प्रभू येशूंची शिकवण

शुक्रवार, 25 मार्च 2016 (15:27 IST)
प्रीती : प्रभू येशूंनी शिष्यांना एकमेकांवर प्रेम करावाला शिकविले. तुम्ही आपल वैर्‍यावरही प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना  आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात, तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. (मत्त 5 : 44) मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. तुमच्यातील प्रीती पाहून सर्व तुम्हाला ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात. (योहान 13 : 34, 35) असे येंनी सांगितले. आज कुटुंबामध्ये, समाजामध्ये व देशामध्ये एकमेकांवरील प्रीती थंडावली आहे. नवीन युगातील मानवाचे आचरण आदिमानवाप्रमाणे पूर्व पदावर येत आहे. मानवातील मनुष्यपण नष्ट होत आहे. मानवाने जगावे एकमेकांच्या कल्याणासाठी, हा संदेश प्रभू येशूने त्यांच्या जीवनातून शिष्यांना दिला.
 
शांती : प्रभू येशूला शांतीचा अधिपती म्हटले आहे. (शा 9:6) त्याच्या शांतीला अंत असणार नाही. मानवी जीवन आज असुरक्षित आहे. कुटुंब, समाज व देशामधील शांती लोप पावत आहे. आपल्यावर कोणीतरी हल्ला करेल, अशा प्रकारचे दहशतीचे सावट आज सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे मानवी जीवन असुरक्षित आहे.
 
शिष्यत्वाची अट : जो कोणी स्वत:चा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. (लुक 14 : 27) वधस्तंभ हे दु:खसहनाचे प्रतीक आहे. 
 
आत्मत्याग : येशूने म्हटले जर कोणी माझ मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे (लुक 9 : 23) वधस्तंभ हे आत्मत्यागाचे प्रतीक आहे.
 
आज मानवामध्ये स्वार्थी प्रवृत्ती बळावली आहे. मानवी दृष्टिकोन स्वकेंद्रित झाला आहे. दुसर्‍याला मदत करण्याकरिता आत्मतगाची आवश्कता असते. त्यामधून मानवाचा सर्वागीण विकास होऊ शकतो.
 
अभिमान : संत पौलाने गलतीकरास लिहिले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. आज संपत्ती, सौंर्दय व शिक्षण याकरिता एकमेकांमध्ये स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला या गोष्टीचा अभिमान आहे. परंतु संत पौल म्हणतात माझ्याकरिता जे दु:ख प्रभू येशूने सहन केले, त्या वधस्तंभाचा मला अभिमान आहे.
 
दु:खसहन : हे प्रभू येशूच्या त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक आहे. मरणप्राययातना वधस्तंभावर सहन करीत असताना त्यांचे वधस्तंभावरील सप्तोद्गाराचे आज बहुतेक चर्चमध्ये चिंतन व मनन केले जाते. 
 
येशूचे वधस्तंभावरील उद्गार -
 
प्रथमोद्गार: हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना हे समजत नाही. (लुक 23:34) क्षमा अनेक पापांची रास झाकते. दया  व क्षमा हे प्रीतीचे उगमस्त्रोत आहे.
 
द्वितीयोद्गार: मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुख लोकांत असशील. वधस्तंभावर पश्चाताप करणार्‍या अपराधला मिळालेले प्रभू येशूचे हे अभिवचन आहे. 
 
तृतियोद्गार : बाई पाहा हा तुझा पुत्र व शिष्य पाहा. ही तुझी आई (लुक 23: 39) आपल्या पश्चात आपल्या आईची जबाबदारी त्यांनी आपल्या प्रिय शिष्यावर सोपविली.
 
चतुर्थोद्गार: माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? (मार्क 15:33, 34) पिता आणि पुत्रातील ताटातूट किंबहुना विरहाचे हे उद्गार आहेत. 
 
पंचमोद्गार : मला तहान लागली आहे. (योहान 19:28) तहान दोन प्रकारची असते. आधत्मिक तहान, दैहिक तहान.
 
षष्टमोद्गार: पूर्ण झाले आहे. (योहान 19:3) ज्या करकरिता मानवी देह धारण करून या जगामध्ये मानवाचे तारण किंवा मुक्तीची योजना पूर्ण करण्याकरिता येशू आले होते ते कार्य वधस्तंभावरील समर्पणाद्वारे पूर्ण केले. जीविताच्या साफल्याचा हा उद्गार आहे. 
 
सप्तमोद्गार : हे पाहून मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.(लूक23 :26) देहाचे अर्पण वधस्तंभाच्या वेदीवर केले. आत्म्याचे समर्पण पिता परमेश्वराला दिले आणि मानवमुक्तीकरिता हे समर्पण अद्वितीय ठरले. मानवाच्या मुक्तीकरिता मानवाला शुद्ध व पवित्र करण्याकरिता प्रभू येशूने वधस्तंभाच्या वेदीवर कोकराप्रमाणे समर्पण केले. वधस्तंभावरील सप्तोद्गार म्हणजे मानवी भावनांचे इंद्रधनुष्य आहे. यामध्ये  क्षमाशीलता, अभिवचन, कृतज्ञता, विरह, तृषार्तता, साफल्य, समर्पण या मानवी भावनांचे सप्तरंग आपणास आढळतात. मानवाच्या मुक्तीकरिता प्रभू येशूने वधस्तंभाच्या वेदीवर निष्कलंक व निर्दोष रक्त वाहिले. याबाबत पूर्वकल्पना असूनसुद्धा सर्व दु:ख, अपमान सहन केले. त्यांनी उक्ती व कृतीद्वारे मानवाला मानवतेचा संदेश दिला. प्रभू येशूच्या जीवनामध्ये पावित्र्य, त्यांचे तिसर्‍या दिवशी मरणावरील विजय हे त्यांचे अमरत्व व त्यांचे देवत्व सिद्ध करते.

वेबदुनिया वर वाचा