राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट झाली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या दरम्यानच सचिन वाझे यांच्या निलंबनाची माहिती समोर आली. त्यामुळे पवार-ठाकरे भेटीनंतर आणखी काही मोठी पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.सचिन वाझे यांच्या अटकेबाबत ठाकरे-पवार यांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे.महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत सचिन वाझे यांची पाठराखण केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या प्रकरणी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वाझेंची बाजू घेतली होती. मात्र, आता NIA नं सचिन वाझे यांना अटक केल्यानं सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होता दिसत आहे. अशावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालीय. त्यामुळे या भेटीचं महत्त्व वाढलं आहे.
मात्र, सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यात ज्या घडामोडी घडतायेत, त्यामुळे या बैठकीला महत्त्व आलं आहे. कारण गृहमंत्रालय राष्ट्रवादीकडे असून, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख या खात्याचे मंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय चर्चा होतेय, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.