कोरोना : 'या' 9 शहरांमुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलीय का?

गुरूवार, 25 मार्च 2021 (20:50 IST)
हर्षल आकुडे
कोरोना व्हायरसने गेल्या वर्षी लॉकडाऊन या शब्दाची आपल्या सर्वांना ओळख करून दिली होती. याच लॉकडाऊनची बुधवारी (24 मार्च) वर्षपूर्ती झाली. या व्हायरसवरची लसही विकसित झाली आहे. पण अजूनही कोरोना व्हायरसची टांगती तलवार आपल्या डोक्यावरून हटलेली नाही.
उलट गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट आणखी गंभीर स्वरुप घेताना दिसत आहे. नुकतेच केंद्र सरकारनेही आपल्या एका निवेदनात महाराष्ट्रातील कोव्हिड परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून भारतातील टॉप 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती नुकतीच आरोग्य मंत्रालयाने दिली होती.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध बैठकांचं सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे हेसुद्धा वारंवार महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा देत आहेत.
एकूणच, महाराष्ट्रातील कोरोना स्थिती आता गंभीर टप्प्यावर आहे. आताच काही हालचाली केल्या नाहीत तर कोरोना रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोनाची स्थिती कशी आहे, याची सविस्तर आढावा आपण या बातमीत घेऊ -
 
देशातील टॉप 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्हे
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली होती. ही माहिती महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून अत्यंत धक्कादायक आहे.
देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असलेल्या टॉप 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राची 9 शहरे असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशातील कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलेलं आहे.
 
त्यातही पुणे शहर सध्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचं केंद्र बनलं असून सध्या पुणे सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
 
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार -
1. पुणे (सक्रिय रुग्ण - 43,590)
 
2. नागपूर (33160)
 
3. मुंबई (26599)
 
4. ठाणे (22513)
 
5. नाशिक (15710)
 
6. औरंगाबाद (15380)
 
7. बंगळुरू (10766)
 
8. नांदेड (10106)
 
9. जळगाव (6087)
 
10. अकोला (5704)
या 10 शहरांमध्ये कोरोना परिस्थिती बिकट बनली आहे.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोव्हिड सद्यस्थितीबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध केलं.
यानुसार, भारतात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 86 हजार 796 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 25 लाख 33 हजार 026 इतके रुग्ण आहे.
आजच्या घडीला देशात 3 लाख 45 हजार 377 सक्रिय रुग्ण असून महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 241 इतके सक्रिय रुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील पंजाबमध्ये हाच आकडा 18 हजार 628 इतका आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळत असताना बुधवारी या संख्येने कळस गाठला. बुधवारी (24 मार्च) महाराष्ट्रात तब्बल 31 हजार 855 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोना साथ सुरू झाल्यापासून हा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. याशिवाय 95 कोरोना मृत्यूंचीही नोंद राज्यात झाली
म्हणजेच, संपूर्ण महाराष्ट्र राज्यच देशातलं कोरोनाचं केंद्र बनल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
आता आपण महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमधील परिस्थितीबाबत माहिती घेऊ -
 
पुणे -
बुधवारी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1566, पिंपरी चिंचवडमध्ये 1828 आणि पुणे ग्रामीण परिसरात 1360 अशा एकूण 6754 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
पुण्यात सध्या शाळा, महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून थिथीलता आहे. असेल. हॉटेल दिवसभर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील आणि रात्री 10 वाजता बंद होतील. रात्री 11 पासून सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असेल. MPSC क्लासेस, लायब्ररी तसंच MPPML बस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
 
नागपूर -
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी 2965 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर नागपूर ग्रामीणमध्ये 782 नवे रुग्ण आढळले. सध्या नागपूरमध्ये 33 हजार 160 सक्रिय रुग्ण आहेत.
नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सध्या कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळीत होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली होती.
 
नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन लावूनही करोनाचे आकडे काही कमी झाले नाहीत.
 
नागपुरात करोनाचे रुग्ण एवढ्या झपाट्याने का वाढत आहेत, हा नवा स्ट्रेन तर नाही याची खात्री करण्यासाठी दिल्लीला नमुने पाठविण्यात आले होते. म्युटेशन झाल्यानेच हा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याची चर्चा वैदयकीय क्षेत्रात होती. मात्र अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा असून त्यानंतरच याबाबत स्पष्ट सांगता येईल, असे राऊत म्हणाले.
 
मुंबई -
बुधवारी एकाच दिवसात मुंबईत तब्बल पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याचं महापालिकेनं जाहीर केलं. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली.
 
कोव्हिडच्या पहिल्या लाटेदरम्यान सुरुवातीला धारावी आणि वरळीमध्ये आणि मग पश्चिम उपनगरांत मोठ्या प्रमाणात या आजाराचा प्रसार होत असल्याचं दिसून आलं होतं. यावेळी पश्चिम उपनगरांमध्ये त्यातही वांद्रे ते अंधेरी परिसरात आणि अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम, ओशिवारा अशा भागांत रुग्णसंख्या वेगानं वाढते आहे.
विशेषतः अंधेरी परिसरात लोकसंख्येची घनता जास्त आहे, घरं दाटीवाटीनं वसलेली आहेत आणि इथे लोकांचा वावरही जास्त आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत गर्दी पाहायला मिळते. लोक मास्क तर लावतायत, मात्र सगळेच जण नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मुंबईत संसर्गाचा धोका वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
यावेळेस मृत्यूदर तुलनेनं कमी आहे. आणि तुलनेनं कमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. पण ICU बेड्सचा विचार केला, तर 1,559 पैकी 538 बेड्सच शिल्लक आहेत.
 
8,851 ऑक्सिजन बेड्सपैकी 3,860 बेड्सच शिल्लक आहेत तर व्हेंटिलेटर बेड 978 पैकी 281 च शिल्लक आहेत.
 
दिलासा देणारी गोष्ट म्हणजे यावेळेस लसीकरणही सुरू झालं आहे. 23 मार्चपर्यंत मुंबईत 9 लाख 40718 जणांना लस मिळाली. पण लसीकरणाचा वेग अजूनही कमी आहे.
 
ठाणे -
ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातही कोरोना व्हायरसची वाढ झपाट्याने होत आहे. बुधवारी ठाणे ग्रामीणमध्ये 464 कोरोना रुग्ण आढळले. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 827, नवी मुंबई 566, कल्याण-डोंबिवली 929, उल्हासनगर 70, भिवंडी-निजामपूर 44, मिरा-भाईंदर 189, पालघर 110, वसई-विरार 212, तर पनवेलमध्ये 316 रुग्ण आढळून आले.
मुंबईप्रमाणेच या परिसरातही कोरोनासंदर्भात नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. होळीनिमित्त ठाण्यातील निर्बंध 22 मार्च ते 2 एप्रिलदरम्यान लागू असतील.
मुळे होळीनिमित्ताने कुणीही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये. सर्व नागरिकांनी घरातच साधेपणाने आणि शांततेने हा उत्सव साजरा करून जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
 
नाशिक -
नाशिकमध्ये बुधवारी एकूण 1620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण 760 तर महानगरपालिका परिसरात 859 रुग्णांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्याच्या क्षणी 15 हजार 710 सक्रिय रुग्ण आहेत. येथील रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे.
पालिकेच्या रुग्णालयातील एकूण बेडची क्षमता 3284 इतकी आहे तर, मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात सरकारी रुग्णालयात 327 रुग्ण उपचार घेत होते.
 
तसंच नाशिकमध्ये 2957 ICU आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. तर, शहरात 5 हजार व्हॅक्सीनचा साठा उपलब्ध आहे. व सरकारकडून आणखी 50 हजार डोस मागवण्यात आले आहेत. शहरात सध्या 533 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.
 
10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तसंच नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत.
 
शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत.
 
बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
 
औरंगाबाद -
औरंगाबादमधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 48.20 इतका आहे. महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटीचं सर्वाधिक प्रमाण औरंगाबाद जिल्ह्यातच आहे.
सध्या औरंगाबादमध्ये 15 हजार 380 सक्रिय रुग्ण असून बुधवारी औरंगाबाद महापालिका आणि ग्रामीण मिळून 1451 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या ११ मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा रविवारी करण्यात आली. ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असलं तरी या कालावधीत वैद्यकीय सेवा, माध्यमांची कार्यालये, दुध विक्री, भाजीपाला आणि फळविक्री सुरू ठेवण्यात येणार आहे.
"गर्दी टाळता येईल आणि अनावश्यक गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं वाढतोय त्याला आळा घालता येईल अशा प्रकारचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. संपूर्ण शहरात मास्कचा वापर केला गेला पाहिजे, सुरक्षित अंतरही ठेवलं पाहिजे या सर्व बाबींकडे लक्ष देण्यात आलं आहे. सर्वांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे," असं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
नांदेड -
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेल प्रशासनाने येथे लॉकडाऊन घोषित केलं आहे.
बुधवारी नांदेड ग्रामीणमध्ये 372 तर महापालिका क्षेत्रात 650 असे एकूण 1022 नवे रुग्ण आढळले.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी, लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मेळावे, आठवडी बाजार,सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल्स, बार, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, चित्रपटगृह, मॉल जलतरण तलाव ,राजकीय सभा, मटण चिकनची दुकाने, पार्लर, सलून, बंद असतील.
अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, मेडिकल, पेट्रोल पंप, गॅस पंप चोवीस तास सुरू राहणार आहेत. सकाळी 7 ते 12 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणीपुरवठा, फळ व भाजीपला विक्री सकाळी 7 ते 10 दरम्यान चालू राहील.
 
जळगाव -
जळगाव महापालिका आणि ग्रामीण भाग मिळून बुधवारी 190 रुग्ण आढळून आले. येथील सक्रिय रुग्णांची संख्या 6087 इतकी आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच कोरोना प्रतिबंधक निर्बंध जळगावमध्ये लागू आहेत.
 
अकोला -
राज्यातील 9 जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट मध्ये अकोल्याचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. जिल्ह्यात 6179 कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच कोरोना बधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. अकोल्यात सध्याचा मृत्युदर 1.37 टक्क्यांवर पोहोचलाय. आतापर्यंत कोरोना मृतांचा संख्या 434 इतका झालाय. बुधवार 24 तारखेला 1704 जणांच्या चाचणी अहवालात 341 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बधितांचा आकडा 350 वर स्थिरावला असला शासनाची झोप उडवणारा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती