कोरोना महाराष्ट्र : निमगुळ गाव कोणत्या तीन पर्यायांचा वापर करत झालं कोरोनामुक्त?

रविवार, 16 मे 2021 (10:55 IST)
प्राजक्ता धुळप
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ गावात संसर्गाचं थैमान घातलं. वेगाने वाढणारी साथ आटोक्यात कशी आणायची? सरकारी यंत्रणा कुठे-कुठे पुरुन उरणार? तीव्र लक्षणं दिसणाऱ्या आणि लवकर गंभीर होणाऱ्या रुग्णांचा जीव कसा वाचवायचा?
 
या प्रश्नांशी उत्तरं शोधण्यासाठी अख्ख्या गावाने कोरोना व्हायरसचा पाठलाग केला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि वेळेवर उपचार ही त्रिसूत्री वापरत सिंदखेड तालुक्यातल्या निमगुळच्या गावकऱ्यांनी अवघड वाटणारं कोरोनाविरोधातलं युद्ध कसं जिंकलं त्याची ही कहाणी.
 
देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती, तशी धुळे जिल्ह्यातल्या निमगुळमध्येही लोकांच्या कानावर बातम्या येऊ लागल्या. निमगुळ हे सिंदखेडा तालुक्यातलं साधारण 6 हजार 500 लोकसंख्येचं गाव.
मौसम बदलत होता, थंडीने काढता पाय घेतला तशी वातावरणाने कुस बदलली. गावातल्या लगबगीला आणि शेतातल्या कामांना वेग आला होता. गावात पापडाचा उद्योगही जोमात सुरू झाला होता. लग्नाचा गेला हंगाम असाच वाया गेला होता. त्यामुळे यंदा प्रथा पार पाडणं अंशतः लॉकडाऊन असलं तरी शक्य होणार होतं. वर्षभर कोरानाच्या चर्चांना गावकरी विटले होते.
 
खानदेशच्या या पट्ट्यात अहिराणी बोलली जाते.
 
हावू मरिजायजो करोना कतारिन ऊना
 
उबगाडी टाक यानी बठ्ठा लोकोसले
 
कदय जाईन बहिन
 
कटाई गवूत आते करोनाले...
 
गावकरी आपल्या भाषेतून कोरोनाच्या नावाने बोटं मोडत होते.
 
तशात या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गावात दोन लग्न पार पडली.
 
पण 26 फेब्रुवारीपासून गावात काही वेगळं घडतंय याची शंका एमबीबीएस डॉ. हितेंद्र देशमुख यांना आली. ते PHC म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्या PHC अंतर्गत 18 गावं येतात. इतर गावांमध्ये तुरळक केसेस होत्या, पण निमगुळमध्ये रोज दोन ते पाच पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडायला सुरुवात झाली.
 
अचानक वाढणाऱ्या केसेसनी त्यांचा संशय बळावला. त्यांनी गावातल्या खासगी डॉक्टरांना बोलावून घेतलं. आणि लक्षणं असलेल्यांची कोव्हिड चाचणी करुन घेण्याचं ठरलं.
 
घरोघरी जाऊन सर्व्हे करणारी टीम
"लोक डॉक्टरकडे जाण्याआधी पहिल्यांदा मेडिकल स्टोअरमध्ये चौकशी करायला जातात आणि आपल्याला कोरोनाची लागण होऊच शकत नाहीत असं म्हणत खासगी डॉक्टरांकडे जातात."
 
चौकशी केल्यावर लक्षणं कोव्हिडची आहेत आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत ती अधिक तीव्र दिसतायत, हे डॉ. देशमुखांच्या लक्षात आलं.
कोव्हिडची लक्षणं ऐकिवात असूनही तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे यायला गावकरी तयार नव्हते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई कीट आणि आयसोलेशनसाठी उचलून जबरदस्तीने कोव्हिड सेंटरला नेलं जातं याची धास्ती गावकऱ्यांनी घेतली होती.
 
सरकारच्या कोव्हिड गाईडलाईन्सनुसार त्यांनी निमगुळ गावाचा आधी आरोग्य सर्वे करायचं ठरवलं. गावात घरोघरी जाऊन माहिती आणि प्राथमिक तपासणी करणाऱ्या चार टीम बनवण्यात आल्या. प्रत्येक टीममध्ये आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य नेमण्यात आले. आणि या चारही टीमवर देखरेख करणारे दोन आरोग्य कर्मचारी.
 
1 मार्चपासून दारोदारी जाऊन सर्वे करणं सोपं नव्हतं. ऑक्सिजनची पातळी पाहण्यासाठी ऑक्सिमीटर आणि शरीराचं तापमान पाहण्यासाठी थर्मल मशिन घेऊन नोंदी सुरू केल्या, गावात आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या सुनिता सैंधाने सांगत होत्या.
 
"आम्ही सकाळी सर्व्हेला सुरुवात करायचो. दिवसाला रोज शंभर घरं अशी टीमकडे 400 घरांची माहिती गोळा व्हायची. लोकांना घराबाहेर बोलवून रांगेत उभं करायचो. समजूतदार माणसं चांगला प्रतिसाद द्यायची, पण सुरुवातीला लोक संतापायचे. आम्हाला काहीच लक्षणं नाहीत. त्यामुळे आम्हाला कोव्हिड असूच शकत नाही, यावर वाद घालायचे. तुम्हीच गावात कोरोना पसरवताय असा आरोप करायचे. पण तरीही लोकांचं काऊंन्सलिंग करण्यात वेळ जायचा."
 
अँटीजेन रॅपिड चाचणीवर भर
सौम्य लक्षणं असणाऱ्यांना गावातल्याच आरोग्य केंद्रात अँटीजेन चाचणी करण्यासाठी पाठवलं जाऊ लागलं. 4 मार्चला ज्या 90 जणांची अँटीजेन चाचणी केली गेली त्यातल्या 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना पुढे RT-PCR साठी पाठवलं गेलं.
वाढती रुग्णसंख्या पाहुन प्राथमिक आरोग्य केंद्राने 300 अँटिजेन टेस्ट कीट्सची मागणी केली. चाचण्यांवर भर दिल्याने हा आकडा वाढत जाणारा होता. पण रुग्णांना शोधणं त्यामुळे टीमला शक्यही झालं.
 
मार्चच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांचा आकडा 80च्या पुढे सरकायला लागला तसा गाव सील करण्याचा निर्णय तहसिलदारांनी घेतला. गावात भीतीचं वातावरण तयार झालं.
 
ग्रामसभा ठरली निर्णायक
गावात वेगानं पसरणाऱ्या कोरोनाचं लोकांना गांभीर्य वाटायला हवं म्हणून 10 मार्चला एक ग्रामसभा घ्यायचं ठरलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे हे ग्रामसभेच्या निमित्ताने अधोरेखित झालं. रात्री झालेल्या ग्रामसभेला जवळपास 800 लोकांच्या उपस्थिती होती. त्यानंतर गावात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
गावातल्या सगळ्या पक्षांची नेतेमंडळीही या ग्रामसभेत हजर होती. निमगुळ ग्रामपंचायतीचे गटनेते नंदलाल बागल सांगतात की, सर्वांनी कोणतंही राजकारण आणि भेदभाव न करता सगळ्या नियमांचं पालन केलं.
गावात त्याच सुमाराला लसीकरण सुरू झालं होतं. कोव्हिड होण्याचं कारण लस तर नसेल याविषयीच्या शंका-कुशंकाना गावात उधाण आलं होतं. ग्रामसभेत या शंकांचंही निरसन केलं गेलं. प्राथमिक आरोग्य केंद्रातच चाचणी केली जाईल आणि असिम्पटमॅटिक रुग्णांना अलगीकरणासाठी दुसरीकडे उचलून नेणार नाही असा लोकांना विश्वास दिला गेला.
 
ग्रामपंचायतीने मास्क न घालणाऱ्या व्यक्तिला 100 रुपयांचा दंड केला. दवंडी पिटवून लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जात होता. दुकानदारांना कोव्हिड चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आणि लसीकरणाची सक्ती करण्यात आली.
 
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर कसा दिला भर?
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा 'पाठलाग' करायचा कसा याची रणनिती आखण्यात येत होती. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, सॅनिटायझेशनवर जोर देत 5 हजाराची लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना संसर्गाचा मागोवा म्हणजेच ट्रेसिंग करायचं कसं हे मोठं आव्हान होतं.
अँटीजेन रॅपिड चाचणीची अचूकता 50 टक्के असते, असं तज्ज्ञ सांगतात. तरीही अर्ध्या तासात झटपट रिपोर्ट देणारी चाचणी इथे वापरली जात होती. त्यातून सापडेलेले पॉझिटिव्ह रुग्ण RT-PCR साठी जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येत होते.
 
पहिल्या लाटेत कोव्हिडचे फारसे रुग्ण नव्हते, म्हणून जवळचं कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली होती, ते मार्चमध्ये पुन्हा सुरू केलं गेलं.
 
"ऑक्सिमीटर आणि थर्मल गनच्या जोरावर रुग्ण शोधता येत असले तरी रुग्ण आमच्या नजरेतून कुठे सुटतायत ही गॅप शोधून काढणं गरजेचं होतं. ती गॅप आम्हाला सापडली. रुग्णांना सर्दी-पडशाचं, टायफॉईड, निमोनियाचं लेबल लावले जाऊन उपचार होण्याची दाट शक्यता होत.
लोक खासगी डॉक्टरांकडे आणि खासगी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये जात होते. हे रुग्णांनी स्वतःहून न सांगता सहजासहजी आम्हाला कळणं शक्य नव्हतं. तसंच गावाबाहेरच्या खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांना गावात काय सुरू आहे याच्याशी काही देणं-घेणं नसतं"
 
त्यावर उपाय म्हणून कोरोनाचा माग काढण्यासाठी डॉ. देशमुखांनी स्वतंत्रपणे आणखी एक टीम बनवली. त्यात गावातले दोन खासगी डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स चालवणारे आणि जवळपासच्या खासगी लॅबचे कर्मचारी यांचा समावेश होता.
 
"निमोमिया झालेल्या रुग्णाने सात-आठ किलोमीटरवर असलेल्या दौंडाईचाच्या खासगी लॅब्समधून सीटी स्कॅन करुन घेतला असेल तर तो लॅबने प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवणं बंधनकारक करण्यात आलं. खासगी डॉक्टरांसोबतच्या संवादाचाही चांगला फायदा झाला. त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोव्हिडची रॅपिड टेस्ट करणं बंधनकारक केलं. परिणामी अवघ्या 15 दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 216 पार गेला."
 
खासगी डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका
24 वर्षांचा सतीश डोकं दुखत होतं 9 मार्चला खासगी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं. त्याला कोव्हिड झाल्याचं निदान झाल्यावर होम क्वारंटाईन करुन उपचार सुरू झाले. त्यानंतर आठ दिवसांनी त्याच्या 54 वर्षांच्या आईवरही कोव्हिडचं निदान झाल्यावर घरीच उपचार सुरू झाले. दोघंही आजारातून वेळीच निदान आणि उपचार झाल्यामुळे आजारातून सहीसलामत बाहेर पडले.
वीस वर्षं खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या गावातले डॉ. विरेंद्र बागुल कोव्हिडच्या काळात यंत्रणेसोबत काम करतायत. रुग्णांनी लवकरात लवकर कोव्हिड चाचणी करावी यासाठी ते प्रोत्साहन देतात.
 
ते सांगतात- गेल्या दोन महिन्यात 18 वर्षांखालील पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोव्हिडची लक्षणं असूनही 'मला आजार झालेलाच नाही' असं म्हणणारी एक व्यक्ती अचानक गंभीर होऊन मरण पावली. हे धक्कादायक होतं. अशी परिस्थिती गेल्या वर्षी नव्हती.
 
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जितकी जास्त आढळून येते तितका भविष्यातला धोका लवकर टाळता येतो, असं डॉ. देशमुख सांगतात.
 
'वेळीच उपचार सुरू होणं गरजेचं'
पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी करणं, आणि त्यांचं होम आयसोलेशन करणं यावर जोर दिला जात होता. मार्चपासून आढळलेल्या 40 टक्के रुग्णांना होम क्वारंटाईन आणि 60 टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. हेच प्रमाण गेल्या वर्षी नगण्य होतं.
 
कोव्हिडच्या लक्षणांची तीव्रता जास्त असल्याने रुग्णावर वेळीच उपचार सुरु झाले नाहीत तर गंभीर परिणाम व्हायचे. तिथपर्यंत वेळ येऊ नये म्हणून निमगुळने दोन महिने अँटीजेन आणि RT-PCR चाचणीवर भर दिला.
 
RT-PCR ला तीन ते चार दिवस लागत असल्याने अँटिजेन चाचणी ही पहिली पायरी होती. 1 मार्चपासून निमगुळमध्ये 3 हजारांपेक्षा जास्त अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या.
 
तपासणीचा आणखी एक फायदा असाही झाला की, सारीच्या साथीचे जवळपास 500 रुग्ण आढळून आले असं डॉ. देशमुख सांगतात.
 
वेगाने केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि क्वारंटाईन यामुळे कोरोनाचा पाठलाग करणं संसर्ग रोखणं यंत्रणांना शक्य झालं नसतं. आणि लोकांचा सहभाग नसता तर खिंडीत गाठलेल्या व्हायरसला नामोहरम करणं निमगुळला शक्य झालं नसतं.
 
व्हॉट्स अॅपवरच्या गैरसमज आणि अफवांना गावकऱ्यांनी नाकारलंय. गावातले लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आलेयत. मृत्यू आणि आजारपण गावाने जवळून पाहिलंय. अंत्यविधी कमीत कमी माणसांमध्ये केली जातायत. शोकाकुल कुटुंबानी नातेवाईकांना सांत्वन करायला नंतर या अशी विनंती केलीये.
 
तरुणांनी घोळक्याने गप्पा मारणं बंद केलंय, असं लोक सांगतायत. मोठ्यांची सुरक्षा आपल्या हाती असल्याचं तरुणांना ग्रामसभेनंतर उमगलंय.
 
1 मे पासून गावात एकही कोव्हिडचा रुग्ण आढळलेला नाही. आज निमगुळ कोरोनामुक्त झालंय. पण युद्ध कायमचं संपलेलं नाही. सावध चाहुल घेत कोरोनाचा माग काढत राहणं निमगुळमध्ये सुरूच राहणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती