आफताब पुनावाला: फुड ब्लॉगर, बॅगपॅकर ते 'पश्चाताप नसलेला' खुनाचा आरोपी

गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:20 IST)
आफताब पुनावाला: फुड ब्लॉगर, बॅगपॅकर ते 'पश्चाताप नसलेला' खुनाचा आरोपी
काही दिवसांपूर्वी उघडकीला आलेल्या गुन्ह्याने कदाचित संपूर्ण देशातील पालकांची झोप उडाली असेल.
 
कारण नोकरीच्या ठिकाणी, शिक्षणासाठी मुला-मुलांनी दूर राहावं लागतं आणि तिथे नेमकं ते काय करतात किंवा त्यांच्यासोबत काय होतं या चिंतेने कदाचित त्यांची झोप उडाली असावी.
 
पण या घटनेच्या केंद्रस्थानी जी व्यक्ती आहे ती सध्या तुरुंगात आरामशीर झोप काढतानाचं दृश्य समोर आलं आहे. आपण बोलत आहोत ते आफताब पुनावाला या व्यक्तीबद्दल. आफताब या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणातील आरोपी आहे.
 
त्याच्यावर श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस सध्या करत आहे. त्यांच्या तपासातून आफताबच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येत आहे.
 
पोलिसांच्या तपासात एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली आहे ती म्हणजे आफताबला आपल्या कृत्याचा किंचितही पश्चाताप होताना दिसत नाहीये.
 
आफताबने जे कृत्य केलं आहे त्याकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसे पाहिले जाऊ शकते हे आपण या लेखात पाहूत, त्या आधी आपण हे पाहू की सध्या आपल्या हाती जी माहिती आहे त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय समजतं.
 
इंडियन एक्सप्रेसच्या पॉडकास्टमध्ये या केसचे वृत्तांकन करणाऱ्या जिज्ञासा सिंह यांनी या आफताबबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.
 
"जेव्हापासून आफताबला अटक करण्यात आली आहे तेव्हापासून आफताबच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कुठलेही चिन्ह दिसले नाही. या केसवर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आफताबने जेव्हा आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा त्याचा चेहरा निर्विकार होता. तो रडला किंवा भयभीत झाला नाही. आफताबचे वडील जेव्हा त्याला वसईहून भेटण्यासाठी आले फक्त त्यांच्यासमोर तो एकवेळा रडला. या व्यतिरिक्त त्याला आम्ही रडताना पाहिले नाही."
 
द हिंदू या वृत्तपत्राने आफताबच्या जुन्या सहकाऱ्यांशी आणि मित्रांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जेव्हा तो श्रद्धासोबत मुंबईत राहत असे तेव्हा ते इतरांमध्ये फारसे मिसळत नसत आणि त्याचा मित्र परिवार मर्यादित होता.
 
एका मित्राने हे देखील सांगितले की आधी तो एकदम वेगळा होता. तो 'हसी मजाक' देखील करायचा. 2019 मध्ये आफताब आणि श्रद्धा एकमेकांना भेटले तेव्हापासून तो त्यांना ओळखत होता.
 
सोशल मीडियावरील आफताबची प्रतिमा
एएनआय या वृत्तसंस्थेनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार आफताब हा फुड ब्लॉगर आहे.
 
आफताब हा इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह होता. त्याचा हंग्री छोकरो नावाने फुड ब्लॉग आहे, असे इंडिया टुडेनी आपल्या बातमीत म्हटले आहे.
 
इंस्टाग्रामच्या बायोवर तो फुड अॅंड बिहेवरेज कंसल्टंट असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 29 हजार फॉलोअर्स आहेत.
 
इंस्टाग्रामवर त्याच्या बहुतेक पोस्ट या फुड ब्लॉगिंग संदर्भातल्याच दिसतात. फुडब्लॉगिंगसाठी तो स्वतः हे फोटो काढत असे. चॉकलेट, केक, पेस्ट्रीपासून ते अगदी करंज्या, चकल्या, मोदकांचे फोटो देखील या ब्लॉगवर पाहायला मिळतात.
 
त्याने स्वतःचा एक फोटो टाकून म्हटले आहे की या पोस्टमागचा चेहरा कोण आहे ते समजणे देखील आवश्यक आहे, त्यामुळे फुडब्लॉगरने अनिवार्यपणे आपला एखादा फोटो टाकावा असे म्हटले आहे. या फोटोव्यतिरिक्त इंस्टाग्रामवर त्याचा स्वतःचा फोटो दिसत नाही.
 
पण जेव्हा आपण त्याचे फेसबुक अकाउंट पाहतो तेव्हा तो विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतो असे दिसते.
 
त्याच्या प्रोफाइलनुसार तो वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि त्याने पदवीचे शिक्षण मुंबईतील सांताक्रूझ येथे असलेल्या एल. एस. रहेजा कॉलेजमधून घेतले आहे.
 
'महिलांना भोगवस्तू समजू नका'
'महिला या कुठल्याही लेबलसोबत जन्माला येत नाही' अशी एक पोस्ट त्याने शेअर केलेली दिसते. एखाद्या महिलेला मूर्ख, भोगवस्तू असे ठरवण्याआधी विचार करा असा अर्थ या पोस्टमधून अभिप्रेत आहे. तर एका पोस्टमध्ये एक छोट्या मुलीच्या हातात एक पोस्टर आहे. त्यात म्हटले आहे की दिवाळीला तुम्ही तुमचा अहंकार जाळा, फटाके नाही.
 
काही पोस्ट या पर्यावरणवर आहेत. त्याने सेव्ह आरेसंदर्भातील अनेक पोस्ट आपल्या पेजवरुन शेअर केल्याचे दिसते. तसेच एलजीबीटीच्या हक्कांच्या पोस्ट दिसतात.
 
आरेचे जंगल वाचवण्यासाठी सोशल मीडियावर सेव्ह आरे कॅंपेन, ऑनलाइन पिटिशन्स टाकण्यात आल्या होत्या. या पेटिशनदेखील आफताबने शेअर केलेल्या दिसतात. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना आरेचे जंगल वाचवा अशी विनंती करणाऱ्या पोस्ट तिथे आपल्याला पाहायला मिळतात.
 
एखाद्या सराईताप्रमाणे फळं कशी कापावी हा बझफीडचा लेख सुद्धा त्याने शेअर केला होता.
 
आफताबचे कुटुंब
आफताबचे कुुटुंबीय हे वसईतील एका सोसायटीत राहत असत. गेल्या वीस वर्षांपासून राहत असत. काही दिवसांपूर्वीच आफताब हा वसईतील घरी गेला होता आणि तिथून त्याचे कुटुंबीय मुंबईत राहण्यासाठी गेले. आफताबने त्यांच्या कुटुंबीयांना सामान बदली करण्यासाठी त्याने मदत केली, असे एनडीटीव्हीने सांगितले.
 
या काळात त्याला शेजाऱ्यांनी पाहिले होते. शेजाऱ्यांनी म्हटले की तो या काळात अगदी 'नॉर्मल' वाटत होता. आफताबला आम्ही लहानपासून पाहत होतो. आता या गोष्टी धक्कादायक वाटतात असे त्यांनी सांगितले.
 
सोसायटीच्या सेक्रेटरीने आफताबच्या वडिलांना विचारले होते की तुम्ही सोसायटी का सोडत आहात तेव्हा त्याच्या वडिलांनी उत्तर दिले होते की माझा धाकटा मुलगा आणि मी दोघेही मुंबईतच काम करतो तेव्हा तिकडेच शिफ्ट होणे चांगले.
 
एकमेकांवर सतत संशय घेण्याहून व्हायची भांडणं
आफताब आणि श्रद्धा हे दोघे 2019 पासून नात्यात होते. भिन्नधर्मीय असल्यामुळे श्रद्धाच्या आई-वडिलांचा या नात्यााला विरोध होता.
 
श्रद्धाने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते की मी आताप्रौढ आहे, माझे निर्णय घेण्यास मी समर्थ आहे. त्यानंतर ते दोघे सोबत राहू लागले. आफताबच्या घरच्यांना देखील ही गोष्ट मान्य नव्हती.
 
ते दोघे सोबत राहत होते पण त्यांच्यात सातत्याने वाद होत असत. इंडियन एक्सप्रेसच्या पॉडकास्टनुसार आफताब आणि श्रद्धा हे एकमेकांवर संशय घेत असत.
 
एकमेकांना जीपीएसचे लोकेशन ते मागत असत. कधी व्हीडिओ कॉल करणे, आजूबाजूचे फोटो मागणे इत्यादी गोष्टी ते करत. तिच्यासोबत नात्यात असताना त्याचे दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत असे श्रद्धाला वाटत असे त्यावरून त्यांच्यात भांडण होत असत.
 
त्यांचे नाते 'टॉक्सिक' बनले होते. ते एकमेकांना मारत असत आणि वस्तूदेखील फेकून मारत असत.
 
भांडण कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता पण काही केल्या त्यांच्यातील भांडण कमी होत नसत. मग त्यांनी ठरवलं की आपण हिमाचलला जाऊ. त्यानंतर नातं पुन्हा नव्याने सुरू करू.
 
ते हिमाचलला बॅगपॅक टूर करून आले. त्यानंतर ते दिल्लीतील छतरपूर पहाडी या भागात राहायला लागले. राहायला सुरुवात केल्याच्या तीन दिवसानंतरच त्याने तिची हत्या केली.

हत्येची योजना की रागाच्या भरात कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की आफताबने हे कबूल केले आहे की त्याने हत्या केली. 18 मे रोजी रात्री त्याच्यात आणि श्रद्धात भांडण झाले. श्रद्धा जोरजोरात ओरडत होती. तिला चूप करण्यासाठी त्याने तिचे तोंड दाबले, तो तिच्या छातीवर बसला आणि त्याने तिचा गळा दाबला.
 
रागाच्या भरात श्रद्धाचा गळा आवळून हत्या केल्याचे त्याने कबूल केले आहे. पण त्यानंतर त्याला लक्षात आले की आपल्याला आता अटक होऊ शकते. ही अटक टाळण्यासाठी त्याने पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
 
एका दिवस त्याने त्या मृतदेहाचे काहीच केले नाही. तो विचार करत राहिला. त्याने पोलिसांना सांगितले की सर्वांत आधी त्याने 19 हजार रुपयांचा तीनशे लीटरचा फ्रीज आणला. त्यांच्या रूममधून तो मृतदेह त्याने बाथरूममध्ये नेला आणि त्याने त्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे केले.
 
आफताब फुडब्लॉगर होता. तो स्वयंपाक करू शकत असे, त्याने शेफ बनण्यासाठी ट्रेनिंग घेतली होती आणि याचा फायदा त्याला अवयव कापताना झाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
 
ते तुकडे विविध कॅरीबॅगमध्ये भरून त्याने फ्रीजमध्ये ठेवले. दुर्गंधी पसरू नये म्हणून त्याने विविध सुगंधी द्रव्यं आणली, बाथरूम साफ करण्यासाठी त्याने डिसइन्फेक्टंट आणि केमिकल्स वापरले.
 
पोलिसांना त्याने सांगितले की "मी वेबसिरिज पाहतो. त्यापैकी एक असलेली डेक्स्टर या वेबसिरिजहून मला पुरावे नष्ट करण्याची कल्पना सुचली. मी रात्रभर गुगलवर सर्च केलं की मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. नेमक्या कोणत्या हत्यारांनी शरीराचे तुकडे करायचे."
 
"सर्वांत आधी मी तिचे आतडे आणि यकृत बाहेर काढले आणि त्याचे खिम्याप्रमाणे बारिक तुकडे केले. त्याचा वास सुटू नये म्हणून ते मी सर्वांत आधी मेहरोलीच्या जंगलात विविध ठिकाणी फेकून दिले," असं त्याने पोलिसांना सांगितलं.
 
कुणालाच संशय येऊ नये म्हणून त्याने श्रद्धाच्या इंस्टाग्राम अकाउंटहून मित्रांच्या मेसेजला उत्तरं द्यायला सुरुवात केली.
 
तिच्या घरच्या पत्त्यावर क्रेडिट कार्डाचं बिल जाऊ नये, किंवा कुणी तगादा लावून तिच्या तपासाला सुरुवात करू नये म्हणून त्याने ती बिलं देखील भरली.
 
'मृतदेह घरात असताना सर्व गोष्टी तो करत होता'
श्रद्धाच्या हत्येनंतर त्याने एका दुसरी मुलीशी डेटिंग केले होते. ती मुलगी जूनमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये आली होती. म्हणजे जेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष घरात होते तेव्हाच त्याने त्या दुसऱ्या मुलीला आपल्या घरी बोलवले होते.
 
जेव्हा घरात मृतदेह होता तेव्हा तो तिथेच जेवत असे, त्याच फ्रीजमध्ये त्याने कोल्ड्रिंक-आइस्क्रीम ठेवले होते.
 
ज्या इमारतीमध्ये तो राहत होता, त्या ठिकाणी तो कुणाशीही बोलत नसे. फक्त घरमालकाशी तो थोडं फार बोलत होता. त्याने घरमालकाकडे त्याच्या आणि श्रद्धाच्या आधारकार्डाच्या कॉपीज दिल्या होत्या.
 
एनडीटीव्हीच्या रिपोर्टरने आफताब-श्रद्धा जिथे राहत होते त्या इमारतीची पाहणी केली. तिथे राहणाऱ्या एका तरुण मुलाशी एनडीटीव्हीने संवाद साधला आणि आफताबचा स्वभाव कसा होता असं विचारलं असता त्याने सांगितलं की त्याच्याशी माझा फार काही संबंध आला नाही.
 
पण एक वेळा मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्याने मला सांगितले की माझी बेल वाजवायची नाही. मला डिस्टर्ब करायचं नाही. त्यानंतर मी त्याच्याशी पुन्हा बोललो नाही.
 
तो फक्त संध्याकाळी खाली जेवण आणण्यासाठी येत होता.
 
'डोळ्याला डोळे भिडवून बोलणारा'
जेव्हा श्रद्धाचा फोन बंद झाला तेव्हा तिच्या मित्रांनी आणि वडिलांनी मुंबईतील माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी मुंबईला बोलवण्यात आले.
 
त्याने पोलिसांच्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरं दिली त्यामुळे त्याच्यावर त्यांना संशय आला नाही.
 
चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना सांगितलं, "ती कायम चिडचिड करायची. विनाकारण भांडण करायची. आमचं भांडण झालंय आणि ती निघून गेलीये. कुठे गेली आहे माहिती नाही. तिला शोधायला मी तुम्हाला सहकार्य करेन."
 
"सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नाही. कारण तो एकदम नजरेला नजर मिळवून बोलत होता. कुठेही घाबरल्याचं त्याने दाखवलं नाही. एकदम कॉन्फिडन्ट होता,” असं माणिकपूर पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.
 
'आफताब अस्वस्थ आणि चिडलेला वाटला'
हत्येच्या काही दिवसानंतर आफताब मेहरोलीतील एका डॉक्टरकडे मलमपट्टीसाठी गेला होता.
 
