बिल गेट्स यांनी 20 वर्षं जुन्या अफेअरमुळे मायक्रोसॉफ्ट सोडलं होतं?

मंगळवार, 18 मे 2021 (18:45 IST)
जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर पुन्हा चर्चेत आले आहेत.
 
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर पडले तेव्हा एका 20 वर्ष जुन्या अफेअरसंबंधीच्या तक्रारीबद्दल त्यांची चौकशी सुरू होती, असं समोर आलंय.
 
गेट्स यांच्या वागणुकीबद्दलच्या तक्रारी आल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती, या वृत्ताला या टेक कंपनीने दुजारो दिलाय.
 
पण गेट्स यांच्या पायउतार होण्याचा या चौकशीशी काहीही संबंध नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षांच्या वैवाहिक जीवननानंतर घटस्फोट घेतल्यानंतर या चौकशीची बातमी समोर आली आहे.
 
2000 साली बिल गेट्स यांनी एका महिला कर्मचाऱ्यासोबत खासगी नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आपल्याकडे 2019 साली आल्याचं मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
 
"संचालक समितीने या तक्रारीची दखल घेत बाहेरच्या एका कायदेविषयक कंपनीची मदत घेत सखोल चौकशी सुरू केली. ही तक्रार दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याला या संपूर्ण चौकशीदरम्यान मायक्रोसॉफ्टने पाठिंबा दिला," असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
 
पण बिल गेट्स ही चौकशी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळातून पायउतार झाल्याने या चौकशीतून कोणताही निष्कर्ष काढता आला नाही.
बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करत असलेल्या समाजकार्यासाठी जास्त वेळ देता यावा यासाठी आपण संचालक मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याचं गेल्या मार्चमध्ये गेट्स यांनी म्हटलं होतं. 3 महिन्यांनंतर त्यांची पुन्हा संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली.
 
त्यावेळी त्यांनी लिहीलं होतं, "मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातून बाहेर पडण्याचा अर्थ मी कंपनीपासून दूर जातोय, असा होत नाही. मायक्रोसॉफ्ट कायमच माझ्या आयुष्यभराच्या कामाचा महत्त्वाचा भाग असेल. कंपनी करत असलेल्या प्रगतीमुळे मला आधीपेक्षा अधिक सकारात्मक वाटत असून याचा जगालाही फायदा होईल."
 
पण बिल गेट्स यांचं महिला कर्मचाऱ्यासोबतच वागण अयोग्य होतं आणि त्यासाठी त्यांनी पायउतार व्हावं असा निर्णय कंपनीच्या संचालक मंडळाने घेतला होता, असं वृत्त रविवारी (16 मे) वॉल स्ट्रीट जर्नलने दिलंय.
या वृत्तपत्राने आपल्याकडे चौकशी केली, तेव्हा असं अफेअर झाल्याच्या वृत्ताला आपण दुजोरा दिला होता, पण याचा त्यांच्या पायउतार होण्याशी काहीही संबं नसल्याचं बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
 
"जवळपास 20 वर्षांपूर्वी हे अफेअर झालं होतं आणि ते परस्परसंमतीने संपुष्टात आलं होतं. आणि संचालक मंडळातून बाहेर पडण्याच्या बिल यांच्या निर्णयाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. समाजकार्यासाठी जास्त वेळ देण्याबद्दल ते गेल्या अनेक वर्षांपासून बोलत होते," बिल गेट्स यांच्या महिला प्रवक्त्यांनी सांगितलं.
 
या विधानाला आपला दुजोरा असल्याचं बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने म्हटलंय.
 
बिल आणि मेलिंडा गेट्स या जोडप्याने काही दिवसांपूर्वी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांनी विविध कार्यांसाठी जगभरात अब्जावधीच्या देणग्या दिल्याअसून घटस्फोटानंतरही या फाऊंडेशनसाठी एकत्र काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.
 
मालमत्ता आणि प्रॉपर्टीचं विभाजन कसं करायचं, याचा निर्णय या दोघांनीही विभक्त झाल्याचं जाहीर करण्यापूर्वी घेतल्याचं अमेरिकन माध्यमांनी म्हटलंय.
65 वर्षांचे बिल गेट्स हे जगातले चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून फोर्ब्सनुसार त्यांची संपत्ती 124 अब्ज डॉलर्स आहे.
 
आता जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टची त्यांनी 1970च्या दशकात स्थापना केली. इथे ते 2008 सालापर्यंत पूर्ण वेळ कार्यरत होते.
 
वॉशिंग्टन, फ्लोरिडा आणि वायोमिंगमध्ये या जोडप्याच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टी आहेत. त्यांचं वॉशिंग्टनमधलं तलावाच्या किनारी असणारं मॅन्शन 127 दशलक्ष डॉलर्स मूल्याचं असल्याचा अंदाज आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती