अबु बक्र अल बगदादी ठार : 'तो किंचाळत राहिला, शेवटी त्यानं स्वतःला उडवलं' - ट्रंप
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (12:32 IST)
आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रंप हे काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली होती.
रविवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अमेरिकन सैन्याने शनिवारी रात्री सीरियामध्ये एक ऑपरेशन केलं त्यात बगदादीनं स्वतःला आत्मघातकी जॅकेच्या स्फोटानं उडवलं असं डोनल्ड ट्रंप यांनी सांगितलं.
या मोहिमेमध्ये एकाही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झालेला नाही मात्र त्यात बगदादीचे अनेक अनुयायी मारले आणि काही अनुयायांना पकडलं आहे असंही ट्रंप यांनी सांगितलं. या मोहिमेमुळे अमेरिकन सैन्याला भरपूर संवेदनशील माहिती मिळाल्याचंही ते म्हणाले आणि ही मोहिमेला यश येण्यासाठी मदत करणाऱ्या रशिया, तुर्कस्थान, सीरियाचे आभारही मानले.
ट्रंप म्हणाले, "अबू बक्र अल बगदादीचा मृत्यू झाला आहे. तो इस्लामिक स्टेटचा संस्थापक होता. ही जगातली सर्वात हिंसक आणि क्रूर संघटना आहे. अनेक वर्षे अमेरिका बगदादीला शोधत होती."
Baghdadi's demise demonstrates our commitment to the enduring and total defeat of ISIS and other terrorist organizations. pic.twitter.com/KUWSvTOzJt
ते म्हणाले, "बगदादीला जिवंत पकडणं किंवा मारणं माझ्या सरकारची सर्वोच्च सुरक्षा प्राथमिकता होती. अमेरिकन सैन्याच्या विशेष तुकड्यांनी वायव्य सीरियामध्ये रात्री एका धाडसी मोहिमेत शानदार विजय मिळवला,"
बगदादी किंचाळत होता
ट्रंप पुढे म्हणाले, "अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या छाप्यानंतर बगदादीनं स्वतःला आत्मघातकी जॅकेटचा स्फोट घडवून उडवलं.
बगदादीबरोबर त्याची तीन मुलंही होती. ती या स्फोटात मारली गेली आहेत. आत्मघातकी स्फोटामुळे त्याच्या शरीराचे तुकडे होऊन ते विखुरले गेले. परंतु डीएनए टेस्टमधून त्याची ओळख पटवली गेली. दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी बगदादीनं सतत प्रयत्न केले परंतु आयुष्याच्या अखेरीस तो अत्यंत घाबरलेला होता. अमेरिकन सैन्यानं त्याचा पाठलाग केला आणि मृत्युच्या प्रवेशद्वारापर्यंत नेलं."
"बगदादीचा मृत्यू भुयारात पडल्यानंतर झाला. अमेरिकन सैन्यानं त्याचा पाठलाग केला. तो सारखा ओरडत होता, किंचाळत होता. तो एक भित्रा माणूस होता. तो आता या जगातून निघून गेला आहे. बगदादी क्रूर आणि हिंसक माणूस होता. त्याचा मृत्यूही क्रूर आणि हिंसक पद्धतीनं झाला. आता जग अधिक चांगलं आणि सुरक्षित आहे", असं ट्रंप यांनी सांगितलं.
अमेरिकेतल्या माध्यमांच्या माहितीनुसार, अबु बक्र अल-बगदादीला इदलिब या सीरियन प्रांतात लक्ष्य करण्यासाठीच्या ऑपरेशनला ट्रंप यांनी परवानगी दिली होती. त्यासंदर्भातील काही मोठी घटना असेल का, यावर आता तर्कवितर्क लढवले जात होते.
'न्यूजवीक' मासिकाने अमेरिकन लष्कराचा दाखल देत वृत्त दिलंय होतं, आयएस नेत्याचा मृत्यू झालाय. मात्र कुठलाही अधिकृत दुजोरा मिळाला नाहीय.
मात्र याआधाही बगदादीच्या मृत्यूच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या..
सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकन लष्करानं बगदादीविरोधात एक ऑपरेशन अत्यंत यशस्वीपणे चालवलं. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं बगदादीच्या ठिकाणाचाही पत्ता लावला होता, असंही सीएनएननं म्हटलंय.
बगदादी एका कथित इस्लामिक स्टेटचा म्होरक्या आहे. बगददी 2010 साली इस्लामिक स्टेट ऑफ इराकचा (आयएसआय) नेता बनला. गेल्या पाच वर्षांपासून ते अंडरग्राऊंड होता.
इस्लामिक स्टेटची मीडिया विंग अल-फुरकानकडून एप्रिलमध्ये एक व्हीडिओ जारी करण्यात आला होता. त्या व्हीडिओतून सांगितलं गेलं होतं की, बगदादी जिवंत आहे.
जुलै 2014 मध्ये मसूलच्या मशिदीत भाषण दिल्यानंतर बगदादी पहिल्यांदा दिसला होता.
फेब्रुवारी 2018 मध्ये काही अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की, मे 2017 नंतर एका हवाई हल्ल्यात बगदादी जखमी झाला होता.
कोण होता अबू बक्र अल-बगदादी?
अबू बक्र अल-बगदादीचं खरं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री असं आहे. संघटीत आणि कुप्रसिद्ध युद्धतंत्रासाठी तो कुप्रसिद्ध होता. जगातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश होतो.
त्याचा जन्म इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेला असणाऱ्या समारा या गावात 1971 ला झाला. 2003 ला इराकवर अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी तो इथल्या एका मशिदीत मौलवी म्हणून काम पाहायचा.
काहींच्या मते इराकचे माजी प्रमुख सद्दाम हुसेन यांच्या कार्यकाळात बगदादी एक जिहादीच होता. काहीजण सांगतात, दक्षिण इराकमधल्या कँप बुक्कामध्ये अल-कायदाच्या अनेक कमांडरांना कैदेत ठेवण्यात आलं होतं. त्या कँपमध्ये बगदादीला ठेवण्यात आलेलं होतं. त्यावेळी त्याच्यावर कट्टर विचारसरणीचा पगडा आला.
2010 मध्ये इराकमध्ये एका कट्टरवादी गटाचा नेता म्हणून बगदादी उदयास आला. त्यांच्या गटात अल-कायदाचा समावेश होता. बगदादीच्या इस्लामिक स्टेट या संघटनेनं 2014 मध्ये इराकचं मोसूल शहर ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याने खिलाफत तयार केल्याची घोषणा केली होती.
फक्त त्याचवेळी बगदादी सार्वजनिकरित्या बाहेर दिसला होता. त्यानंतर फक्त यावर्षाच्या सुरूवातीला आयएस संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये तो दिसला.
2011 च्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने त्याला अधिकृतरित्या दहशतवादी म्हणून घोषित केलं. त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक कोटी अमेरिकन डॉलरचं बक्षीस देण्याचं घोषित केलं. 2017 मध्ये बक्षीस अडीच कोटी अमेरिकन डॉलर इतकी करण्यात आली होती.
आयएसप्रमुख
इस्लामिक स्टेटमधल्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करण्याची क्षमता बगदादीमध्ये होती. त्यानं इस्लामिक स्टेटशी लोकांना जोडून घ्यायला सुरूवात केली.
त्यानंतर तो शरिया समितीचा पर्यवेक्षक झाला. त्यानंतर तो शुरा कौन्सिलच्या 11 सदस्यांपैकी एक झाला.
त्यानंतर तो बगदादी इस्लामिक स्टेटच्या समन्वय समितीमध्ये आणण्यात आलं. इराकमधील कमांडर्समध्ये ताळमेळ साधण्यासाठी तो काम करू लागला. 2010 साली आयएसचा संस्थापक मारला गेल्यानंतर बगदादीला आयएसचा प्रमुख बनवण्यात आलं.