त्याच्या हातावर जखमा होत्या. तो अस्वस्थ आणि थोडा रागात वाटत होता. मी आयटी सेक्टरमध्ये काम करतो असे त्याने सांगितले होते मी त्याला अधिक प्रश्न विचारले नाहीत असं डॉक्टरांनी सांगितले.
 
हे डॉक्टर आता आफताबविरोधात साक्ष देणार आहेत.
 
आफताबची सायको असेसमेंट टेस्ट होणार
आफताबची सायको असेसमेंट टेस्ट होणार आहे. म्हणजे आफताबची मानसिक स्थिती कशी आहे,कशी होती याबद्दलची सविस्तर चाचणी तज्ज्ञांद्वारे होणार आहे.
 
त्यातून तो खरं बोलतोय की नाही हे तर लक्षात येईलच पण त्याचसोबत तो ज्या गोष्टी सांगत आहे त्याची पुराव्याच्या आधारे पडताळणी करण्यास मदत होईल असे तज्ज्ञांनी एएनआयला सांगितले.
 
आफताबबद्दल गुन्हे मानसशास्त्रज्ञ काय सांगतात?
इंडिया टुडेवर ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रसिद्ध गुन्हे मानसशास्त्रज्ञ आणि फोरेन्सिक एक्सपर्ट रजत मित्रा यांची मुलाखत घेतली.
 
ही हत्या इतक्या निर्घृणपणे कशी झाली असावी त्यामागे आरोपीची भूमिका काय असेल असे विचारले.
 
तेव्हा मित्रा यांनी सांगितले की "अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराचे व्यक्तिमत्त्व अत्यंत स्फोटक असते. केवळ तो स्फोटकच असतो असे नाही तर त्याच्या मनात इतर भावनांचा गुंतादेखील तीव्र असतो.
 
"आफताब हा शेफ होता, जेव्हा तो त्याचा चाकू वापरत असेल तेव्हा देखील कदाचित त्याच्या मनात तिला कापण्याचे विचार येत असतील. ही एकप्रकारची गुन्हेगारी फॅंटसी असते. यामध्ये गुन्हेगार आपल्या पद्धतीने त्याच्या कृतीचे समर्थन करतो. मला त्या व्यक्तीने त्रास दिला आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे. मी माझा न्याय मिळवूनच राहील अशी त्यांची मानसिकता असते."
 
मित्रा सांगतात की त्याने रागाच्या भरात ही हत्या केली असे म्हणता येणार नाही.
 
या गोष्टीची योजना बरेच दिवस आधी झाली असेल आणि त्या दिवशी झालेले भांडण हे त्याचे तात्कालिक कारण असेल.
 
बऱ्याचदा गु्न्हा प्रत्यक्षात करण्याआधी गुन्हेगार आपल्या मनात त्याचे चित्र उभे करतो यातही तसे झाले असण्याची शक्यता आहे, असे मित्रा यांना वाटतं.
 
इंडिया टुडेने डॉ. यशश्री विसपुते यांची मुलाखत घेतली. डॉ. विसपुते या दिल्लीतील तिहार तुरुंगात मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
 
या गुन्ह्यामागची गुन्हेगाराची काय भूमिका असू शकते याबद्दल त्या सांगतात की "अत्यंत निर्घृण गुन्हे करणाऱ्या व्यक्तींमध्ये समाजविघातक तत्त्वं असतात. आपण केलेल्या कृत्यामुळे कुणाला काही त्रास होईल याची त्यांना काळजी नसते."
 
"असे लोक रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलू शकतात आणि त्याचवेळी त्यांना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत नाही. याला शास्त्रीय भाषेत अॅंटी सोशल डिसऑर्डर म्हणतात. या लोकांच्या मनात कायद्याची भीती नसते आणि ते आपल्या सोयीप्रमाणे कायदे मोडण्यास मागेपुढे पाहत नाहीत," असे डॉ. विसपुते सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती