पाकिस्तानातून आलेली गीता खरंच मूळची परभणीची राधा वाघमारे? DNA चाचणीतून कळणार सत्य

गुरूवार, 11 मार्च 2021 (16:37 IST)
पाकिस्तानातून अनेक वर्षं राहून भारतात 2015 साली परतलेली गीता अद्यापही तिच्या घराच्या शोधात आहे. पाकिस्तानातून परतलेली गीता ही महाराष्ट्रातली राधा वाघमारे असल्याचं पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटलंय. पण सध्या तिची काळजी घेणाऱ्या पहल फाउंडेशनने डॉनच्या वृत्ताचा नकार केला आहे.
 
जन्मतः मूकबधीर असलेली गीता परभणीत असून पहल फाउंडेशन तिची काळजी घेत आहे. डॉनने दिलेलं वृत्त चुकीचं असल्याचं पहल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आणि सल्लागार डॉ. अशोक सेलगावकर यांनी म्हटलंय.
 
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "डॉनने म्हटलं आहे की गीता ही नायगावची आहे आणि तिचं नाव राधा वाघमारे आहे. तिचे वडील सुधाकर वाघमारे यांचं निधन झालं आहे. पण अद्यापही गीताचे खरे पालक कोण आहेत याची माहिती उपलब्ध नाहीये. गीताची आणि तिच्या संभाव्य पालकांची जोपर्यंत डीएनए चाचणी होत नाही तोवर गीताला तिचं खरं कुटुंब मिळालं असं आपण म्हणू शकत नाही."
गीताची आणि तिच्या संभाव्य पालकांची DNAचाचणी अद्याप करण्यात आलेली नाही.
 
गीताची याआधी काळजी घेणाऱ्या ज्ञानेंद्र पुरोहित यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील PTI ने दिलाय. अनेक माध्यमांनी हे वृत्त छापलेलं आहे. त्यानुसार गीताच्या पालकांचा शोध घेत ते परभणीतल्या जिंतूरमध्ये राहणाऱ्या मीना वाघमारे या महिलेपर्यंत पोहोचले. आपल्या हरवलेल्या मुलीच्या पोटावर भाजल्याची खूण असल्याचं मीना वाघमारेंनी सांगितलं आणि तशीच खूण गीताच्या पोटावरही आहे.
 
यावरून गीता या वाघमारे कुटुंबाची मुलगी असल्याचा अंदाज बांधला जातोय, पण DNA चाचणी करून याची खात्री पटवण्यात आलेली नाही.
 
पहल फाऊंडेशनच्या परभणीतल्या ऑफिसमध्ये गीता आणि मीना वाघमारे यांची भेट झाली. मीना वाघमारे यांचे पती सुधाकर वाघमारे यांचं निधन झालंय आणि तेच गीताचे वडील असल्याचं मीना वाघमारेंचं म्हणणं आहे.
 
कोण आहे गीता?
2000 सालच्या आसपास मूक-बधीर गीता चुकून समझोता एक्सप्रेसमध्ये चढली आणि थेट पाकिस्तानात पोहोचली होती.
 
2015 मध्ये दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला मायदेशी आणलं. पण पाच वर्षं उलटूनही गीता आई-वडिलांच्या शोधात आहे.
भारतातल्या कोणत्या शहरातून वा गावातून निघून ती पाकिस्तानात पोहोचली, याचा शोध घेण्यात येत होता. "एक नदी, त्याच्या किनाऱ्यावर असलेलं देवीचं एक मोठं मंदीर आणि कठडे असणारा पूल..." इतकंच गीताला तिच्या घराबद्दल आठवतंय.
 
2015 साली गीता पाकिस्तानातून भारतात आली तेव्हा तिथे तिची काळजी घेणाऱ्या ईधी फाउंडेशनने तिला भारतीय परराष्ट्र खात्याकडे सुपूर्त केलं होतं. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि गीताचीही भेट झाली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ती भेटली होती. त्यानंतर भारतात तिच्या पालकांचा शोध घेण्यात आला पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले.
 
सुषमा स्वराज यांनी गीताला एका इंदूरच्या सेवाभावी संस्थेकडे सुपूर्त केलं. इंदूरचे रहिवासी ज्ञानेंद्र आणि मोनिका पुरोहित यांच्याकडे गीता जानेवारी 2021 पर्यंत होती.
 
ज्ञानेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गीताच्या लहानपणीच्या आठवणींच्या आधारे महाराष्ट्रापासून ते छत्तीसगढ, तेलंगण पर्यंतचे रस्ते पालथे घालत तिच्या गावाचा शोध घेतला.
ज्ञानेंद्र यांच्या आदर्श सेवा सोसायटी संस्थेने बराच काळ गीताचे हावभाव, खाण्यापिण्याची पद्धत आणि तिच्या लहानपणच्या आठवणींचा अभ्यास केला आहे.
 
गीताने सांगितलेल्या आठवणी लक्षात घेता ती महाराष्ट्राशी लागून असलेल्या सीमाभागातली असेल, असा निष्कर्ष ज्ञानेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढला होता.
 
त्यानंतर आता गीता परभणीतील पहल फाउंडेशनमध्ये राहत आहे. सध्या ती सांकेतिक भाषा शिकत आहे. ती पाचवीची परीक्षा देखील पास झाल्याचं सेलगावकर यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती