लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.
लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.
मात्र, अशा पद्धतीने तेलकट-तुपकट, चमचमीत आणि गोड पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकांनी तर वजन वाढायला लागल्याच्या तक्रारीही सुरू केल्या आहेत.
बरं फक्त भारतातच नाही तर लॉकडाऊन असलेल्या जगातल्या सगळ्याच भागात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे.
इंग्लंडमध्ये राहणारी 19 वर्षांची क्लोए टेलर-विथॅम सांगते, "पूर्वी ऑफिसमधून घरी येताना मी ताजी फळं, भाज्या घरी आणायचे. आता मात्र, मॅक्डोनल्ड चीजसारख्या वस्तू फ्रीजमध्ये भरून ठेवल्या आहेत. तेच खाणं होतं."
इंग्लंडमधलेच 43 वर्षांचे अँडी लॉईड सांगतात, "मला डायबेटीस आहे. पण सध्या माझं चॉकलेट आणि बिस्कीट खाणं वाढलं आहे."
लॉईड यांना ओसीडी आहे आणि त्यासाठीची औषधंही सुरू आहेत. या औषधांमुळे त्यांचं वजनही वाढतंय. मात्र, ते म्हणतात, "मी कसा दिसतोय याचा मी फारसा विचार करत नाही. या कठीण काळात कसं जगायचं, हे अधिक महत्त्वाचं आहे. हे सगळं कधी संपणार आणि कामावर कधी परत जाता येईल, याचे विचार माझ्या मनात सुरू असतात."
मुंबईत राहणारे आनंदी कुलकर्णी सांगतात, "मला चार वर्षांची मुलगी आहे. शाळा बंद असल्याने आणि बाहेर खेळायला जाता येत नसल्यानं दिवसभर घरात बसून आता ती काहीशी कंटाळली आहे. खेळून, टीव्ही बघून कंटाळली की ती काहीतरी खायला मागते. फुटाणे, शेंगदाणे, राजगिऱ्याचे लाडू असं थोडफार पौष्टिक खाणं होत असलं तरी जंकफूडही थोड्या प्रमाणात देणं होतंच. तिला देताना दोन बिस्किटं, एक चॉकलेट आपलंही खाणं होतं. शिवाय, तेलकट आणि गोड खाणंही पूर्वीच्या तुलनेत वाढलं आहे."
अशी सगळी परिस्थिती बघता आपलं खाणं वाढलं आहे का, हा प्रश्न पडतो. याच प्रश्नाभोवती युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामधले संशोधक अभ्यास करत आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनशैलीत कोणते बदल झाले आहेत, हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.
प्रा. अॅनेमॅरी मिनिहॅने म्हणतात, "मी याची तुलना सुट्ट्यांशी करते. सुट्ट्यांमध्ये आपण अरबट-चरबट खातो, उशिरा उठतो. व्यायाम टाळतो. पण सुट्ट्याच तर आहेत, असं कारण त्यावेळी आपण देतो. यावेळीसुद्धा आपल्याला कोव्हिड-19 चं कारण मिळालं आहे. आपल्या वाईट सवयींसाठी आपण कोरोनाची सबब पुढे करतोय."
प्रा. मिनिहॅन आणि त्यांची टीम करत असलेलं संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही. मात्र, प्रा. मिनिहॅन यांना वाटतं की, लॉकडाऊनमध्ये लोकांच्या सवयी बिघडत आहेत. विशेषतः खाण्यापिण्याच्या. अपौष्टिक किंवा अनारोग्य वाढवणारे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढतंय.
अशा वर्तणुकीमागे काही मानसिक कारणं असल्याचंही त्या सांगतात. ताण वाढला की शरीरात कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक (हॉर्मोन) अधिक प्रमाणात तयार होतं. या संप्रेरकामुळे आपल्याला जास्त भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो. विशेषतः फॅट आणि शुगर जास्त असलेले पदार्थ.