कोरोना व्हायरस : रुग्णांना तसंच सोडून डॉक्टर पळून गेले? 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
रविवार, 6 जून 2021 (12:22 IST)
विनीत खरे
एप्रिल महिन्यात जेव्हा कोरोना संसर्गाची दुसरी लाट देशाला झोडपून काढत होती तेव्हा दिल्लीतल्या एका हॉस्पिटल वॉर्डमध्ये 6 जण मृत्युमुखी पडले. शेवटच्या क्षणी ते एकाकी होते.
हॉस्पिटलमध्ये पडलेल्या मृतदेहांचे व्हीडिओ व्हायरल झाले. तिथे कोणीही नव्हतं. बातम्या झाल्या, काही काळानंतर त्यांच्या हेडलाईन विरून गेल्या पण त्या रात्री तिथे नक्की काय झालं होतं हे नीट कळू शकलं नाही.
व्हायरल झालेल्या व्हीडिओत एक माणूस बोलताना ऐकू येतोय. कॅमेरा खोलीत फिरतो आणि तिथली दृश्यं दाखवतो.
"ना इथे डॉक्टर आहेत, ना केमिस्ट. रिसेप्शनवरही कोणी नाहीये," तो माणूस बोलत असतो आणि रूग्णांचे नातेवाईक आपल्या रूग्णांना जगवण्याची धडपड करताना दिसतात.
"डॉक्टर असे रुग्णांना मरायला सोडून पळून कसे जाऊ शकतात? तेही तुम्ही असताना," एक माणूस पोलिसांना विचारताना दिसतोय.
"मेलेत," एक माणूस म्हणतो. "सगळे मेलेत."
हा व्हीडिओ 30 एप्रिलच्या रात्री गुरूग्राममधल्या कृती हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये शूट केला होता.
मृत रुग्णांचे नातेवाईक म्हणतात की डॉक्टर्स दिसेनासे झाल्यानंतर ते आयसीयूमध्ये घुसले. आतही डॉक्टर्स नव्हते. हॉस्पिटलमधला ऑक्सिजन संपल्यानंतर डॉक्टरांनी पेशंटला मरायला सोडून दिलं, असा आरोप ते करतात.
तर हॉस्पिटलमध्येच लपून बसलेल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, रुग्णांच्या कुटुंबीयांकडून मारहाण होईल या भीतीने ते दडले होते. कुटुंबियांचं म्हणणं आहे की त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या दिल्या नव्हत्या.
या घटनेला एक महिना उलटून गेल्यानंतरही अंतर्गत चौकशीअंती रुग्णांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, हे समोर येणं बाकी आहे. याबाबतीत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ही चौकशी नक्की कधी पूर्ण होणार हे गुरुग्रामचे उपायुक्त यश गर्ग ठोसपणे सांगू शकलेले नाहीत.
मृतांच्या नातेवाईकांना दिलासा मिळालेला नाही.
'आमच्या नातेवाईकांना न्याय मिळावा'
एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता होती. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं होतं. हॉस्पिटल्स क्षमतेहून अधिक भरली होती आणि तरीही अनेक पेशंट हॉस्पिटल्सच्या बाहेर स्ट्रेचरवर शेवटचा श्वास घेताना दिसले. अगदी स्मशानभूमीतही रांगा होत्या.
या 6 पेशंटचा मृत्यू त्या काळात घडलेल्या अनेक दुःखद घटनांपैकी एक घटना होती. पण इथे जे घडलं ते इतकं धक्कादायक होतं की जगभरात त्याची चर्चा झाली.
पण हळूहळू ही बातमी मागे पडली आणि या मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाटेला आली ती निराशा.
एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार झाला होता ज्यावर आधी आशेचे आणि एकमेकांना आधार देणारे मेसेज शेअर केले जायचे, आता तिथे फक्त उदासी आणि हताशा भरली होती.
"आम्हाला आमच्या जिवलगांसाठी न्याय हवाय," 17- वर्षांच्या नमो जैन याने त्या ग्रुपमध्ये लिहिलं. त्याने त्या दिवशीच्या दुर्घटनेत आपले वडील गमावले आहेत. या गृपमधले लोक एकमेकांना आधी ओळखत नव्हते, जे घडलं त्यामुळेच ते एकत्र आले. आजही ते एकमेकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच ओळखतात.
"आम्ही एकमेकांना चेहऱ्याने ओळखत नाही, कधी पाहिलं नाही पण तरीही आम्हाला एकमेकांना आधार द्यायला हवा," निरूपमा वर्मा म्हणतात. निरूपमांच्या आई गीता सिन्हा त्या दुर्घटनेतल्या एक बळी आहेत.
अमनदीप चावलांचे वडील त्या सहा लोकांपैकी एक आहेत ज्यांचा 30 एप्रिलच्या रात्री मृत्यू झाला. अमनदीप म्हणतात की कृती हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे याची कोणतीही कल्पना त्यांना दिली नव्हती.
"आम्हाला हॉस्पिटलच्या स्टाफने सांगितलं होतं की, दोन गाड्या ऑक्सिजन आणायला गेल्या आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही," ते म्हणतात.
त्या रात्री हॉस्पिलच्या मुख्य प्रवेशदारावर ऑक्सिजन सिलेंडरच्या रांगा दिसल्याचं अमनदीप यांना आठवतं पण रात्री 9 वाजेपर्यंत ते सिलेंडर गायब झाल्याचं आणि त्यानंतर रुग्णांचे नातेवाईक घाबरल्याचंही ते सांगतात.
जसजशी रात्र चढत गेली, तसं तशी रुग्णांच्या कुटुंबीयांना अधिकच काळजी वाटायला लागली. त्यांच्या म्हणण्यानुसार एक वेळ अशी आली की हॉस्पिटलमधले डॉक्टर गायब झाले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी आयसीयूत जाऊन पाहायचं ठरवलं.
नातेवाईक आयसीयूत पोहचले तेव्हा तिथे कोणीही नव्हतं, फक्त त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह होते असं त्यांचं म्हणणं आहे.
"तिथे कोणीच नव्हतं, डॉक्टर्स नाही, हॉस्पिटलचे कर्मचारी नाही," अमनदीप सांगतात. "ते पळून गेले होते."
त्या रात्री हॉस्पिटलमध्ये नक्की काय आणि कसं घडलं याची खातरजमा बीबीसी करु शकलेलं नाही. दोन्ही बाजू आपआपलं म्हणणं मांडत आहेत. हॉस्पिटलच्या स्टाफने कधी वॉर्ड सोडला आणि तेव्हा पेशंट जिवंत होते की नाही, हे स्पष्ट नाही.
हॉस्पिटलच्या मालक स्वाती राठोड यांनी बीबीसीला सांगितलं की हॉस्पिटलचा स्टाफ काही काळासाठी "लपून बसला होता कारण त्यांच्यावर रुग्णांच्या कुटुंबीयांनी हल्ला केला होता." पण हल्ल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक नाकारतात.
"पेशंटला सोडून पळून जाणं आणि जिवाच्या भीतीने लपून बसणं यात फरक आहे," राठोड म्हणतात. त्या पुढे असंही सांगतात की जोपर्यंत त्या पोलिसांना बोलवत नाहीत तोपर्यंत त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना लपून बसायला सांगितलं होतं.
राठोड यांनी बीबीसीला एक व्हीडिओही पाठवला ज्यात लोक हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत आहेत आणि हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नासधूस करत आहेत. हा व्हीडिओ घटना घडली त्याच्या एक आठवडा आधीचा होता. त्यांचं म्हणणं होतं की अशाच प्रकारचे हल्ले ज्या रात्री आयसीयूत पेशंट मृत्युमुखी पडले त्या दिवशीही झाले.
"आम्ही आता आणखी हल्ले सहन करणार नाही," त्या म्हणतात.
मृतांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की हॉस्पिटल रुग्णांना एकटं सोडून देण्यासाठी जबाबदार तर आहेच पण नातेवाईकांना ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल खरी माहिती न देण्याबद्दलही दोषी आहे.
"कोणीतरी आम्हाला सांगायला हवं होतं की हॉस्पिटलमधला ऑक्सिजन संपला आहे," नमो जैन म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरी तीन ऑक्सिजन सिलेंडर होते, पण जोपर्यंत त्यांची बहीण ते सिलेंडर दवाखान्यात घेऊन आली तोवर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.
जुगेश गुलाटी यांचे वडील त्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते आणि त्या रात्री वाचले. जुगेश म्हणतात की त्यांनी एक जादा सिलेंडर आणलं होतं. कारण ऑक्सिजनची कमतरता भासू शकते याची त्यांना हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली होती. पण इतर अनेक कुटुंबांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना अशी काहीही कल्पना देण्यात आली नव्हती.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आता हताशपणा वाढत चालला आहे.
"या ग्रुपमध्ये थांबून काही अर्थ नाही," जैन यांनी नुकतंच लिहिलं.
पण निरूपमा वर्मा त्यांना धीर देत म्हणाल्या, "आपण एकत्र लढू."