अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तुरुंगातून लढवता येते का?
रविवार, 2 जून 2024 (15:33 IST)
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील खटला म्हणजे अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व घटना आहे. ट्रम्प हे एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मॅनहटनच्या न्यायालयानं ज्या 34 गुन्ह्यांसाठी ट्रम्प यांना दोषी ठरवलं, ते पाहता ट्रम्प तुरुंगात जाण्याची शक्यता कमी आहे.
ट्रम्प या निकालाविरोधात अपील करतील आणि तरीदेखील तोच निकाल कायम राहिला तर त्यांना दंड वगैरे भरावा लागण्याची शक्यताच अधिक आहे.
मात्र, सर्वात वाईट शक्यता म्हणजे तुरुंगात जाण्याची वेळ येणं. ती वेळ देखील आली तरी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार राहू शकतात.
अशावेळी ट्रम्प तुरुंगातून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
दोषी व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढू शकते का?
1789 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीच्या कायदेशीर पात्रतेच्या नियमात बदल झालेला नाही.
लंडनस्थित इतिहासाचे प्राध्यापक इवान मॉर्गन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महत्त्वाची पात्रता म्हणजे संबंधित उमेदवाराचा जन्म अमेरिकेत झालेला असला पाहिजे आणि त्याचं वय 35 वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे. या नियमामुळेच बराक ओबामांच्या वेळी त्यांच्या अमेरिकन असण्या-नसण्याबाबत चर्चा झाली होती."
यादवी युद्धानंतर अमेरिकेत 14 वर्षे राहण्याचा नियमदेखील लागू करण्यात आला. अमेरिकेविरोधात बंडात सहभागी झालेल्या लोकांना यापासून रोखण्यासाठी हा नियम करण्यात आला होता.
अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात या नियमाच्या वापराच्या कोणत्याही शक्यतेला सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं आहे.
मात्र, शिक्षा झालेल्या व्यक्तीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी लढवण्याबाबत कोणतीही बंदी नाही.
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात, "अमेरिकेचा जन्म क्रांतीतून झाला होता आणि त्यामुळे कोणतीही व्यक्ती जी राजेशाहीच्या विरोधात केलेल्या कारवायांमुळे तुरुंगात असेल तर त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं जाण्याची शक्यता होती."
1787 मध्ये अमेरिकेचं संविधान बनवण्यासाठी झालेल्या परिषदेच्या संस्थापक नेत्यांपैकी कोणालाही ब्रिटिशांशी तुरुंगात टाकलं नव्हतं. मात्र, त्यातील काही लोकांना तुरुंगात टाकलं जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ते सांगतात, "जर क्रांती यशस्वी झाली नसती तर त्यांना राजेशाहीच्या विरोधात बंड केल्याबद्दल दोषी ठरवलं गेलं असतं आणि गुन्हेगार ठरवलं गेलं असतं."
याच कारणामुळे संविधान लिहिणाऱ्या लोकांनी राष्ट्राध्यक्ष कोण बनू शकतं यावर खूप जास्त बंधनं घातली नाहीत आणि या धोरणामुळे तीन उमेदवारांनी तुरुंगातून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार केला होता.
यूजीन वी डेब्स
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात, "तुरुंगात असताना 1920 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे सर्वात महत्त्वाचे उमेदवार होते यूजीन डेब्स."
डेब्स यांना पहिल्यांदा 1894 मध्ये तुरुंगवास झाला होता. त्यांनी एक कामगार संघटनेचा नेता म्हणून एका ट्रेन कंपनीच्या विरोधात बंद पुकारला होता. त्यामुळे त्यांना रेल्वे रोखल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.
सैन्यानं हा बंद तोडला होता आणि डेब्स यांना सहा महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. या अनुभवामुळे त्यांच्या राजकीय दृष्टीकोनावर खूप प्रभाव पडला होता.
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात, "20 व्या शतकाच्या सुरूवातीला ते सोशॅलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेचे प्रमुख सदस्य बनले होते. 1904, 1908, 1912 आणि 1920 मध्ये ते राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते."
डेब्स यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीच्या तिकिटावर 1900 मध्ये देखील निवडणूक लढवली होती.
"1912 मध्ये एक चतुरंगी लढत झाली होती. यामध्ये डेमोक्रॅट वुड्रो विल्सन, रिपब्लिकन पक्षाचे विलियम हॉवर्ड टाफ्ट, पुरोगामी आणि माजी रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांचा समावेश होता."
डेब्स यांनी खूप ताकदीनं निवडणूक लढवली होती आणि जवळपास 10 लाख मतं म्हणजे एकूण मतांपैकी 6 टक्के मतं मिळवली होती. अमेरिकेत सोशॅलिस्ट पार्टीच्या उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मतं होती.
"मात्र पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन मतदारांमध्ये एक गोंधळ निर्माण झाला होता. तो असा की देशभक्तीच्या आधारावर पाठिंबा द्यावा की भांडवलवादी युद्धाला विरोध करावा?"
डेब्स युद्धाचे कठोर टीकाकार होते आणि अमेरिकनांनी यात सहभागी होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते.
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात, "युद्ध जवळपास संपणारच होतं, मात्र 1918 मध्ये अमेरिकन जनतेला युद्धाच्या मसुद्याला विरोध करण्याचं आव्हान त्यांनी केलं.
"त्यांना देशद्रोही ठरवण्यात आलं आणि एप्रिल 1919 मध्ये तुरुंगात पाठवण्यात आलं. तुरुंगात असतानाच पुढील वर्षी त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, तुरुंगातच त्यांची तब्येत बिघडली होती आणि 1926 मध्ये त्यांचा मृत्यू झाला."
लिंडन लरूश
लिंडन लरूश यांना वेगळ्या कारणांमुळे तुरुंगातून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी लागली. 1976 पासून 2008 पर्यत प्रत्येक निवडणुकीत सर्व डेमोक्रॅट किंवा इतर दुसऱ्या पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव मतपत्रिकेवर येत होतं.
लरूश यांनी 1940 च्या दशकात डाव्या विचारसरणीद्वारे राजकारणात पाऊल ठेवलं होतं. मात्र 1970 च्या दशकाच्या सुरूवातीपर्यत ते राष्ट्रवादाकडे झुकले होते.
लरूश यांनी आपल्या विचित्र जागतिक दृष्टीकोनाच्या आधारावर कमी कर आणि लोकानुनय करणाऱ्या आश्वासनांच्या जोरावर राजकीय आंदोलन उभं करायचे. मात्र त्यांच्या आंदोलनात 2000 पेक्षा अधिक लोक कधीच नसायचे.
आपल्याच लोकांवर हेरगिरी करण्यावर ते कठोर टीका करायचे.
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात की, आश्चर्यकारकरित्या 1986 मध्ये इलिनॉईस राज्यातील महत्त्वाच्या भूमिकांसाठी लरूश यांचं समर्थन असणाऱ्या उमेदवारानं ड्रेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी पटकावली. त्याचबरोबर लरूश यांनी खूप देणग्यादेखील गोळा केल्या.
प्राध्यापक मॉर्गन यांच्या मते, "या देणग्यांची एकूण रक्कम किती होती हे आपल्याला कधीही कळणार नाही. मात्र काही लोकांचा अंदाज आहे की ती रक्कम 20 कोटी डॉलर इतकी होती. या निधीतून त्यांनी स्थानिक, राज्य आणि अमेरिकन संसदेच्या निवडणुकांमध्ये खूप खर्च केला. मात्र त्यांना फार थोडं यश मिळालं."
1989 मध्ये त्यांना मेल फ्रॉड साठी दोषी ठरवण्यात आलं आणि 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
यानंतर 1992 ची निवडणूक आली. लरूश यांना ही निवडणूक लढवायची होती आणि काही राज्यांमध्ये मतपत्रिकेवर त्यांचं नावदेखील आलं होतं. त्यांना एकूण मतांच्या 0.1 टक्के म्हणजे 27,000 मतं पडली होती.
त्यानंतर त्यांची शिक्षा कमी करण्यात आली आणि 1994 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. यानंतर 1996, 2000, 2004 आणि 2008 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला होता.
निधी गोळा करण्याचं कौशल्य असताना आणि निवडणुकीत सातत्यानं उभं राहूनसुद्धा ते खूप प्रभाव टाकण्यात यशस्वी झाले नाहीत. 2019 मध्ये लिंडन लरूश यांचा मृत्यू झाला.
जोसेफ स्मिथ
जोसेफ स्मिथ यांनी 1830 मध्ये येशू ख्रिस्तावर केंद्रित असलेल्या मोर्मोनिज्म या संप्रदायाची स्थापना केली होती. हा संप्रदाय कॅथलिक, प्रोटेस्टंट्स आणि ऑर्थोडॉक्स विचारसरणीपेक्षा वेगळा होता.
त्यांनी आपल्या संप्रदायातील जवळच्या सहकार्यांसाठी अनेक विवाह करण्याची प्रथादेखील सुरू केली होती.
प्राध्यापक मॉर्गन म्हणतात की, "या गोष्टीकडे अमेरिकेच्या मूलभूत मूल्यांसाठीचा धोका म्हणून पाहिलं गेलं. अनेक विवाह करण्यास जगातील सर्वात वाईट गुन्हा मानलं जायचं आणि कथितरित्या स्मिथ यांना 20 पत्नी होत्या."
मूलत: स्मिथ मॅसेच्युसेट्सचे होते. मात्र आपल्या अनुयायांसाठी सुरक्षित जागेच्या शोधात ते इलिनॉईसला आले.
1940 च्या दशकात मोर्मोन यांनी मिसीसिपी नदीच्या काठावर आपलं एक वेगळं शहर वसवलं. तिथं शांततेनं राहून अध्यात्मात लीन होण्याची त्यांना अपेक्षा होती.
मात्र अनेक पत्नी प्रथेमुळे ते खूपच कुप्रसिद्ध झाले होते. त्यामुळेच त्यांना अनेक विरोधकदेखील निर्माण झाले होते.
स्मिथ यांनी आपल्या विरोधात लिहिणाऱ्या वृत्तपत्राच्या छापखान्याला नष्ट करण्याचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. यामुळेच त्यांना तुरुंगात जावं लागलं.
1844 च्या निवडणुकीत ते रिफॉर्म पार्टीचे उमेदवार होते.
पक्षानं बहुपत्नी प्रथेला प्रोत्साहन दिलं आणि स्मिथ यांच्या विचारांचा प्रचार केला की प्रत्येक मनुष्य परमेश्वर आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांमुले त्यांच्या शस्त्रूंची संख्या वाढत गेली.
त्यांच्या तुरुंगाबाहेर एका मोठ्या घोळक्यानं हल्ला चढवला आणि ते ज्या इमारतीत लपले होते, तिथे त्यांना गोळी मारण्यात आली.
मात्र, 1844 च्या निवडणुकीत रिफॉर्म पॉर्टीनं कोणताही पर्यायी उमेदवार दिला नाही.
राष्ट्राध्यक्षपदाचे तीन उमेदवार होते ज्यांनी तुरुंगात राहून निवडणूक लढवली होती. चौथे उमेदवार जोसेफ माल्डोनाडो-पेसेज असू शकतात. त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
2020 मध्ये 'टायगर किंग' या नेटफ्लिक्सच्या माहितीपटाचे स्टार आणि जोए एक्झॉटिक नावानं ओळखले जाणारे जोसेफ यांनी डेमोक्रॅट म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
प्राण्यांच्या बाबतीतील कौर्य आणि एक प्रतिस्पर्धी प्राणीसंग्रहालयाच्या मालकाची हत्या करण्याचा कट करण्याच्या आरोपांखाली ते 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.
आता ट्रम्प तुरुंगात जाणार की नाही, यामुळे ट्रम्प यांची स्थिती खूपच वेगळी तर होणार नाही. मात्र, तुरुंगातून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढणारे ते सर्वात महत्त्वाचे व्यक्ती ठरू शकतात.
जरी त्यांना तुरुंगवास झाला नाही तरी बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सुडवर्थ यांच्या शब्दात एका ध्रुवीकरण झालेल्या देशाच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी ते एक शिक्षा झालेले उमेदवार असतील.