ड्रॅगन मॅन : मानवाची अशीही एक प्रजात दीड लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होती
सोमवार, 28 जून 2021 (15:57 IST)
मानवी प्रजातीच्या सर्वस्वी नव्या अशा मानवी प्रजातीची कवटी चीनच्या संशोधकांना आढळली आहे.
निअँडरथल आणि होमो इरेकट्स यांच्याप्रमाणे ही प्रजात असू शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.
'ड्रॅगन मॅन' असं या प्रजातीला नाव देण्यात आलं असून, पूर्व आशियात 1,46,000 वर्षांपूर्वी हा माणूस राहत असावा असा संशोधकांचा कयास आहे.
चीनच्या हर्बिन प्रांतात ही कवटी सापडली आहे. 1933 मध्ये ही कवटी सापडली. पण गेल्या काही दिवसात या कवटीचे संदर्भ स्पष्ट झाले आहेत.
'द इनोव्हेशन' या शोधपत्रिकेत कवटीसंदर्भातील विश्लेषण मांडण्यात आलं आहे.
मानवाची उत्क्रांती हा लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझिमचे प्राध्यापक ख्रिस स्ट्रिंजर यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रा.स्ट्रिंजर हे कवटीसंदर्भात अभ्यास करणाऱ्या संशोधन चमूचा भाग होते.
जीवाश्मांच्या संदर्भात सांगायचं तर गेल्या काही वर्षांत सापडलेला हा सगळ्यांत महत्त्वाचा ठेवा आहे असं प्रा. स्ट्रिंजर यांनी सांगितलं.
होमो सेपियन्स टप्प्याकडे वाटचाल करणारी एक सर्वस्वी नवी अशी मानवी प्रजात होती. या प्रजातीच्या माणसांची ही कवटी आहे. हजारो वर्षं उत्क्रांत होत गेलेली अशी ही प्रजात आहे. कालौघात ही प्रजात नामशेष झाली असं त्यांनी सांगितलं.
मानवी उत्क्रांतीचा इतिहास नव्याने मांडावा लागेल असं हे संशोधन आहे. निअँडरथलपेक्षा होमो सेपियन्स प्रजातीशी या जीवाश्मांचं साधर्म्य आहे, असं संशोधकांना वाटतं आहे.
होमो लोंगी असं या जीवाश्मांना नाव देण्यात आलं आहे. चीनी भाषेत लोंग म्हणडे ड्रॅगन.
अनेक वर्षांच्या वंशवृक्षात नाहीशी झालेली प्रजात आम्हाला सापडली आहे, असं प्राध्यापक क्षिजून नी यांनी सांगितलं. शिझुआंग इथल्या चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स अँड हेबई जीईओ विद्यापीठात ते अध्यापनाचं काम करतात.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मला धक्काच बसला. अतिशय चांगल्या पद्धतीने याचं जतन करण्यात आलं आहे. तुम्हाला सगळे सूक्ष्म तपशील दिसू शकतात. हे अद्भुत आहे".
अन्य मानवी प्रजातींच्या कवट्यांपेक्षा ही कवटी प्रचंड आकाराची आहे. आपल्या प्रजातीच्या मेंदूशी साधर्म्य साधणारा मेंदूचा आकार आहे.
ड्रॅगन मॅन अशा या माणसाच्या डोळ्यांची खोबण चौरस आकाराच्या जवळ जाणारी आहेत. भुवया दाट होत्या, तोंडाचा आकार मोठा होता. दातही मोठाल्या आकाराचे होते. संपूर्ण स्वरुपाचं असं खूप प्राचीन जीवाश्म सापडलं आहे, असं क्विआंग जी यांनी सांगितलं.
अतिशय प्राचीन आणि त्याचवेळी अगदी अर्वाचीन अशा दोन्ही काळांचा मिलाफ या जीवाश्मांमध्ये दिसतो. त्यामुळे ही प्रजात बाकी तत्कालीन प्रजातींपासून वेगळी होती, असं संशोधक सांगतात.
ड्रॅगन मॅन हा ताकदवान आणि खडबडीत स्वरुपाचा होता. मात्र ड्रॅगन मॅनच जगणं कसं होतं याविषयी माहिती मिळू शकलेली नाही कारण तो जिथे राहत होता तिथून कवटी मिळाली आहे.
