EngvsNew: आठ वर्षांपूर्वीचं ट्वीट भोवणार? कसोटी पदार्पणात इंग्लंडच्या बॉलरवर माफीनाम्याची वेळ

रविवार, 6 जून 2021 (19:50 IST)
एकीकडे इंग्लंडसाठी कसोटी पदार्पणाचा आनंद मात्र दुसरीकडे आठ वर्षांपूर्वीच्या ट्वीटचं प्रकरणी माफी अशी फास्ट बॉलर ओली रॉबिन्सनची अवस्था झाली आहे.
 
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पहिली टेस्ट लॉर्ड्स इथे सुरू झाली.
 
27वर्षीय रॉबिन्सनला टेस्ट कॅप देण्यात आल्यानंतर काही तासात सोशल मीडियावर त्याने खूप वर्षांपूर्वी केलेले ट्वीट्स व्हायरल झाले. आक्षेपार्ह ट्वीटसाठी रॉबिन्सनने माफी मागितली.
 
"मी वर्णद्वेषी तसंच लिंगभेदी नाही. आठ वर्षांपूर्वीच्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता बेजबाबदार वागले होतो. या गोष्टी समजण्याइतकं माझं वय नव्हतं. मी माफी मागतो", असं रॉबिन्सनने सांगितलं.
 
मात्र माफीनाम्यानंतरही हे प्रकरण शमण्याची चिन्हं नाहीत. रॉबिन्सनच्या आक्षेपार्ह ट्वीटनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय संघात निवडीकरता निकष बदलण्याच्या विचारात आहे. खेळाडूची निवड करताना सोशल मीडियावरील वर्तनाचा विचार करण्याची शक्यता असल्याचं इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थॉर्प यांनी म्हटलं आहे.
 
ईसीबीतर्फे रॉबिन्सवर कारवाई केली जाऊ शकते. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला वगळण्यात येऊ शकतं.
 
आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने रॉबिन्सनचा या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नाहीये.
 
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रॉबिन्सनच्या नावावर 63 सामन्यात 279 विकेट्स आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि 7 अर्धशतकंही आहेत.
 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिली कसोटी लॉर्ड्स इथे तर दुसरी कसोटी बर्मिंगहॅम इथे होणार आहे.
 
आयपीएल स्पर्धेचा भाग असलेले बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, ख्रिस वोक्स, मोईन अली, सॅम करन यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती