ज्ञानवापीः नमाजापूर्वी वजू करतात म्हणजे काय करतात? वजूखाना काय असतो?
शनिवार, 21 मे 2022 (18:42 IST)
स्नेहा
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या तपासणीचं काम पूर्ण झाल्यानंतर आवारात 'शिवलिंग' सापडल्याचा दावा केला जातोय. याबाबत स्थानिक न्यायालयाने ही जागा तातडीने सील करण्याचे आदेश दिले होते.
याविरोधात मशीद व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मशिदीच्या आवारात ज्या ठिकाणी 'शिवलिंग' असल्याचं सांगितलं जात आहे तो भाग संरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिले आहेत.
त्याचबरोबर मुस्लिमांना त्या ठिकाणी नमाज अदा करण्याची पूर्ण परवानगी असेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे वजू आणि वजूखाना.
याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी 'शिवलिंग' सापडल्याचं सांगितलं जातंय, तो भाग मशिदीतील वजूखाना आहे.
वजू नेमका प्रकार काय असतो ते समजून घेऊ.
वजू म्हणजे नेमकं काय?
तर इस्लामचे अभ्यासक आणि ऑल इंडिया मुस्लिम मजलिस-ए-मशावरतचे सरचिटणीस अब्दुल हमीद नोमानी हे वजूबद्दलची माहिती देताना सांगतात की, की इस्लाममध्ये प्रार्थनेसाठी वजू आवश्यक गोष्ट आहे.
अब्दुल नोमानी सांगतात, "वजूशिवाय प्रार्थना होऊ शकत नाही. हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वच्छ करणे असा होतो. यामध्ये आधी हात, नंतर चेहरा धुवावा लागतो. त्यानंतर नाकात पाणी सोडून स्वच्छ करावं लागतं."
"सुरुवातीला बिस्मिल्लाहचं पठण करावं लागतं. नंतर पाय धुवावेत व नंतर डोकं धुवून पुसावं. म्हणजे डोक्यावर ओला हात फिरवावा. कोपरापर्यंत दोन्ही हात त्यात धुवावेत."
त्यांनी सांगितल की मूळ गोष्ट अशी आहे की प्रार्थनेपूर्वी व्यक्तीने पाक (स्वच्छ) स्थितीत असणं आवश्यक आहे.
अब्दुल हमीद नोमानी स्पष्ट करतात की, या प्रक्रियेत किमान पाणी वापरावं असं इस्लाममध्ये सांगितलं आहे. जरी एखादा व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावर वजू करत असेल तरी ही त्याने कमीतकमी पाण्याचा वापर करावा.
वजूमध्ये एकदा, दोनदा किंवा तीनदा स्वछता करण्याबाबत सांगितलं जातं. जास्तीत जास्त तीन वेळा आणि किमान एकदा.
इस्लाममध्ये वजूबाबत कोणती मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत.
दिल्लीच्या फतेहपुरी मस्जिदचे शाही इमाम डॉ. मुफ्ती मोहम्मद मुकर्रम अहमद म्हणतात की, इस्लाम धर्मात शुद्धतेला खूप महत्त्व आहे. या धर्माची मूलभूत शिकवण स्वच्छ आणि शुद्ध असणे ही आहे.
ते पुढे सांगतात, "नमाज अदा करण्यापूर्वी तुम्ही पाक (शुद्ध) असणं आवश्यक आहे. अंगावर स्वच्छ कपडे असावे आणि जागा देखील स्वच्छ असावी. प्रत्येक नमाजापूर्वी वजू आवश्यक आहे. जर कोणी घरून अंघोळ करून आलं असेल तर त्याला वजू करण्याची गरज नाही. इस्लाममध्ये असं ही म्हटलयं की जे वजू करतात ते शुद्ध राहतात आणि त्यांची पाप ही धुऊन निघतात."
ते म्हणाले की, मुस्लिमांसाठी ही गरज आहे आणि एक अटसुद्धा. मशिदीत वजू करण्याची व्यवस्था नसेल तर लोक घरून वजू करून येतात. उदाहरणार्थ ईदच्या दिवशी जेव्हा हजारो लोक मशिदीत येतात तेव्हा घरूनचं वजू करून येतात. वजूबद्दलच्या पद्धती कुरआनच्या सुरा अल मायदा मध्ये नमूद केल्या आहेत.
ज्ञानवापी मशीद प्रकरण
ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे. ज्ञानवापी मशिदीचा वाद तसा जुना आहे.
18 ऑगस्ट 2021 रोजी बनारस कोर्टात पाच महिलांनी एक नवी याचिका दाखल केली होती.
या महिलांचे नेतृत्व मूळची दिल्लीची रहिवासी असलेली राखी सिंग करत आहे. उर्वरित चार महिला याचिकाकर्त्या बनारसच्या रहिवासी आहेत.
या सर्वांची मागणी आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या आवारात माँ शृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान आणि नंदीजी आणि इतर देवीदेवतांचे दर्शन, पूजा आणि प्रसाद अर्पण करण्याची परवानगी द्यावी.