रशिया-युक्रेन युद्धात अडकलेली 8 मराठी मुलं म्हणतात, 'आमच्याकडे 4 दिवसांचंच रेशन'

शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (12:22 IST)
"मी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याचा आहे. मी आणि माझे 8 मित्र आम्ही युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहोत. युद्ध सुरू झाल्याने आम्हाला आता भीती वाटत आहे. आम्ही पॅनिक झालोय कारण विमान वाहतूकही ठप्प झाली आहे," सुशांत शितोळे या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या भावना सांगितल्या.
 
रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आणि युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली. विशेषत: शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत.
 
युक्रेनमधील खारकीव्ह या शहरातील खारकीव्ह विद्यापीठात सुशांत शितोळे शिकत आहे. सुशांतसोबत महाराष्ट्रातील आणखी 8 विद्यार्थी आहेत असं त्याने सांगितलं. यापैकी दोन मुली आहेत.
 
महत्त्वाचं म्हणजे खारकीव्ह रशियाच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे भारतीय दूतावासाने या विद्यार्थ्यांना खारकीव्ह तात्काळ सोडा असं सांगितलं आहे.
"खारकीव्हमध्ये अंतर्गत वाहतूक बंद असल्याने आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आम्ही काय करावं कळत नाही," असंही सुशांत शितोळेने बोलताना सांगितलं.
 
खारकीव्ह विद्यापीठात जवळपास 4,500 भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांत केवळ काही शेकडो विद्यार्थी भारतात परतले. बाकी सुमारे 4 हजार विद्यार्थी खारकीव्हमध्येच अडकले आहेत, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
 
'आम्ही कसं परतणार?'
डिसेंबर 2021 मध्ये म्हणजेच तीन महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांनी खारकीव्ह वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला.
 
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी हे विद्यार्थी शिकत आहेत. 23 फेब्रुवारीपर्यंत या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू होते.
 
कालपासून (24 फेब्रुवारी) खारकीव्ह विद्यापीठाने ऑनलाईन क्लास सुरू केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
 
आशिष वराळ हा विद्यार्थी सुद्धा युक्रेनमध्ये शिकत आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्याने सांगितलं, "पुण्यात परतण्यासाठी आम्ही 1 मार्चचे तिकीट बुक केलं आहे. पण आता इथली विमान सेवा बंद केली आहे. आम्ही कसं परत येणार?"
 
युक्रेनमधून भारतात सुखरुप कसं परतायचं? हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे.
 
"गेल्या काही दिवसांत शेकडो विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतले. आमच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांचंही बुकींग झालं आहे. दररोज विद्यार्थी बाहेर पडत होते. 24 फेब्रुवारीपासून फ्लाईट्स बंद झाल्या त्यामुळे आम्ही अडकलोय आता," असं सुशांत शितोळे म्हणाला.
 
'चार दिवसांचेच रेशन'
युक्रेनवर रशियाने हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर विद्यापीठातही विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली.
 
विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली. हवाई वाहतूक बंद असल्याने युक्रेनमध्येच काही दिवस रहावं लागणार याचा अंदाज विद्यार्थ्यांना आला आणि त्यांनी पूर्वतयारी सुरू केली.
सुशांत शितोळे म्हणाला, "आम्ही तातडीने भारतीय दूतावासाला संपर्क केला. त्यानंतर आमच्यापैकी काही मुलं सामान आणण्यासाठी बाहेर पडली. दुकानांबाहेर नागरिकांची मोठी रांग होती. शहर ठप्प होईल या भीतीने सगळ्यांची धावपळ होतेय."
 
दुकानातून किराणा माल आणि अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी आम्हाला जवळपास तीन तास लागले, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
 
"चार दिवस पुरेल एवढेच सामान आम्ही आणू शकलो. तोपर्यंत काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे," असं सुशांत शितोळे म्हणाला.
 
'भारत सरकारने लवकर मदत करावी'
कीव्ह येथे भारतीय दूतावासाचे कार्यालय आहे. खारकीव्हपासून भारतीय दूतावास जवळपास 500 किमी अंतरावर आहे.
 
आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. आमचं ईमेलद्वारे संभाषण सुरू आहे. पण इंटरनेटचं कनेक्शन जाण्याची भीती कायम आहे. तसं झाल्यास आम्हाला कोणाशीच संपर्क साधता येणार नाही.
हवाई वाहतूक बंद झाली असली तरी पर्यायी व्यवस्था केली जात आहे अशी माहिती नुकतीच कीव्ह येथील भारतीय दूतावासाने दिली आहे.
 
युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. अंतिम व्यवस्था झाल्यानंतर दूतावासाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध केली जाईल.
 
सर्व फ्लाईट्स रद्द झाल्याने युक्रेनमध्ये पश्चिमेकडील भागांत नागरिकांना हलवण्यासाठी आम्ही सोय करू.
 
"भारतीय सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मदत करावी. युक्रेनमधून आम्हाला बाहेर काढावं. किमान परिस्थिती कशी हाताळावी याबाबत दूतावासाने मार्गदर्शन करावे." असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.
 
युक्रेनमध्ये काय परिस्थिती आहे?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली आणि रशियन फौजा तीन बाजूंनी युक्रेनकडे सरसावल्या.
 
युद्धाच्या पहिल्या दिवशी सैनिक आणि सामान्य नागरिक मिळून 137 जणांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय.
 
युक्रेनच्या लष्कराला तिथून हटवणं हे या लष्करी कारवाईचं उद्दिष्टं असल्याचं पुतिन यांनी टीव्हीवरच्या भाषणादरम्यान सांगितलं.
 
युक्रेनच्या अनेक भागांमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या. कीव्हवरही अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं सांगण्यात येतंय.
 
रशियाने 'मोठा हल्ला' सुरू केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलाय. हा हल्ला रोखण्याचे सर्व प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्रांना केलंय.
 
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निषेध केलाय. यामुळे अनेकांचे जीव जातील आणि सगळ्याच मानवजातीसाठी हे त्रासाचं ठरेल असं बायडन यांनी म्हटलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती