धनंजय मुंडे : 'त्या' महिलेवर कोणी कोणी केले ब्लॅकमेलिंगचे आरोप?

शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (18:33 IST)
धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ हा 14 जानेवारीच्या दिवशी सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय. याच दिवशी संध्याकाळी मुंडें विरोधात तक्रार करणाऱ्या महिले विरोधात भाजपचे कृष्णा हेगडे, मनसेचे मनीष धुरी आणि जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी या तिघांनी फसवणूकीची तक्रार केली.
 
फोन करून ही महिला आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप या तिघांनी केला आणि या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा तक्रारदार महिलेच्या ब्लॅकमेलिंगच्या आरोपांवर सरकली. पण, या वेगवान घडामोडींमध्ये तक्रारदार महिलेने ट्विटरचा आसरा घेत हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलंय.
 
इतकंच नव्हे तर या महिलेने हे प्रकरण दाबण्यासाठी धनंजय मुंडेंनी ही खेळी केल्याचा आरोपही केलाय. त्यामुळे खरं आणि खोटं काय? यावरचं धुकं अजूनच गडद झालंय.
 
11 जानेवारीला या तक्रारदार महिलेने सर्वांत प्रथम ट्विटरवरूनच आपल्यावर धनंजय मुंडें कडून बलात्कार झाल्याचा आरोप करणारं ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, शरद पवार, सुप्रिया सुळे यांना टॅग केलं होतं. यानंतर खळबळ उडाली आणि अखेर स्वतः धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेचे आरोप फेसबुकवर पोस्ट करून फेटाळून लावले.
 
मात्र, तक्रारदार महिलेच्या सख्ख्या बहिणीशी परस्पर सहमतीने संबंध असल्याचं आणि मुलं असल्याचं मुंडे यांनी मान्य केलं. मात्र, त्यांच्या कुटुंबियांकडून आपल्याला फसवलं जात असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.
 
यानंतर या महिलेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यां मध्ये तक्रारी दाखल होऊ लागल्या. मग महिलेनेही ट्विटरवर प्रथम धनंजय मुंडेंचे आरोप फेटाळले आणि त्यानंतर कृष्णा हेगडे यांचेही आरोप नाकारले.
 
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका पार्टीत मला हेगडे भेटले आणि त्यांनीच माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.
 
"उलट मी जर चुकले असेन तर इतके दिवस हे लोक गप्प का होते," असा सवालही या महिलेनं उपस्थित केलाय.
 
त्यामुळे जोपर्यंत याप्रकरणी पोलीस तपास होऊन अंतिम सत्य बाहेर येत नाही तोवर कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं अवघड आहे. पण, यावरून राजकारणात झालेल्या हालचालींनी पुन्हा एकदा सगळ्यांना खिळवून ठेवलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती