हज यात्रा कशी असते? हजला जाऊन मुस्लीम काय करतात?

शनिवार, 9 जुलै 2022 (19:51 IST)
मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानली जाणारी हज यात्रा सध्या सौदी अरेबियामध्ये सुरू आहे. यंदाच्या वर्षी हज यात्रा 7 जुलै ते 11 जुलै दरम्यान पार पडत आहे. यंदाच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी सुमारे 10 लाख मुस्लीम दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
यंदाच्या वर्षी दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमी असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे हज यात्रा होऊ शकली नव्हती. दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच हज यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
 
या पार्श्वभूमीवर हज यात्रेविषयीची माहिती आपण जाणून  घेऊ -
 
हज यात्रा काय आहे?
इस्लाम धर्मात 5 कर्तव्ये (फर्ज) सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक कर्तव्य म्हणजे हज होय. याशिवाय, कलमा, रोजा, नमाज आणि जकात ही इतर चार कर्तव्ये आहेत.
 
इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, शारिरीक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे.
अल्लाहने एक तीर्थस्थान बनवून समर्पित करण्यासाठी पैगंबर इब्राहिम यांना सांगितलं होतं.
 
इब्राहिम आणि त्यांचे पुत्र इस्माईल यांनी एक दगडी इमारात बनवली. यालाच काबा संबोधलं जातं. हळूहळू लोकांनी इथे वेगवेगळ्या देवांची पूजा करणं सुरू केलं.पण काबाला पुन्हा पूर्वस्थितीत आणलं जावं. इथे केवळ अल्लाहची प्रार्थना करण्यात यावी, असं इस्लामचे अखेरचे पैगंबर हजरत मोहम्मद (इ.स. 570-632) यांनी म्हटलं.
 
त्यामुळे इ.स. 628 पासून पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या 1400 अनुयायांसोबत एक यात्रा सुरु केली. हीच इस्लाममधील प्रथम तीर्थयात्रा मानली जाते.
 
याच यात्रेमध्ये पैगंबर इब्राहिम यांनी धार्मिक परंपरा पुनःप्रस्थापित केली. यालाच हज म्हटलं जातं, अशी धार्मिक मान्यता आहे.
 
यादरम्यान जगभरातील मुस्लीम सौदी अरेबियाच्या मक्का येथे हज यात्रेसाठी दाखल होतात.
 
हज यात्रा पाच दिवस चालते. ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदला ही यात्रा संपन्न होते.
 
हज यात्रेसाठी सौदी अरेबियाने विशेष नियोजन केलेलं आहे. यानुसार प्रत्येक देशांना विशिष्ट असा कोटा देण्यात आलेला आहे. इतक्याच संख्येने भाविक यात्रेसाठी जाऊ शकतात.
 
सर्वाधिक कोटा इंडोनेशियाला देण्यात आलेला आहे. त्यानंतर क्रमशः पाकिस्तान, मग भारत, बांगलादेश, नायजेरिया या देशांना भाविकांची संख्या निश्चित करून देण्यात आली आहे.
 
याशिवाय, ईराण, तुर्किये, इजिप्तसह इतर अनेक देशांमधून भाविक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जात असतात.
 
हजला जाऊन मुस्लीम काय करतात?
हज यात्रेकरू सर्वप्रथम सौदी अरेबियातील जेद्दा शहरात दाखल होतात.
 
तिथून ते मक्का शहराकडे रवाना होतात. पण मक्केपूर्वी एक विशिष्ट असं ठिकाण आहे, तिथूनच हज यात्रा अधिकृतरित्या सुरू होते.
 
मक्का शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला मिकात असं संबोधतात.
 
अहराम
हज यात्रेकरू एक विशिष्ट असा पोशाख परिधान करतात, त्याला अहराम असं संबोधलं जातं. अहराम म्हणजे हे फक्त पांढऱ्या रंगाचं कापड असतं. ते कुठेही शिवलेलं नसतं.
 
महिलांना अहराम वापरण्याची सक्ती नाही. त्या फक्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि आपलं डोकंही पांढऱ्या कपड्याने झाकतात.
 
उमरा
मक्केला पोहोचून यात्रेकरू सर्वप्रथम उमरा करतात. ही एक छोटा धार्मिक विधी आहे.
 
उमरा वर्षातून कधीही केलं जाऊ शकतं. पण हजला गेल्यावर लोक सामान्यपणे हा विधी करून घेतात. पण हजचा हा अनिवार्य विधी नाही, याचीही नोंद घ्यायला हवी.
मीना शहर आणि अराफात मैदान
हज यात्रेची अधिकृत सुरुवात जिल-हिज या मुस्लीम महिन्याच्या 8 तारखेला होते.
 
8 तारखेला हज यात्रेकरू मक्का आणि सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील मीना शहरात जातात. 8 रोजी रात्री यात्रेकरी मीनामध्ये दाखल होतात. पुढच्या दिवशी म्हणजेच 9 तारखेला अराफात मैदानात पोहोचतात.
या मैदानावर उभे राहून भाविक अल्लाहचं स्मरण करतात. आपल्या गुन्ह्यांबाबत माफीही मागतात.
 
त्यानंतर संध्याकाळी ते मुजदलफा शहरात जातात. 9 तारखेच्या रात्री त्यांचा मुक्काम मुजदलफा येथेच असतो. 10 तारखेला सकाळी यात्रेकरू पुन्हा मीना शहरात परततात.
 
जमारात
यानंतर जमारात नामक एक विधी होतो. यात प्रतिकात्मक स्वरुपात सैतानाला दगड मारले जातात.
 
सैतानाला मारल्यानंतर बाजूला बकऱ्याची कुर्बानी देण्यात येते. इथे पुरुष आपलं मुंडण करून घेतात. तर महिला काही केस अर्पण करतात.
ईद-उल-अजहा
मुंडण केल्यानंतर यात्रेकरू मक्काला परततात. इथे काबाच्या 7 फेऱ्या मारण्याची परंपरा आहे.
 
या विधीला तवाफ असं संबोधलं जातं. याच दिवशी म्हणजे जिल-हिजच्या 10 तारखेला संपूर्ण जगातील मुस्लीम नागरिक ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद सण साजरा करतात.
 
तवाफनंतर यात्रेकरू मीना शहरात परततात. तिथं आणखी दोन दिवस राहतात. महिन्याच्या 12 तारखेला यात्रेकरू पुन्हा एकदा शेवटच्या वेळी तवाफ तसंच दुआ करतात. यानंतर हज यात्रा संपन्न होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती