेला तेव्हा त्यांना वाटलं की फक्त धूळ डोळ्यात गेल्याने त्रास होत असावा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
मात्र काही तासांनंतर त्यांचे डोळे सुजले होते आणि त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. तेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या.
"त्यांना डोळा पूर्णपणे बंद करता येत नव्हता. मी मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात काहीतरी काळं दिसलं. एखाद्या किड्याचा पाय असावा असं वाटलं." असं नेत्रतज्ज्ञ डॉ.हाँग यांनी बीबीसीला सांगितलं.
"मी एक पाय पाहिला आणि बाहेर काढला, मग आणखी एक दिसला, त्यांनंतर पुन्हा एक दिसला. असे चार पाय मला दिसले. ते सगळे जिवंत होते."
डॉ. हाँग यांच्यामते वाऱ्यामुळे या माशा डोळ्यात गेल्या असतील आणि तिथेच अडकल्या असतील.
"या माश्या लोकांवर हल्ले करत नाही. मात्र त्या अश्रू पितात. त्यामुळे त्यांना असं नाव दिलं गेलं आहे." ते पुढे म्हणाले. हाँग म्हणाले की ही या नशीबवान आहेत. कारण जेव्हा माश्या आत होत्या तेव्हा त्यांनी डोळे चोळले नाहीत.
"त्यांनी काँन्टॅक्ट लेन्स लावल्या होत्या. त्यामुळे त्यांनी डोळे चोळले नाहीत. नाहीतर त्यांच्या लेन्स तुटल्या असत्या. त्यांनी डोळे चोळले असते तर माश्यांनी एक विष तयार केलं असतं त्यामुळे त्या कदाचित अंध झाल्या असत्या."
मग माशांचं काय झालं?
"त्या अजूनही जिवंत आहेत. त्यांचे नमुने दुसऱ्या संस्थेत चाचणीसाठी पाठवले आहेत. त्यांचा अभ्यास केला जाईल. तायवानमध्ये पहिल्यांदाच आम्ही असं काहीतरी पाहिलं आहे." असंही ते म्हणाले.