त्यामुळे या कवटीला दगडी हत्यारं, अन्य उपकरणं, संस्कृती असा पुरातत्वीय संदर्भ नाही.
1933 मध्ये हर्बिन मध्ये सोंगुआ नदीवर पूल उभारणीचं काम सुरू असताना एका बांधकाम मजुराला ही कवटी आढळली. हेईलओजिआंग या प्रांतात हर्बिन मोडतं. हेईलओजिआंगचा अर्थ होतो ब्लॅक ड्रॅगन रिव्हर. म्हणून या प्रजातीला ड्रॅगन मॅन असं नाव देण्यात आलं.
तेव्हा हर्बिन जपानच्या अमलाखाली होतं. या कवटीचं सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चीनच्या त्या कामगाराने ती घरी नेली. जपानी शासकांच्या हाती ती कवटी पडू दिली नाही. त्याने घराइथल्या विहिरीत ती लपवली. तिथे ही कवटी 80 वर्षं राहिली. या माणसाने मृत्यूपूर्वी घरच्यांना या कवटीबद्दल सांगितलं. त्यामुळे संशोधक या कवटीपर्यंत पोहोचू शकले.
वर्गीकरण करायला अवघड अशा अनेक मानवी प्रजातीत ड्रॅगन मॅनचा समावेश झाला आहे. चीनमध्ये असे अनेक जीवाश्म आढळले आहेत.
दाली, जिनुशान, हाऊलोंगडोंग, क्षिआ जॉबोन या तिबेटमधील भागात आढळणाऱ्या जीवाश्मांचा समावेश आहे.
होमो सेपियन्स, निअँडरथल किंवा डेनिसोव्हन्स यांच्यापैकी कोणत्या प्रजातीशी ड्रॅगन मॅनचं साधर्म्य आहे यावरून खूप प्रवाह आहेत. का ही प्रजात सर्वस्वी वेगळी आहे असाही एक प्रवाह आहे.
रशियामधील डेनिसोव्हा इथल्या एका गुहेत हाताच्या बोटाचं हाड सापडलं होतं. 50 ते 30 हजार वर्षं जुन्या या हाडाच्या डीएनएचं पृथ्थकरण करून पहिल्यांदा डेनिसोव्हन्सची ओळख पटविण्यात आली होती. निअँडरथल वंशाशी साधर्म्य असलेल्या या वंशांचे सापडलेले अवशेष हे तुकड्यातुकड्यांमध्ये होते. त्यामुळेच 'जीवाश्मांच्या नोंदींच्या प्रतीक्षेत असेलेल जीनोम' असं या समूहाचं वर्णन करण्यात आलं होतं.
केंब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक मिराझोन लाहर यांच्या मते ड्रॅगन मॅन हा डेनिसोव्हनच आहे.
डेनिसोव्हन्स ही इतिहासातली गूढ अशी प्रजात आहे. तिबेटमध्ये सापडलेल्या जीवाश्मांच्या डीएनएद्वारे अशीही शक्यता वर्तवण्यात आलेय की तेही डेनिसोव्हन्स आहेत.
आता तिबेट आणि ड्रॅगन मॅनची जबड्याची रचना तंतोतंत सारखी आहे. त्यामुळे डेनिसोव्हन्सचा खरा चेहरा कसा आहे हे आपल्याला कळू शकेल.
इस्रायलमध्ये काही जीवाश्म आढळले. त्यासंदर्भात एक संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं. निअँडरथल मानवाचा पुढचा टप्पा हा असावा असं त्यातून वाटतं. ड्रॅगन मॅन हा लेव्हान्ट भागातून अन्य ठिकाणी गेलेली पहिलीच प्रजात आहे.
चीनच्या संशोधकांच्या मते पूर्व आशियात सापडलेल्या जीवाश्मांवरून प्रजातींचं वर्गीकरण करणं कठीण आहे. यात प्रजातींमध्ये हळूहळू बदल होत गेला आहे. या मतप्रवाहाला विभिन्न मांडणी करणाऱ्यांना प्राध्यापक नी उत्तर देतात, "निर्णयानंतर चांगलाच वाद निर्माण होणार आहे. अनेक लोकांना मी काय म्हणतोय ते पटणार नाही."
पण शास्त्र हे शास्त्रच असतं. शास्त्र आगेकूच करतं यावर आपला विश्वास नाही.