प्रज्वल रेवण्णा प्रकरणाचा स्थानिक लोक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर काय परिणाम झाला ?

बुधवार, 29 मे 2024 (09:51 IST)
भारताच्या माजी पंतप्रधानांचे नातू आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असलेले प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ क्लिप असलेल्या पेन ड्राइव्ह उघड झाल्या.त्याला जवळपास एक महिना उलटून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात अस्वस्थता पसरली आहे.
 
देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत जवळपास पाच दशकं कर्नाटकातील हसन जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला आहे.
 
देवेगौडा जनता दल (सेक्युलर) या कर्नाटकातील प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपाबरोबर जनता दल (सेक्युलर)ची आघाडी आहे. देवेगौडांचा नातू असलेले प्रज्वल रेवण्णा हे विद्यमान खासदार असून NDAचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत.
 
देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी दोनदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते तर देवेगौडांचे दुसरे पुत्र एच. डी. रेवण्णादेखील ( प्रज्वल यांचे वडील) मंत्री होते आणि सध्या विधानसभेचे विद्यमान सदस्य आहेत.
 
यावरून कर्नाटकच्या राजकारणातील या कुटुंबाचा प्रभाव लक्षात येतो. रेवण्णा यांचे दुसरे पुत्र सूरज रेवण्णा हे देखील विधान परिषदचे सदस्य आहेत.
"आमच्या जिल्ह्यात जे झालं त्याबद्दल बोलणं हे खूपच लाजिरवाणं आहे," असं एका तरुण दुकानदारानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं.
 
"झालेल्या प्रकरणाचा संदर्भ घेणंदेखील घृणास्पद आहे. त्यामुळे आमच्या जिल्ह्याचं नाव बदनाम झालं आहे," असं ते सांगतात.
 
हसन लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिलला मतदान होणार होतं त्याच्या पाच दिवस आधी म्हणजे 21 एप्रिलला 2,960 व्हिडिओ क्लिप्स असणारे पेन ड्राईव्ह बस स्टॅंड, बागेत आणि इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते. हा वाद पेटल्यानंतर प्रज्वल रेवण्णांनी दुसऱ्या दिवशी पहाटे देश सोडल्याची बातमी समोर आली होती.
 
अखेर सोमवारी प्रज्वल रेवण्णा समोर आले आणि त्यांनी सांगितलं की ते 31 मे ला 10:00 वाजता विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर होईल. व्हिडिओतील आपल्यावरील बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोप खोटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
एका व्हिडिओ मेसेज द्वारे रेवण्णा म्हणाले की, आतापर्यंत त्यानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती कारण ते 'निराश' झाले होते आणि त्यांनी स्वत:ला एकटं ठेवलं होतं. असं करण्यामागचं कारण सांगताना ते म्हणाले की महिलांवर लैंगिक शोषण करण्याचे आरोप हा एक 'राजकीय कट' आहे.
 
ते पुढे म्हणतात, "मतदानाच्या दिवशी (26 एप्रिल) माझ्याविरुद्ध कोणतीही केस नव्हती. माझा परदेश दौरा पूर्वनियोजित होता. तीन-चार दिवसांनी मी युट्युब चॅनेल पाहत असताना मला माझ्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांविषयी कळालं. मला विशेष तपास पथकानं पाठवलेल्या नोटिशीला मी प्रतिसाद दिला आणि माझ्या वकिलामार्फत पत्र पाठवून विशेष तपास पथकासमोर हजर होण्यासाठी सात दिवसांचा कालावधी मागितला."
 
"माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की मी या प्रकरणातून बाहेर येईन."
 
पोलिसांजवळ एका पीडितेनं केलेल्या तक्रारीमध्ये प्रज्वल रेवण्णांनी तिला धमकी दिल्याचं आणि तिच्यावर 1 जानेवारी 2021 आणि 25 एप्रिल 2024 दरम्यान त्याच्या अधिकृत सरकारी बंगल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पीडितेनं सांगितलं की दंडाधिकाऱ्यासमोर तिनं अधिकृतपणे तिचा जबाब नोंदवला होता.
 
मात्र तिने तक्रार केल्यानंतर तिच्या कुटुंबाला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागलं. संबंधित पती-पत्नी जनता दल (सेक्युलर) पक्षाचे कित्येक दशकांपासून 'निष्ठावान कार्यकर्ते' होते. तरीदेखील त्यांना हसन सोडून जावं लागलं. त्यांचे कुटुंबीय, मित्र, भावंडे सर्वांनीच त्यांच्याशी सर्व प्रकारचा संवाद बंद केला.
 
काहींनी रेवण्णांना त्यांच्या कुटुंबाकडून संरक्षण मिळाला असल्याचा आरोप केला.
 
"देवेगौडा आणि एचडी रेवण्णा जिथं विविध सरकारी कार्यालयांमधील फायलींवर बारकाईनं लक्ष ठेवतात तिथं त्यांना त्यांच्या नातवाच्या आणि मुलाच्या कृत्यांबद्दल माहीत नसेल असं तुम्हाला वाटतं का?" असा प्रश्न पीडितेच्या एका नातेवाईकानं विचारला.
 
प्रज्वल रेवण्णांचे वडील एचडी रेवण्णा हे कर्नाटकच्या विधानसभेत आमदार आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या एका माजी कर्मचाऱ्यानं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार ते देखील एक आरोपी आहेत. एचडी रेवण्णा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. हा एक राजकीय कट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
माजी पंतप्रधान आणि रेवण्णांचे आजोबा, एचडी देवेगौडा यांनी आपल्या नातवाला देशात परतण्यासाठी आणि पोलीस चौकशीला सामोरे जाण्यासाठी कडक इशारा देखील दिला होता.
 
"प्रज्वलच्या कृत्यांबद्दल मला माहिती नव्हती ही गोष्ट मी लोकांना पटवून देऊ शकत नाही. त्याला या प्रकरणात संरक्षण देण्याची माझी कोणतीही इच्छा नाही हे देखील मी लोकांना पटवून देऊ शकत नाही. त्याच्या हालचालींबद्दल मला कोणतीही माहिती नाही आणि त्याच्या परदेशवारीबद्दल मला काहीच माहीत नव्हतं हे सुद्धा मी लोकांना पटवून देऊ शकत नाही. माझ्या सद्सदविवेकबुद्धीला उत्तर देण्यावर माझा विश्वास आहे. माझा देवावर विश्वास आहे आणि मला माहीत आहे की त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला सत्य माहीत आहे," असं एचडी देवेगौडा यांनी एक्सवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
कर्नाटक राज्याच्या महिला आयोगाकडे आणखी एक तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटक सरकारनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT)स्थापन केलं आहे. बलात्काराच्या कथित आरोपांच्या दोन आणखी तक्रारीदेखील नोंदवण्यात आल्या आहेत.
मात्र जे पेन ड्राईव्ह वाटण्यात आले त्यात लैंगिक शोषण होत असलेल्या महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक संबंधावर याचा विपरित परिणाम झाला आहे.
 
"काही कुटुंबांनी यानंतर जिल्हा सोडला आहे. कित्येकजण तर अनेक आठवडे त्यांच्या घरातूनच बाहेर पडलेले नाहीत," असं रूपा हसना या कार्यकर्तीनं सांगितलं.
 
कर्नाटक सरकारनं मे महिन्याच्या सुरुवातीला प्रज्वल रेवण्णाचा पासपोर्ट रद्द करण्यासंदर्भात पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दुसरंही पत्र लिहिण्यात आलं होतं. मात्र त्यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही.
 
"केंद्र सरकार 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कारवाई करेल असं सहजपणे मानलं जाऊ शकतं," असं माजी सरकारी वकील बी. टी. वेंकटेश यांनी बीबीसीला सांगितलं.
 
या प्रकरणावर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
"पेन ड्राईव्हचे वितरण झाल्यानंतर देवेगौडा स्वत: त्यांच्या नातवाचा प्रचार करण्यासाठी गावांमध्ये गेले होते. त्यांना याबाबत काहीही माहीत नव्हतं असं ते अजिबात म्हणू शकत नाहीत," असं सीपीएम नेते धर्मेश यांनी बीबीसीला सांगितलं.
 
प्रत्यक्ष झालेला परिणाम
पेन ड्राईव्ह सार्वजनिक ठिकाणी टाकल्यानंतर एरवी मैत्रीपूर्ण स्वभावाचे असलेले हसनचे लोक मोकळेपणाने बोलण्याबद्दल सावध झाले आहेत.
 
स्थानिक सरकारी विज्ञान महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी याबाबत बोलायला सुरूवातीला नकार दिला. मात्र नंतर त्यातील एक म्हणाली, "हे फारच घृणास्पद आहे. आम्हाला माहीत आहे की मुलं त्याबद्दल बोलत आहेत. मात्र जे काही घडलं आहे ते ऐकणं सुद्धा आम्हाला लाजिरवाणं वाटतं."
 
नाव न सांगण्याच्या अटीवर एक रिअल इस्टेट एजंट म्हणाला, "लोकं त्यांचे टीव्ही बंद करतात, कारण त्यावर फक्त हे लाजिरवाणं प्रकरण दाखवतात. यामुळे लोक वैतागले आहेत. हसनची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती."
 
"देवेगौडा कुटुंबाच्या राजकीय प्रभावामुळे या प्रकरणाचे परिणाम होण्याची भीती लोकांमध्ये आहे," असं एक दुकानदार म्हणाला.
 
यासाठी कोण जबाबदार आहे?
लोकसभा मतदानाआधीच व्हिडिओ क्लिप समोर आणण्यात आल्या त्याबद्दल देखील चर्चा झाली आहे.
 
"महिलांना ब्लॅकमेल करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर बळाचा वापर झाला आहे हे आपल्याला कसं कळेल? हे राजकारण आहे," असं माला रवीकुमार या गृहिणी म्हणतात.
 
रूपा हसना या कार्यकर्तीला मात्र वाटतं की मोठ्या संख्येने कथित पीडित हे पक्षाचे कार्येकर्ते होते आणि त्यामुळेच पीडित तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन पर्यंत पोचले नव्हते.
 
देवेगौडा कुटुंबाचा प्रभाव
देवेगौडा कर्नाटकातील राजकीयदृष्ट्या शक्तिशाली अशा वोक्कालिगा समुदायाचे नेते आहे. पाच दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांचा हसनवर राजकीय प्रभाव आहे.
 
70 च्या दशकात देवगौडा कर्नाटकच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले होते. मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील पहिले बिगर कॉंग्रेसी सरकार बनल्यानंतर देवेगौडा यांचं वजन वाढलं होतं.
 
1996 मध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून प्रादेशिक पक्षांच्या आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर तर त्यांचे राजकीय वजन आणखीच वाढले होते.
 
मात्र मागील दोन दशकांमध्ये त्यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा हे जिल्ह्यातील शक्तिशाली राजकीय नेते म्हणून उदयास आले आहेत.
 
जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या एका वरिष्ठ महिला कार्यकर्तीनं बीबीसीला सांगितलं की पेन ड्राईव्ह समोर आल्यापासून पक्षाचे कार्यकर्ते 'निराश आणि अस्वस्थ' होते.
 
"एकप्रकारे आम्ही देवेगौडांचं विस्तारित कुटुंबच होतो. आमच्यापैकी कोणालाही असं होईल असं वाटलं नव्हतं." असं त्या म्हणाल्या.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती