दानिश कनेरिया: पाकिस्तानात हिंदू खेळाडूंना अपमानास्पद वागणूक?

बुधवार, 1 जानेवारी 2020 (12:31 IST)
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वीच फिरकीपटू दानिश कनेरिया याच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं.
 
दानिश हिंदू असल्याने त्याला खेळताना पक्षपाती वागणुकीला सामोरं जावं लागलं, असं शोएबनं म्हटलं. शोएब अख्तरनं पीटीव्ही स्पोर्ट्सवर 'गेम ऑन' कार्यक्रमात म्हटलं, की काही खेळाडू दानिशसोबत जेवायलाही तयार नसायचे.
 
शोएब अख्तरच्या या विधानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील मीडियामध्ये यावर भरपूर चर्चा झाली.
या वक्तव्यानंतर दानिशने शोएबचे आभार मानले. जगाला सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद असं दानिशने म्हटलं.
 
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी काय म्हटलं?
शोएबच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी म्हटलं, की पाकिस्तानचा अल्पसंख्याक समुदायाप्रती असा दृष्टिकोन असता तर दानिश पाकिस्तान संघातून खेळू शकला नसता.
 
ख्रिश्चन असलेल्या आणि काही वर्षांपूर्वी मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या मोहम्मद युसुफ यानेही अख्तरवर टीका केली आहे. "पाकिस्तानच्या संघाकडून अल्पसंख्याक समाजाच्या खेळाडूंना अपमानास्पद वागणूक मिळते हा गैरसमज आहे. मी पाकिस्तान संघाकडून इतकी वर्ष खेळलो, मला संघाकडून, संघाच्या चाहत्यांकडून, संघ व्यवस्थापकडून चांगली वागणूक आणि प्रेम मिळालं," असं मोहम्मद युसुफनं म्हटलं आहे.
 
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक हेही अख्तरच्या बोलण्याशी सहमत नाहीत. मुस्लिमेत्तर खेळाडूंशी वर्तन योग्य नाही असं काहीही नसल्याचं इंझमामने म्हटलं आहे. मी तेव्हा कर्णधार होतो. आमच्यासंदर्भात असं बोललं गेलं आहे, याचं वाईट वाटतं असं इंझमाम म्हणाला.
 
कनेरियाचं प्रत्युत्तर
"वागणूक कशी मिळते आहे हे सगळं बाजूला ठेऊन मी 10 वर्ष खेळलो. रिप्लेसमेंटला मी कधीही संघात येऊ दिलं नाही. संघाचा कर्णधार आणि वरिष्ठ खेळाडूंचं मला नेहमीच साहाय्य मिळालं," असं दानिश कनेरिया यानं म्हटलं.
 
"मी आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी माझं वितुष्ट नाही. मी पीसीबीवर आरोप केलेला नाही. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये अनेक बातम्या येत आहेत," असंही कनेरियानं स्पष्ट केलं.
 
सट्टेबाजीचं प्रकरण काय?
इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात दानिश कनेरियाचं नाव समोर आलं. इसेक्स संघातील खेळाडू मर्वेन वेस्टफील्डने एका ओव्हरमध्ये 12 रन्स देण्यासाठी 7,682 अमेरिकन डॉलर्स घेतल्याची कबुली दिली होती.
 
दोषी आढळल्याने त्याला दोन महिन्यांचा तुरुंगवास झाला. लंडनच्या बेलमार्श तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं होतं.
 
कोण आहे दानिश कनेरिया?
 
पाकिस्तानचा फिरकीपटू. टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत वासिम अक्रम, वकार युनिस, इम्रान खान यांच्यानंतर कनेरिया चौथ्या स्थानी.
पाकिस्तानसाठी खेळणारा केवळ दुसरा हिंदू क्रिकेटपटू. कनेरियाआधी विकेटकीपर अनिल दलपत यांनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.
साकलेन मुश्ताक आणि मुश्ताक अहमद यांच्यानंतर पाकिस्तानचा प्रमुख फिरकीपटू.
कनेरियाने 2000 साली इंग्लंडविरुद्ध फैसलाबाद इथं पदार्पण.
 
गुगली टाकणं ही कनेरियाची खासियत.
कनेरियाने 61 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करताना 261 विकेट्स घेतल्या आहेत. डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी 15 तर मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची किमया 2 वेळा.
कनेरियाने 18 वनडेत 15 विकेट्स घेतल्या आहेत.
कनेरिया इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये इसेक्स संघासाठी खेळतो. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागाप्रकरणी दोषी आढळल्याने ईसीबीने कनेरियावर आजीवन बंदी घातली.
दानिश नऊ कर्णधारांच्या (इंझमाम उल हक, मोहम्मद युसुफ, मोईन खान, रशीद लतीफ, सलमान बट, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, वकार युनिस, युनिस खान) नेतृत्वात खेळला.
पाकिस्तान हा मुस्लिमबहुल देश आहे. पाकिस्तानमध्ये मुस्लीम धर्मीयांचं प्रमाण 96.28 टक्के एवढं आहे. हिंदूधर्मीय 1.80 टक्के तर ख्रिश्चनधर्मीय 1.59 टकके इतके आहेत. अन्य धर्मीय 0.53 टक्के इतकेच आहेत.
 
साहजिकच पाकिस्तानच्या संघात मुस्लीमधर्मीयांचं प्रमाण कमी असतं. मात्र पाकिस्तान संघाकडून इतरही मुस्लिमेत्तर खेळाडू खेळले आहेत.
 
1. वालियास मॅथिअस
पाकिस्तानसाठी खेळणारा पहिला बिगरमुस्लिम खेळाडू. मॅथिअस यांनी 21 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. बॅट्समन म्हणून त्यांना मोठं यश मिळालं नाही तरी फिल्डर म्हणून त्यांनी छाप उमटवली. पाकिस्तानच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ राहून सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
 
2. डंकन शार्प
डंकन शार्प हे अँग्लो-पाकिस्तानी होते. पन्नासच्या दशकात ते पाकिस्तानसाठी तीन टेस्ट खेळले. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. ते विकेटकीपिंगही करत असत. 1960मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं. तिकडे गेल्यावर ते शेफील्ड शिल्ड स्पर्धेत खेळले.
 
3. अँटाओ डिसुझा
अँटाओ यांचा जन्म गोव्यात झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानला रवाना झाले. त्यांनी 6 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. पाकिस्तानसाठी त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली असली तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 61 मॅचेसमध्ये 4947 रन्स केल्या. 1999 ते कॅनडात स्थायिक झाले.
 
4. अनिल दलपत
पाकिस्तानसाठी खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटपटू. पाकिस्तान हिंदूज क्लबचे मालक आणि खेळप्रेमी दलपत सोनावारिआ यांचे चिरंजीव असलेल्या अनिल यांनी वासीम बारी निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय संघात विकेटकीपिंगची सूत्रं स्वीकारली. फिरकीपटू अब्दुल कादीर यांच्या गोलंदाजीसमोर त्यांनी विकेटकीपिंग केलं. मात्र त्यांची कारकीर्द बहरली नाही. याकरता त्यांनी इम्रान खान यांना जबाबदार धरलं होतं.
 
5. सोहेल फझल
पाकिस्तानसाठी खेळणारे ख्रिश्चन धर्मीय खेळाडू. सोहेल यांनी केवळ 2 वनडेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 33 मॅचेस आहेत.
 
6. युसुफ योहाना उर्फ मोहम्मद युसुफ
पाकिस्तानच्या सार्वकालीन महान फलंदाजांपैकी एक. कलात्मक आणि देखण्या शैलीसाठी युसुफ योहाना प्रसिद्ध होते. 90 टेस्टमध्ये त्यांनी 52.29च्या अॅव्हरेजसह 7530 रन्स केल्या. युसुफ यांच्या नावावर 24 शतकं आणि 33 अर्धशतकं आहेत.
 
पाकिस्तानच्या बॅटिंगला भक्कम बैठक मिळवून देण्यात युसुफ यांची मोलाची भूमिका. युसुफ, युनिस खान, इंझमाम उल हक या त्रयीने पाकिस्तानला अनेक दिमाखदार विजय मिळवून दिले.
 
88 वनडेत युसुफ यांनी 41.71च्या अॅव्हरेजसह 9720 रन्स केल्या. यामध्ये 15 शतकं आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये युसुफ यांच्या नावावर दहा हजारहून अधिक रन्स आहेत.
 
एका कॅलेंडर वर्षात 1,788 रन्स करत युसुफ यांनी व्हिव्हिअन रिचर्ड्स यांचा जुना विक्रम मोडला.
 
युसुफ यांनी कर्णधारपदाची जबाबदारीही पेलली. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर युसुफ यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. 2010 मध्ये बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला.
 
युसुफ योहाना ख्रिश्चनधर्मीय होते. 2005 मध्ये त्यांनी इस्लाम धर्म अंगीकारला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती