राहुल गांधींच्या पराभवामुळे अमेठीच्या लोकांना खरंच रडू कोसळलं?- फॅक्ट चेक

अमेठीमधील लोक रडत असल्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव झाल्यामुळे हे लोक दुखावले गेल्याचा दावा केला जात आहे.
 
हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करताना म्हटलं आहे, की लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधी हरल्यानंतर अमेठीतले लोक त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले. राहुल गांधींना भेटल्यानंतर अमेठीतल्या लोकांना अश्रू अनावर झाले आणि ते रडायला लागले.
 
आतापर्यंत सोशल मीडियावर हा व्हीडिओ 50 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
 
अमेठीच्या जागेचं महत्त्व
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. एवढंच नाही तर काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या अमेठीमधून स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पराभूत झाले. भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा पराभव केला.
 
अमेठीमधून सर्वांत प्रथम संजय गांधींनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर राजीव गांधी आणि सोनिया गांधींही अमेठीमधून निवडणूक लढवून लोकसभेत पोहोचले होते.
 
त्यानंतर सोनिया गांधींनी राहुलसाठी अमेठीची जागा सोडली. राहुल गांधी अमेठीमधून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मांडला. हा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरी राहुल गांधी राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं वृत्त माध्यमांमधून येत आहे.
व्हीडिओचं वास्तव
व्हीडिओमध्ये राहुल गांधी काही महिलांचं सांत्वन करताना दिसत आहेत. मात्र व्हीडिओसोबत जो दावा करण्यात आला आहे, तो खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
 
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर हा व्हीडिओ 2 नोव्हेंबर 2017 चा असल्याचं आढळून आलं.
 
हा व्हीडिओ तेव्हाचा आहे, जेव्हा राहुल गांधी रायबरेलीमधील NTPC पॉवर प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.
 
त्यावेळी हा व्हीडिओ राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीटही केला गेला होता. या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, की पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी NTPC च्या मुख्यालयात आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी.
 
NTPC पॉवर प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत 29 लोकांनी प्राण गमावले होते, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेशमधील रायबरेलीत हा पॉवर प्लांट आहे. रायबरेली हा सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे.
 
या दुर्घटनेची चौकशीही सुरू करण्यात आली होती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या परिवाराला 2 लाख रूपयांची मदत जाहीर केली होती. गंभीररित्या जखमी झालेल्यांना 50 हजार रूपये नुकसानभरपाई देण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती