लंपी झालेल्या गायीचं दूध माणूस पिऊ शकतो का?

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (23:10 IST)
सध्या भारतात लंपी स्किन डिसीज हा गोवंशात पसरणारा विषाणूजन्य आजार आलाय. पण याविषयीच्या खूप साऱ्या अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात येतायत.
 
सरकारी आकडेवारीनुसार, लंपी स्किन डिसीजमुळे भारतातील जवळपास 24 लाख पशुधन बाधित झालं आहे. तर 1,10,000 पशुधन दगावलं आहे.
 
भारतात हा जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश आहे. त्यामुळे जगातील सर्वांत जास्त पशुसंख्यासुद्धा भारतात आढळते. पण या लंपी आजारामुळे देशातील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय.
 
अशातच सोशल मीडियावर चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात दुधाविषयी शंका निर्माण झालीय. असे हे चुकीचे तीन दावे बीबीसीच्या या रिपोर्ट मध्ये खोडून काढण्यात आले आहेत.
 
लंपीबाधित जनावरांच दूध मानवी वापरासाठी सुरक्षित आहे का?
सोशल मीडियावर काही पोस्टमध्ये असे दावे करण्यात आलेत की, लंपीने बाधित गाईचं दूध पिल्यास माणसांना सुद्धा हा त्वचारोग होऊ शकतो. या पोस्टमध्ये दुसऱ्या कोणत्यातरी आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचे फोटो टाकण्यात आलेत. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
 
यावर बीबीसीने पोरस मेहला यांच्याशी संपर्क साधला. ते हरियाणाच्या 6,000 डेअरी संघटनांचे सरचिटणीस आहेत. ते सांगतात, "डेअरी उद्योगाशी संबंधित अनेक मीडिया ग्रुप्सवर मी असे मॅसेज पाहिलेत. हे मॅसेज जे लोक पाठवतात ते यासाठी जबाबदार नाहीयेत. त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचलीय तीच माहिती ते पुढे फॉरवर्ड करताना दिसतात."
 
राजस्थान मधील पशु आश्रय स्थानाचे व्यवस्थापक आणि दूध उत्पादक शेतकरी मानव व्यास सांगतात की, "अशा खोट्या दाव्यांमुळे दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झालेत. मी असे दावे सोशल मीडियावर पाहिले. माझ्या कानावर तर असंही आलंय की, ज्या लोकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवलाय ते सगळे लोक दूध फेकून देतायत. आधीच शेतकऱ्यांनी आपली जनावरं गमावली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक तणावात आहेत. त्यात आता लोक दूध घ्यायला पण नकार देत आहेत."
 
गुगल ट्रेंडनुसार, लोकांनी मागच्या 30 दिवसांत ज्या गोष्टी सर्च केल्यात त्यात "आम्ही लंपीने बाधित जनावरांच दूध पिऊ शकतो का?" हा प्रश्न सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलाय. तसंच सर्च करणाऱ्यांमध्ये 5,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
 
पण प्रत्यक्षात लंपी हा झुनोटिक आजार नाहीये. म्हणजे प्राण्यांमध्ये आढळणारा हा रोग माणसांमध्ये नैसर्गिकरित्या संक्रमित होत नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या 2017 च्या अहवालात म्हटलंय की, लंपीचा माणसांवर परिणाम होत नाही.
 
भारत सरकारच्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने देखील लंपीचा माणसांवर परिणाम होत नाही, असं म्हटलंय. या संस्थेचे सहसंचालक डॉ. के. पी. सिंग बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "आजवर एखाद्या प्राण्यापासून माणसाला संसर्ग झालाय असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पण गाईचं दूध पिणाऱ्या वासराला तिच्यापासून संसर्ग होऊ शकतो."
 
डॉ. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, "पोस्टमध्ये जे आजारी असलेल्या लोकांचे फोटो दाखवले आहेत. त्यांचं आम्ही, नुसत्या लक्षणांच्या आणि जखमांच्या आधारावर निदान करू शकत नाही. त्यासाठी या लोकांनी पुढं यावं, आम्ही त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवू. जेणेकरून हा रोग अचूकपणे ओळखला जाऊ शकतो."
 
लंपी पाकिस्तानातून आलाय का?
तर लंपी पाकिस्तानातून आलाय अशी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. तसंच या व्हायरसची उत्पत्ती सुद्धा पाकिस्तानात झाल्याचं म्हटलं जातंय. तसंच भारतातील गायींच्या विरोधात पाकिस्तानने कट रचल्याचं म्हटलं जातंय. तर हा दावा फोल आहे.
 
भारतातील बहुसंख्य हिंदू लोक गायींना पवित्र मानतात.
 
प्रत्यक्षात, हा व्हायरस झांबियामध्ये 1929 मध्ये डिटेक्ट झाला होता. हा व्हायरस सब- सहारा आफ्रिकेत टिकून होता. पण त्यानंतर तो उत्तर आफ्रिका, मध्य-पूर्व, युरोप आणि आशियातील देशांमध्ये पसरायला लागला.
 
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार हा व्हायरस आशियातील बांगलादेश, चीन आणि भारतात जुलै 2019 रोजी पहिल्यांदा आढळून आला. अन्न आणि कृषी संघटनेचा हा अहवाल 2020 मध्ये प्रकाशित झाला होता. तोपर्यंत पाकिस्तानमध्ये या रोगाची एकही केस आढळली नव्हती. त्यामुळे जर निष्कर्ष काढायला गेलं तर पाकिस्तानच्या आधी हा व्हायरस भारतात आला होता. त्यामुळे हा जो दावा केला जातोय तो खोटा आहे.
 
आयव्हीआरआयचे सहसंचालक डॉ. के. पी. सिंगसुद्धा याला दुजोरा देतात. ते सांगतात की, "हा व्हायरस बांगलादेशातून भारतात आलाय, पाकिस्तानमधून नाही. पशूंची जी वाहतूक होते त्यातून हा आजार भारतात पसरलाय. आधी बांगलादेशात त्यानंतर भारतात आणि नंतर मग पाकिस्तानात हा रोग आढळून आलाय."
 
लसी संदर्भातील दावे
लंपीची जी लस आली आहे त्याबद्दलही चुकीचे दावे सोशल मीडियावर केले जातायत.
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणखीन एक व्हूडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका डंपिंग ग्राउंडवर जनावरांचा खच पडलाय. आता याविषयी दावे करताना म्हटलं जातंय की, "भारत सरकारने ज्या लशी दिल्या त्यानंतर हजारो जनावरं मृत्युमुखी पडले."
 
हा व्हीडिओ लाखो वेळेस पाहिला गेलाय. सोबतच त्याला हजारदा रिट्वीटही करण्यात आलंय.
 
हा व्हीडिओ खरा आहे. मात्र लस दिल्यावर जनावरं मरतायत हा दावा खोटा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार, लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढून या आजाराचा प्रसार थांबवता येऊ शकतो.
 
सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. गोवंशातील जनावरांना गोट पॉक्सची लस टोचण्यात येतेय. यामुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते आहे.
 
भारतीय संशोधकांनी या लंपी व्हायरसवर एक लस विकसित केली आहे. 2019 मध्ये जेव्हा पहिल्यांदा हा विषाणू भारतात आढळला तेव्हापासून ही लस बनवण्याचं काम सुरू आहे. मात्र ही लस अद्याप कमर्शियली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

भारतात लाखो जनावरांना लस टोचून बरं करण्यात आलंय. आणि सध्या आपल्याकडे गोट पॉक्स हा एकमेव उपाय आहे. ही लस प्रभावी असून जनावरांमधील 70 ते 80 टक्के प्रतिकार शक्ती वाढते. यापासून कोणतेही साईड इफेक्ट् झालेले नाहीत. अशी माहिती डॉ. के. पी. सिंग यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

Published By -Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती