कोरोना: देशात सलग दुसऱ्या दिवशी 62 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

रविवार, 28 मार्च 2021 (14:33 IST)
देशात अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांमध्ये कोरोनाचे 62 हजारहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 312 आहे.
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनं एक कोटींचा टप्पा ओलांडला असून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही 1 कोटी 19 लाखांच्या वर झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मे 2020 पेक्षा अधिक वाढ होत आहे. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या साप्ताहिक प्रमाणात वाढ झाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिवांनी ज्या 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, त्या राज्यांच्या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना होळी आणि शब-ए-बारातसारखे सण साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यामध्ये 27 मार्च रोजी 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 03 हजार 475 एवढी झाली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 लाख 73 हजार 461 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.58% आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट कमी होताना दिसतोय.
मुंबईत कोरोनाचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत शनिवारी (27 मार्च) 6130 रुग्ण आढळले, तर गुरूवारी आणि शुक्रवारीही रुग्णांचा आकडा पाच हजारांपेक्षा जास्त होता.
राज्यात नाइट कर्फ्यू, मुंबईत आठनंतर मॉल्स बंद
राज्यातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.
27 मार्च (रात्री 12वाजल्यापासून), रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास, 1 हजार रुपये दंड बजावण्यात येणार आहे.
सर्व सार्वजनिक ठिकाणं 27 मार्चपासून रात्री आठ ते सकाळी सात बंद असतील.
मास्कविना आढळणाऱ्या व्यक्तीला 500रुपये दंड ठोठावण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला 1,000 रुपये दंड करण्यात येणार आहे.
गार्डन आणि चौपाट्या या पब्लिक जागा रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहतील. सिनेमा गृह, मॉल आणि हॉटेलं रात्री 8 ते सकाळी 7 बंद राहणार मात्र होम डिलिव्हरी मात्र सुरू राहतील.
लग्न समारंभाला 50पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंत्यविधीला 20पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही.
विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक प्रशासनाला ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. क्वारंटीन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर तसं फलकाद्वारे सूचित करणं आवश्यक करण्यात आलं आहे. घरात क्वारंटीन व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात येणार आहे.
15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील असं राज्य सरकारने म्हटलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती