देवेंद्र फडणवीस-अजित पवारः एकच जन्मतारीख असलेल्या नेत्यांचा चढता-उतरता राजकीय आलेख

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार... महाराष्ट्राच्या राजकारणातील असे दोन चेहरे जे परस्परविरोधी विचारसरणीचं, पक्षांचं प्रतिनिधित्व करतात. एकाच्या पदरात अगदी सहजपणे मुख्यमंत्रिपद पडलं तर दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे.
 
दोघांचा स्वभाव, कार्यशैली, राजकारणाची पद्धत सगळंच भिन्न आहे. पण तरीही या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे... देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जन्मतारीख एकच आहे. 22 जुलै हा दोघांचाही वाढदिवस. या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला तुलनात्मक आढावा...
 
अजित दादांना काकांकडून राजकीय वारसा
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस एकच असला तरी पवार हे फडणवीसांपेक्षा वयानं मोठे आहेत, त्यामुळे राजकारणातही तेच सीनिअर. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा शिकत होते तेव्हाच अजित पवार यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
 
काका शरद पवार यांच्याकडून अजित पवारांना राजकीय वारसा मिळाला होताच. 1982 साली सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीपासून अजित पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
 
अजित पवारांनी पहिली निवडणूक विधानसभेची नाही तर लोकसभेची लढवली होती. 1991 मध्ये ते बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र त्यांची लोकसभेतील ही कारकीर्द सहा-आठ महिन्यांचीच ठरली.
 
त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण पंतप्रधानपदाची माळ पी. व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पडली. तेव्हा शरद पवारांना नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून स्थान देण्यात आलं, ज्यासाठी अजित पवारांनी आपली बारामती लोकसभेची जागा काकांसाठी सोडली.
 
मात्र तेव्हापासून अजित पवार राज्यात कार्यरत राहिले तर 2009 पासून शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या लोकसभेत बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची जणू अलिखित विभागणीच झाली आहे.
 
1995 पासून अजित पवार विधानसभेत बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. सुधाकरराव नाईकांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत, आघाडीच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात अजित पवारांनी मंत्रिपद भूषवलं आहे.
 
नागपूरचे नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
अजित पवार लोकसभेची निवडणूक लढवून खासदार झाले आणि त्यानंतर राज्यात परतले, त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती.
 
देवेंद्र यांनाही घरातून राजकारणाचा वारसा होता. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे विधान परिषदेचे आमदार होते तर त्यांच्या काकू शोभा फडणवीस यासुद्धा आमदार होत्या.
 
नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं. 1992 साली ते नागपूरच्या राम नगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पाचच वर्षात ते नागपूरचे सर्वांत तरुण महापौर बनले. 1999 पासून ते विधानसभेवर निवडून येत आहेत. अजित पवार सत्तेत असताना फडणवीस हे विरोधकांचा आक्रमक आवाज होते. अभ्यासू नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
 
अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात फडणवीस आघाडीवर होते. 'राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. सिंचनाची कामं केवळ कागदावरच झाली आहेत, प्रत्यक्षात हे सर्व पैसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खिशात गेले,' असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
 
महाराष्ट्रात भाजपमध्ये गडकरी-मुंडे असे गट पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपनं 2014 साली विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.
 
महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती फडणवीसच ठरले. फडणवीस यांचं वैशिष्ट्य म्हणजे 1999 पासून ते आमदार म्हणून निवडून येत आहेत, मात्र ते कधीच मंत्री झाले नाहीत.  कोणत्याही मंत्रिपदावर काम न करता ते थेट मुख्यमंत्रीच बनले.
 
मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र नशीबवान
मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस हे अधिक नशीबवान ठरले, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रताब आसबे यांनी व्यक्त केलं. "फडणवीसांना पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद मिळाला, त्यांनी गेल्या पाच वर्षांत स्वतःच्या प्रतिमेला कोणताही धक्का लागू दिला नाही आणि सर्वांना सांभाळून घेण्याचं धोरण ठेवलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आघाडीचं राजकारण हे त्यांच्या पथ्यावर पडलं." त्या तुलनेत अजित पवारांच्या कारकिर्दीचा विचार करता आघाडीच्या राजकारणात मित्रपक्षांमध्ये जी स्पर्धा असते ती त्यांना भोवली, असंही प्रताप आसबे यांनी म्हटलं. "2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी 
 
काँग्रेसच्या दोन जागा जास्त निवडून आल्या होत्या. मात्र तरीही आघाडीच्या राजकारणातली तडजोड म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रिपद दिलं गेलं. तो अजित पवारांच्या कारकिर्दीतला सर्वांत मोठा सेटबॅक होता."
 
हे झालं राजकीय कारकिर्दीबद्दल, पण व्यक्ती म्हणून विचार केला तरी दोघांमधले फरक अगदी ठळकपणे दिसतात, असं आसबे सांगतात.
 
"अजित पवार यांचा स्वभाव रोखठोक आहे. एखादी गोष्ट होणार नसेल तर तसं ते स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना वादांनाही सामोरं जावं लागलं आहे. फडणवीसांची भूमिका ही लोकानुनयाची आहे. पक्षश्रेष्ठींचं अभय असल्यामुळे त्यांना पक्षांतर्गत तसंच मित्रपक्षातील विरोधकांना हाताळण्यात यश आलं आहे," असं निरीक्षण आसबे नोंदवतात.
 
'पवारांची राजकीय कारकीर्द संपली म्हणणं धाडसाचं'
देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास जवळून पाहिलेले पत्रकार यदु जोशी सांगतात, "फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर ते फार काळ पद सांभाळू शकणार नाहीत, त्यांना पक्षातूनच विरोध होईल, 
 
ते टर्म पूर्ण करता येणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र त्यांनी हे अंदाज खोटे ठरवले. पक्षश्रेष्ठींनी नेमलेला मुख्यमंत्री ही स्वतःची प्रतिमा बदलत त्यांनी एक व्यापक जनाधार स्वतःमागे उभा केला आहे."
 
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे वसंतराव नाईकांनंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री असतील.
 
यदु जोशी पुढे सांगतात, "देवेंद्र फडणवीस हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार या अभ्यासू नेत्यांची परंपरा चालवणारे नेते आहेत. त्यांना पक्षाची चौकट माहिती आहे. पक्षापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच नाही केला. एखादा विषय पक्षाच्या विचारांच्या चौकटीत बसतोय का, याचा विचार करूनच ते पुढे गेले. त्यामुळेच त्यांना सर्वांना सांभाळून घेण्यात यश आलं असावं."
 
महाराष्ट्रात भाजप-सेना युतीची सत्ता आहे. केंद्रात मोदींना बहुमत मिळालं आहे. आताच्या या राजकारणात अजित पवार माघारलेले वाटू शकतात. पण त्यांची राजकीय कारकीर्द संपलीये असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं मत यदु जोशी यांनी व्यक्त केलं.
 
"अजित पवार शब्दांचे पक्के आहेत, शिस्तप्रिय आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यात त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचा, पार्थचा दारुण पराभव झाल्यानंतरही त्याचं खापर कशावरही फोडण्यापेक्षा त्यांनी कामाला सुरुवात केली. हेच त्यांचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे," जोशी सांगतात.
 
अजित पवारांसमोर दुहेरी आव्हान
राजकीयदृष्ट्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे 24 बाय 7 अलर्ट असतात, असं निरीक्षण राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.
 
अभय देशपांडे यांनी म्हटलं, "महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सध्या मुख्यमंत्र्याचा राजकीय आलेख हा चढताच आहे. अजित पवार यांच्यापुढे मात्र पक्षाला सत्तेत आणणं आणि दुसरीकडे पक्षात स्वतःला नव्यानं प्रस्थापित करणं, असं दुहेरी आव्हान आहे. हे आव्हान अजित पवार कसं पेलतात, याकडे पाहणं औत्सुक्याचं आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती