काँग्रेस आपला इतिहास पुन्हा सांगण्याची मोहीम का राबवत आहे?

शनिवार, 30 डिसेंबर 2023 (09:06 IST)
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला 'है तयार हम' असं नाव देण्यात आलं होतं.
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे दुपारी चारच्या सुमारास मंचावर पोहोचले. तोपर्यंत मैदानात ठेवलेल्या पस्तीस हजार खुर्च्या भरल्या होत्या. याशिवाय ठिकठिकाणी लोक उभे होते.
 
मंचाजवळच एक दुसरा मंच उभारला होता. त्यावर इक्बाल यांची प्रसिद्ध कविता 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा' तसेच 'मेरे देश की धरती सोना उगले' आणि 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल' ही गाणी वाजत होती. तिथे एक लाईव्ह बँड गाणी सादर करत होता.
 
मैदानावर लावलेल्या व्हीडीओ स्क्रीन, फरशीवर टाकलेले गालिचे, 'हैं तैयार हम' लिहिलेले फुगे आणि मुख्य मंचावर काँग्रेसच्या झेंड्याच्या रंगातील कपडे यामुळे संपूर्ण तयारी काँग्रेसच्या मागील कार्यक्रमांपेक्षा वेगळी वाटत होती.
लाईव्ह बँडच्या गाण्यांमध्ये एक व्यक्ती काँग्रेसचा इतिहास, पक्षाचे नागपूरशी असलेले नाते आणि भारताच्या जडणघडणीत असलेले पक्षाचे योगदान याबद्दलची माहिती माईकवर देत होता.
 
यातच पुढे हरित क्रांती, श्वेतक्रांती, राकेश शर्मा यांचा अंतराळ प्रवास, देशभरात आयआयटीसारख्या संस्थांची स्थापना, माहिती तंत्रज्ञान क्रांती या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला.
 
पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी जवाहरलाल नेहरूंपासून मौलाना अबुल कलाम आझादपर्यंतच्या लोकांच्या तुरुंगभेटी आणि इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंतच्या हत्येबद्दलच्या गोष्टी सांगितल्या.
 
पुढे त्यांनी एक शेर वाचला, 'हम आतिशे सोज़ां में भी एक बात कहेंगे......
 
हम ज़िंदा थे, हम ज़िंदा हैं, हम ज़िंदा रहेंगे'
 
क्योंकि हम कांग्रेस हैं'
 
काँग्रेसला आपलीच कामं आठवावी लागतायत का?
मनमोहन सिंग सरकारमधील पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "या सर्व गोष्टींची आठवण करून देण्याची गरज आहे कारण नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सातत्याने आरोप करत आहेत की, गेल्या 70 वर्षांत काहीच काम झालेलं नाही."
 
बीबीसीने त्यांना विचारलं की, काँग्रेस पक्षाने भूतकाळात जे काही काम केलंय ते विस्मरणात गेलंय असं वाटतं का? आणि त्यामुळेच या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यावी लागते आहे का?
 
यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हे सर्व व्हीडीओ आणि उर्वरित साहित्य देशाच्या इतर भागातही पाठवले जाईल. जेणेकरून सर्वसामान्यांचा पक्षाकडचा ओढा आणखीन वाढेल.
 
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकांशी 'कनेक्ट' करण्यासाठी देणगी गोळा केली जात आहे.
 
काँग्रेसची शस्त्रं कालबाह्य झाली आहेत का?
राजकीय विश्लेषक रशीद किडवई सांगतात की, काँग्रेस जुनी शस्त्र घेऊन नवी लढाई लढण्याचा प्रयत्न करत आहे.
 
काँग्रेस पक्षावर लिहलेल्या '24 अकबर रोड' या पुस्तकाचे लेखक त्याच अकबर रोडचा हवाला देताना म्हणतात की, ज्या पक्षाने जानेवारी 1978 मध्ये या इमारतीत स्थलांतर केलं होतं, तो पक्ष आता जुनं कार्यालय रिकामं करून दुसऱ्या कार्यालयात स्थलांतरित होत आहे.
 
गेल्या 45 वर्षांत जग बदललं आहे. पण काँग्रेसला तेच जुने विचार आणि पद्धती घेऊन जगायचं आहे. खरं तर त्यांनी आता या गोष्टी बदलण्याची गरज आहे.
 
जुन्या गोष्टींबाबत लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. रशीद किडवई म्हणतात, "काँग्रेस जे काही करत आहे त्यात एकवाक्यता दिसत नाही. त्याच्याविषयी काही संशोधन केलेलं दिसत नाही, त्यातून राजकीय फायदा मिळणार का हे स्पष्ट नाही."
 
राहुल गांधींच्या भारत जोडा यात्रेचा संदर्भ देत ते म्हणाले की, तेलंगणाच्या विजयात या यात्रेच्या योगदानाची चर्चा झाली. पण राहुल गांधी मिझोराममध्ये गेले होते, तिथे याचा परिणाम का झाला नाही?"
 
राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'बाबत रशीद किडवई म्हणाले की, पक्षाने मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत प्रवास केला तर त्यांच्याकडे केवळ 15 जागा आहेत. पण एकूण जागा मोजल्या तर त्या 340 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पक्षाला राजकीय फायदा मिळावा यासाठी कोणतं काम केलं पाहिजे याची कोणाला कल्पना आहे का?
 
'भारत जोडो यात्रे'च्या संदर्भात हाच प्रश्न बीबीसीने लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनाही विचारला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, ईशान्येतील वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मणिपूर आणि मिझोरामला भेट देऊ शकत नाहीत.
 
असं असतानाही भाजपने मिझोराममध्ये गेल्या वेळेपेक्षा एक जागा जास्त जिंकली.
 
राहुल गांधी नेमकी कोणत्या विचारधारेची लढाई लढत आहेत?
राहुल गांधी त्यांच्या नागपूर भाषणात म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेली लढाई ही राजकीय आणि सत्तेची लढाई असल्याचं दिसत जरी असलं तरी, ही मुख्यतः विचारधारेची लढाई आहे.
 
काँग्रेसने जी स्वातंत्र्याची लढाई लढली ती केवळ इंग्रजांविरुद्धच नव्हती, तर इंग्रजांच्या भीतीने त्यांच्या सोबत गेलेल्या 500 हून अधिक राजे-राजपुत्रांच्या विरोधात होती.
वर्षानुवर्षे भारतीय ध्वज न फडकवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, आज देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, हे काँग्रेसचं योगदान आहे.
 
रशीद किडवई म्हणाले की, विचारधारेचा लढा, संविधान वाचवा या गोष्टी आजच्या पिढीला रुचत नाहीत, हे अनेकवेळा समोर आलंय.
 
केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, नरेंद्र मोदींचं सरकार हे करू शकत नाही.
 
बेरोजगारांचा प्रश्न
दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दावा केलाय की, 30 लाख सरकारी पदे रिक्त आहेत आणि त्यावर अजून कोणतीही भरती केलेली नाही.
 
काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या भाषणात 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा उल्लेख केला
 
महात्मा गांधी, लाला लजपत राय आणि मोहम्मद अली जिना यांच्यासारखे नेते त्यावेळच्या काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते.
 
यामध्ये असहकार चळवळीशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यावेळी पट्टाभी सीतारामय्या यांनी लिहिलं होतं की, "यामुळे भारतीय इतिहासातील एक नवा अध्याय सुरू झाला."
 
काँग्रेसने नागपूर सभेला 'हम तैयार हैं' महारॅली असं नाव दिलं. यामध्ये जनतेला स्वस्त गॅस, न्याय योजना, रोजगार यांसारखी आश्वासने देण्यात आली.
 
हा काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा म्हणून प्रसारमाध्यमे आणि राजकीय विश्लेषक याकडे पाहत आहेत.
 
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती