म्यानमार हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू, अमेरिकेकडून निषेध

रविवार, 28 मार्च 2021 (10:18 IST)
म्यानमारमध्ये शनिवारी (27 मार्च) 'ऑर्म्ड फोर्सेस डे' च्या दिवशी लष्कर आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.
शनिवारी संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, लष्कराच्या गोळीबारात 100 हून अधिक आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
असिस्टेंस असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स (एएपीपी) यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.
अमेरिका, ब्रिटन आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी म्यानमारमध्ये शनिवारी झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी ट्वीट करून म्हटलं, "म्यानमारमध्ये लष्करानं केलेला हिंसाचार पाहून आम्ही स्तब्ध झालो आहोत. लष्कर काही ठराविक लोकांची सेवा करण्यासाठी सामान्य नागरिकांचा बळी देत आहे, असं वाटतंय. हिंसाचारात बळी पडलेल्यांप्रति आम्ही संवेदना व्यक्त करत आहोत. म्यानमारमधील धाडसी जनतेनं लष्कराच्या दडपशाहीला नकार दिला आहे."
ब्रिटनचे राजदूत डेन चग यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं की, लष्करानं निःशस्त्र नागरिकांवर गोळीबार करून आपली प्रतिष्ठा गमावली आहे.
लष्कराकडून निःशस्त्र सामान्य नागरिकांची हत्या केली जात आहे, असं अमेरिकन दूतावासानंही म्हटलं आहे.
शनिवारी आंदोलनकर्ते आणि लष्करात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली. आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा लष्कराने आधीच दिला होता.
रंगून शहरात आंदोलनकर्त्यांना थोपवण्यासाठी लष्कराने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती.
बीबीसीचे प्रतिनिधी आंग थुरा यांना म्यानमारची राजधानी नेपिडाओमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. ते न्यायालयाबाहेरून वार्तांकन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी उठावापासून 40 पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान आंग सान सू ची यांच्यासहित अनेक लोकनियुक्त नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 16 जण अद्याप अटकेत आहेत. लष्करानं 5 माध्यम संस्थांचा परवाना रद्द केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती