भीमा कोरेगाव प्रकरण: स्टॅन स्वामी यांना अटक, UAPA अंतर्गत आरोप दाखल

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (16:20 IST)
रवी प्रकाश
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना रांचीमध्ये अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा - NIA च्या मुंबईहून आलेल्या एका पथकाने गुरुवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा त्यांना अटक केली.
 
बगाईचा भागातल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली. 83 वर्षांचे स्टॅन स्वामी त्यांच्या कार्यालयातल्याच एका खोलीत एकटे राहतात.
 
भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी होण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. NIAने त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायदा - UAPA च्या अंतर्गतही गुन्हे दाखल केले आहेत.
 
1967मध्ये अस्तित्त्वात आलेल्या दहशतवाद विरोधी कायद्यामध्ये सध्याच्या मोदी सरकारने गेल्या वर्षी सुधारणा केल्या होत्या.
 
विरोधी पक्ष आणि समाजसेवी संघटनांचा याला प्रखर विरोध होता. या सुधारणेनुसार कोणतीही व्यक्ती वा संस्थेला दहशदवादी असल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं.
 
आदिवासींच्या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या स्टॅन स्वामींवर UAPA सोबतच भारतीय दंड संहिता - IPC च्या अनेक गंभीर कलमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
NIA ने या अटकेविषयीची माहिती जाहीर केलेली नसली तर बीबीसीकडे याविषयीची अधिकृत कागदपत्रं आहेत. NIA चे अधिक्षक अजय कुमार कदम यांनी स्टॅन स्वामींना अटक करण्यात आल्याला या कागदपत्रांतून दुजोरा दिलाय. या कागदपत्रांची एक प्रत स्टॅन स्वामींनाही देण्यात आली आहे.
 
स्वामींचे सहकारी पीटर मार्टिन यांनी या अटकेच्या वृत्ताला बीबीसीशी बोलताना दुजोरा दिला.
 
पीटर मार्टिन म्हणाले, "NIAच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांचे कपडे आणि सामान आणायला सांगितलं आहे. रात्रीतूनच हे सामान पोचवावं असं सांगण्यात आलंय. NIAची टीम त्यांना रांची कोर्टात सादर करणार आहे की थेट मुंबईला नेण्यात येणार हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. फादर स्टॅन स्वामींचं वय जास्त आहे आणि ते आजारी असतात, म्हणून आम्हाला त्यांची काळजी वाटतेय."
 
कशी करण्यात आली अटक?
गुरुवारी संध्याकाळी उशीराच्या सुमारास NIAचं पथक स्टॅन स्वामींच्या ऑफिसमध्ये पोहोचलं. या पथकाने त्यांची जवळपास अर्धा तास चौकशी केल्याचं झारखंड जनाधिका महासभेशी संबंधित असणाऱ्या सिराज दत्ता यांनी बीबीसीला सांगितलं.
 
यासगळ्या दरम्यान या पथकातल्या लोकांचं वागणं साध्या शिष्टाचाराला धरून नव्हतं. त्यांनी अटक किंवा तपासासाठीचं कोणतंही वॉरंट दाखवलं नाही.
 
चर्चेदरम्यान आणि त्यानंतरच्या कारवाईमध्येही कोणतीही पारदर्शकता बाळगण्यात आली नाही.
 
स्टॅन स्वामींना घेऊन हे लोक NIAच्या कॅम्प कार्यालयात गेले आणि त्यानंतर अनेक तासांनी स्वामींच्या अटकेचं अधिकृत पत्र देण्यात आलं.
 
NIA ने आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं स्टॅन स्वामींनी दोनच दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे म्हटलं होतं.
 
काय म्हणाले होते स्टॅन स्वामी?
27 - 30 जुलै आणि 6 ऑगस्टला NIAने जवळपास 15 तास चौकशी केली आणि त्यानंतरही त्यांना आपल्याला मुंबईला बोलवायचं होतं, असं स्टॅन स्वामींनी 6 ऑक्टोबरला म्हटलं होतं.
 
झारखंड जनाधिकार महासभेने युट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये स्टॅन स्वामी म्हणाले होते, "NIA च्या अधिकाऱ्यांनी या चौकशीदरम्यान माझ्यासमोर अनेक दस्तावेज सादर केले जे तथाकथितरित्या माझे माओवाद्यांशी असलेले संबंध जाहीर करतात."
 
ते पुढे म्हणाले, "या गोष्टी आणि ही माहिती NIA ला माझ्या कॉम्प्युटरमधून मिळाल्याचा दावा त्या लोकांनी केला.या गोष्टी छुप्या रीतीने माझ्या कॉम्प्युटरमध्ये टाकण्यात आल्या असून हा कट असल्याच मी त्यांना म्हटलं. हे सगळे आरोप मी फेटाळतो."
 
"NIA च्या या शोधाचा मला आरोपी ठरवण्यात आलेल्या त्या भीमा कोरेगाव प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझे माआोवाद्यांशी संबंध असल्याचा खोटा आरोप सिद्ध करण्याचा NIA चा प्रयत्न आहे. मी याचाही इन्कार करतो."
 
"माझं इतकंच म्हणणं आहे की आज जे माझ्यासोबत होतंय ते इतर अनेकांसोबतही होतंय. सामाजिक कार्यकर्ते, वकील, लेखक, पत्रकार, विद्यार्थी नेते, कवी, विचारवंत आणि इतर अनेक लोक जे आदिवासी, दलित आणि वंचितांसाठी आवाज उठवतात, देशातल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विचारांशी सहमत न होणारे, अशा सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातोय."
 
रांची पोलीस अंधारात
आपल्या कारवाईबाबत NIA ने झारखंड पोलिसांना माहिती दिली नव्हती. लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर रांची पोलिसांचं एक पथक स्टॅन स्वामींच्या ऑफिसला पोचलं.
 
तोपर्यंत NIA चे अधिकारी स्टॅन स्वामींना तिथून घेऊन निघाले होते.
 
स्टॅन स्वामींना नेण्यात आल्याविषयीची माहिती आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं रांचीचे एसएसपी सुरेंद्र कुमार झा यांनी बीबीसीला गुरुवारी रात्री पावणे दहा वाजता सांगितलं. ते म्हणाले, "NIAने याविषयी आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आम्हाला याची पूर्वसूचनाही देण्यात आली नव्हती."
 
स्टॅन स्वामी कोण आहेत?
गेली तीन दशकं झारखंडमध्ये कार्यरत असणारे फादर स्टॅन स्वामी हे देशातले नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
 
तामिळनाडूच्या एका गावात जन्मलेल्या स्टॅन स्वामींनी लग्न केलेलं नाही. भारत आणि फिलीपाईन्समधल्या काही प्रसिद्ध संस्थांमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बंगळुरूतल्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं.
 
आदिवासींविषयी अधिक जाणून घ्यायची संधी त्यांना या काळात मिळाली. त्यानंतर ते झारखंड (तेव्हाचा बिहार)ला आले आणि इथेच स्थायिक झाले.
 
सुरुवातीच्या काळात इथल्या सिंहभूम भागात त्यांना पाद्री म्हणून काम केलं. यासोबतच ते आदिवासांच्या हक्कांसाठी लढू लागले आणि त्यांनंतर त्यांनी धर्मप्रचारकाचं काम सोडलं.
 
आदिवासींच्या विस्थापनाबाबत त्यांनी मोठा लढा दिला आणि झारखंडच्या तुरुंगांमध्ये बंदिवान असणाऱ्या हजारो आदिवासींसाठी कोर्टात आवाज उठवला.
 
केंद्रातल्या सध्याच्या सरकारद्वारे करण्यात येणारं जमीन अधिग्रहण कायद्यातली सुधारणा, वनाधिकार कायदा लागू करण्याबद्दलचं सरकारचं औदासिन्य, झारखंडमधल्या आधीच्या भाजप सरकारने केलेली लँड बँकची निर्मिती, आदिवासींवर नक्षलवादी असल्याचं सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावणं या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी आवाज उठवला.
 
घटनेच्या पाचव्या दुरुस्तीनुसार आदिवासींनी देण्यात आलेल्या विशेषाधिकारांचं संरक्षण, समता जजमेंट, पेसा कायदा याविषयीचे कायदेशीर लढे त्यांनी दिले.
 
मी वंचितांच्या अधिकारांविषयी बोलत असल्याने सरकार मला देशद्रोही म्हणत असल्याचं त्यांनी बीबीसीला 2018मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
आताच्या निवेदनाच्या व्हिडिओतही त्यांनी खलिल जिब्रानच्या या ओळींचा उल्लेख केलाय -
 
'जीवन आणि मृत्यू एकच आहेत, जसे नदी आणि समुद्र एक आहेत.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती