कोरोना व्हायरस: नव्या व्हेरियंटच्या शोधासाठी भारताने कसली कंबर

गुरूवार, 11 मार्च 2021 (17:12 IST)
सौतिक बिस्वास
कोव्हिड-19 ची जागतिक साथ पसरवणारा कोरोना विषाणूदेखील इतर विषाणूंप्रमाणेच एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जाताना स्वतःमध्ये काही छोटे-छोटे बदल करत असतो.
 
बहुतेक वेळा हे छोटे-छोटे बदल, ज्याला म्युटेशन असं म्हणतात, फारसे अपायकारक नसतात आणि त्यामुळे विषाणूच्या एकंदरित प्रकृतीमध्ये फारसा फरकही पडत नसतो.
 
मात्र, काही म्युटेशन विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये बदल घडवून आणतात. या स्पाईक प्रोटीनच्या मदतीने विषाणू मानवी पेशीमध्ये प्रवेश करत असतात.
 
अशा प्रकारे बदल होऊन तयार झालेला विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन किंवा व्हेरियंट) कधी कधी घातक ठरू शकतो. नवा व्हेरियंट मूळ विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो, त्यामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो किंवा त्यावर लस प्रभावी ठरत नाही. युके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये असे व्हेरियंट आढळले आहेत आणि तिथून ते इतर देशांमध्येही पसरले आहेत.
 
अत्यंत संसर्गजन्य व्हेरियंटच्या प्रसारामुळे अमेरिकेत 'आजाराच्या चौथ्या लाटेची' शक्यता असल्याचं गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या एका ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने म्हटलं होतं.
 
शास्त्रज्ञांच्या मते ब्राझिलमधला व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे आणि कोरोनाचा एकदा संसर्ग झाल्यामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती या व्हेरियंटवर प्रभावी न ठरण्याचीही शक्यता असते. तिकडे ब्रिटनमधल्या व्हेरियंटची अमेरिका आणि युरोपमधल्या काही लोकांना लागण झाली आहे.
 
विषाणूच्या जिनोमचा अभ्यास करणारे जगभरातले संशोधक सध्या कोरोना विषाणूमध्ये होत असलेल्या अशा गंभीर बदलांचा शोध घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या नमुन्यात आढळणाऱ्या विषाणूचा जिनोम सिक्वेन्स लावून विषाणूमध्ये काही बदल झाला आहे का, हे तपासलं जातं. शास्त्रज्ञ विषाणूचा जेनेटिक कोड काढून त्यात होणारे बदल ट्रॅक करतात.
 
कोरोना विषाणूचा जिनोम शोधून काढणारा भारत जगातला पाचवा देश आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण गेल्या जानेवारीत केरळमध्ये आढळला होता. तेव्हापासून आजवर भारतात एक कोटींहून अधिक जणांना याची लागण झालीय. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत भारताचा क्रमांक दुसरा आहे. पहिला क्रमांक अमेरिकेचा आहे. भारतात कोरोनामुळे दीड लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
 
कोव्हिड-19 आजार पसरवणाऱ्या कोरोनाच्या Sars-CoV-2 विषाणूच्या स्थानिक नमुन्यांच्या जेनेटिक्सची माहिती ट्रॅक करून ती साठवून ठेवण्यासाठी एक यंत्रणा लागते. भारतात आतापर्यंत याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नव्हतं. आता कुठे ही यंत्रणा अधिक मजबूत करण्याचं काम सुरू झालं आहे.
 
देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढतेय. त्यामुळे साहाजिकच कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळेच संसर्ग अधिक पसरत असावा, अशी भीती व्यक्त होतेय.
 
देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या 3 नव्या व्हेरियंट्सचे 242 रुग्ण आढळले आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये युकेचा व्हेरियंट आढळला आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते रुग्णसंख्या वाढण्यामागे नवीन व्हेरियंट कारणीभूत नाही. कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी झाल्यानंतर लोकांना सावधगिरी बाळगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे आकडेवारी वाढलेली दिसतेय.
 
मात्र, शास्त्रज्ञ महाराष्ट्र आणि तेलंगणामधल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये सापडलेल्या दोन व्हेरियंटचा अभ्यास करत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये संसर्गाचा दर वाढला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजीत कुमार सिंह म्हणतात, "या दोन व्हेरियंटचा संसर्ग वाढण्याशी काही संबंध आहे का, हे तपासण्यासाठी आम्ही अधिकाधिक नमुने गोळा करतोय."
 
जानेवारीत जिनोम शास्त्रज्ञांच्या एका गटाने भारतात 'पूर्ण क्षमतेने जिनोम सिक्वेंसिंग होत नसल्याचं' म्हटलं होतं. "देशात 1 कोटी 40 लाख केसेस असतानाही त्यापैकी केवळ 6400 जिनोम साठवण्यात आल्याचं" त्यांनी सांगितलं.
कोरोना विषाणूच्या व्हेरियंटचा धोका बघता देशात 10 जिनोम प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. आलेल्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेंस करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
 
साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. शाहीद जमील म्हणतात, "ज्यापासून धोका आहे असा कुठलाही व्हेरियंट पसरू नये, याकडे सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या असा कुठलाही व्हेरियंट पसरत नाही याचा अर्थ भविष्यातही असं होणार नाही, असा नव्हे. त्यामुळे असं काही घडण्यापूर्वीच आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचं आहे."
 
आणि यासाठीच जिनोम सिक्वेंसिंग महत्त्वाचं आहे. भारतातल्या जिनोम सिक्वेंसिंगला चालना देण्यासाठी सरकारने 1 कोटी 40 लाख डॉलर्सची तरतूद केली आहे. पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या आणि व्हायरल लोड अधिक असणाऱ्या नमुन्यांपैकी किमान 5% नम्युन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. "हे शक्य असल्याचं" दिल्लीतल्या जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी या जिनोमिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणतात.
 
विषाणूमध्ये काय बदल घडून येत आहेत, हे तपासण्यासाठी भारतात गेल्या 10 महिन्यात 22 राज्यांतून गोळा करण्यात आलेल्या 6000 नमुन्यांचं सिक्वेंसिंग करण्यात आलं आहे. (यातल्या बहुतांश नमुन्यांमध्ये एकच व्हेरियंट आढळून आला आहे आणि तो युरोपातून भारतात आला असण्याची शक्यता आहे.) या अभ्यासात विषाणूमध्ये जवळपास 7600 बदल म्हणजेच म्युटेशन झाल्याचं आणि ही म्युटेशन्स अजिबात घातक नसल्याचं हैदराबादमधल्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे (CCMB) संचालक डॉ. राकेश मिश्रा सांगतात.
 
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार देशातल्या इतर कुठल्याही शहराच्या तुलनेत बंगळुरूमधल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक म्युटेशन्स आढळले आहेत. याचाच अर्थ विषाणूमध्ये पूर्वीपेक्षा अधिक वेगाने बदल होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
संशोधकांना बंगळुरूमध्ये 3 व्हेरियंट्स आढळले आहेत. या प्रत्येकामध्ये 11 पेक्षा जास्त म्युटेशन्स दिसले. अशी एकूण 27 म्युटेशन्स झाली आहेत. म्युटेशनची राष्ट्रीय सरासरी 8.4 आहे तर जागतिक सरकारी 7.3 आहे. याचाच अर्थ बंगळुरूमध्ये आढळलेली म्युटेशन्स राष्ट्रीय आणि जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
 
भारतासारख्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर जिनोम सिक्वेंसिंग करणं सोपं नाही.
यासाठी सर्वात आधी प्रयोगशाळांना स्थानिक नमुने गोळा करावे लागतात. यासाठीची प्रक्रिया देशभरात वेगवेगळी आहे. नमुन्यात विषाणू आहे की नाही शोधण्यासाठी लागणारे रासायनिक घटक (Reagents) परदेशातून आयात करावे लागतात आणि ते महागडे आहेत. नमुने फ्रिझरमध्ये साठवले जातात आणि मशिनद्वारे जिनोम सिक्वेंसिंग होतं.
 
एका नमुन्याच्या जिनोम सिक्वेंसिंगचा खर्च 75 डॉलर्सपर्यंत येऊ शकतो. शिवाय, प्रशिक्षित कर्मचारी नमुने गोळा करतात, त्या नमुन्यांना खास डब्यांमध्ये साठवलं जातं आणि त्यानंतर त्यांना देशभरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवलं जातं. यात केरळची कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. ते दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून 25 नमुने दिल्लीतल्या जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये पाठवतात.
 
एका नमुन्याचं सिक्वेंसिंग करण्यासाठी जवळपास 48 तास लागतात. मात्र, परदेशातून आलेल्या आणि विलगीकरणात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेंसिंग करायचं असेल तर ते लवकर करावं लागतं. डॉ. मिश्रा सांगतात की त्यांच्या प्रयोगशाळेने नमुन्याचं संपूर्ण सिक्वेंसिंग न करता विषाणूमध्ये काही बदल घडून आला आहे का, हे अवघ्या 24 तासात शोधून काढण्याची पद्धत विकसित केली आहे.
कॅब्रिजमधले विषाणूतज्ज्ञ डॉ. रविंद्र कुमार गुप्ता म्हणतात, कोरोना विषाणूच्या बाबतीत "नेमकं काय घडतंय, हे जाणून घेण्यासाठी सिक्वेंसिंग अत्यंत गरजेचं आहे." भारतासारखा देश जिथे आरोग्य क्षेत्रावर खूप कमी खर्च केला जातो तिथे सिक्वेंसिंगसाठी यंत्रणा राबवली जाईल का, असा प्रश्न त्यांना पडतो.
 
डॉ. रविंद्र कुमार गुप्ता म्हणतात, "मला वाटतं सिक्वेंसिंग महत्त्वाचं आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे - अधिकाधिक लोकांना लस देणं. केवळ सिक्वेंसिंग करून लोकांचे प्राण वाचणार नाही किंवा धोरणं आखण्यासाठीही त्याचा उपयोग होणार नाही."
 
मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणतात त्याप्रमाणे भारत 'कोरोना विषाणू संसर्ग उच्चाटनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला असताना' (endgame of pandamic) व्हेरियंट्सचा शोध लावण्यावर भर दिला जातोय.
 
डॉ. मिश्रा म्हणतात, "भारतातली परिस्थिती चांगली आहे. कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या कमी आहे. हॉस्पिटलमध्ये गर्दी नाही आणि लसीकरणाची मोहीमही जोर धरू लागली आहे."
 
ते पुढे म्हणतात, "या सर्व प्रयत्नांना खीळ बसू शकते अशी केवळ एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट आणि तो कदाचित भारतातलाही असू शकतो."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती