राहुल गांधी: 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस परत आणायचे आहेत'

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (09:35 IST)
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिवसावर झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली.
स्वातंत्र्याआधी भारत ज्या ठिकाणी होता, त्या काळात नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्यामुळे राहुल गांधी संघावर काय बोलतील याबाबत अनेकांचे लक्ष लागले होते.
 
"स्वातंत्र्याआधी महिलांना अधिकार नव्हते, गोरगरिबांना अधिकार नव्हते, स्पृश्य-अस्पृश्य हे भेदभाव होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील हीच विचारधारा आहे. आम्ही ती गोष्ट बदलली आणि आता पुन्हा ते बदलत आहेत. ज्या ठिकाणी आधी भारत होता तिथेच नेण्याचे प्रयत्न होत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले.
 
"केवळ दोन-तीन उद्योगपतींकडे पैसा वळवला जात आहे. ज्या समुदायांची संख्या भरपूर आहे त्यांना कुठेही प्रतिनिधित्व मिळत नाही," असे राहुल गांधींनी म्हटले.
 
राहुल गांधी पुढे म्हणाले,
 
"देशात विचारधारेची लढाई सुरू आहे, लोकांना वाटतं की ही राजकीय लढाई आहे, सत्तेसाठीची लढाई आहे ती आहे पण या लढाईचा पाया विचारधारेचा आहे.
 
"दोन विचारांची ही लढाई आहे. एनडीए आणि युपीएमध्ये अनेक पक्ष आहेत.
 
'मला हे सहन होत नाहीये असं एक खासदार म्हणाला तेव्हा'
काही दिवसांपूर्वी भाजपचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. भाजपचे अनेक खासदार आधी काँग्रेसमध्ये होते, हे पण काँग्रेसमध्ये होते. मला ते लपून भेटले आणि मला लांबून बघूनच ते माझ्याकडे घाबरत घाबरत भेटायला आले. आणि म्हणाले की मला तुमच्याशी बोलायचं आहे.
 
मी म्हणालो की तू काँग्रेसमध्ये आहेस काय बोलायचं आहे? त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत होती. मी विचारलं सगळं ठीक तर आहे.
 
तर तो म्हणाला नाही, राहुलजी आता भाजपमध्ये राहून सहन होत नाहीये. मी भाजपमध्ये आहे पण माझ्या हृदयात काँग्रेस आहे.
 
राहुल गांधी पुढे सांगू लागले, मी म्हणालो तुम्ही खासदार आहात, तुमचं मन तिथे का रमत नाहीये? तर म्हणाला की, राहुलजी भाजपमध्ये गुलामी करावी लागते. वरिष्ठ जे सांगतात ते कसलाही विचार न करता ऐकावं लागतं, करावं लागतं आमचं कुणीही ऐकत नाही. वरून आदेश येतो म्हणजे आधी ज्या पद्धतीने राजा आदेश द्यायचा त्याच पद्धतीने भाजपमध्ये काम करावं लागतं. तिथे तुमच्या आवडण्या न आवडण्याचा प्रश्न नसतो."
 
'नाना पटोलेंनी प्रश्न विचारला आणि...'
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपला सोडून का जावे लागले याबाबत राहुल गांधी म्हणाले, "आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला होता की जीएसटीमध्ये शेतकऱ्यांचा किती हिस्सा असेल. मोदींना त्यांचा प्रश्न आवडला नाही आणि पटोले यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांची विचारधारा राजेशाहीची विचारधारा आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
 
"आमच्यातला छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता मोठ्या नेत्यांना प्रश्न विचारू शकतो. आमचे कार्यकर्ते माझ्यासमोर येऊन मला म्हणू शकतात की राहुलजी तुम्ही केलेलं हे काम मला आवडलं नाही. मग मी त्यांना मी तसं का केलं ते सांगतो, मी त्यांचं लक्ष देऊन ऐकतो. त्यांचा आवाज, त्यांच्या मतांचा मी आदर करतो. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो.
 
"लोक म्हणतात की काँग्रेसने काय केलं? स्वातंत्र्य मिळण्याआधी जर तुम्ही या देशात आला असता तर तुम्हाला दिसलं असत की या देशात पाचशे ते सहाशे राजे राजवाडे होते, इंग्रज होते, राजांना तोफांची सलामी दिली द्यायची पण सामान्य माणसाला या देशात एकही अधिकार नव्हता," असं राहुल गांधी म्हणाले.
 
'भाजपला राजेशाही परत आणायची आहे'
राहुल गांधी म्हणाले भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजेशाही आणायची आहे.
 
"बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरूंनी रक्त सांडून संविधान बनवलं. भाजप आणि संघ संविधानाच्या विरोधात होते. आज हे लोक तिरंग्याला सलामी देतात. यांनी अनेकवर्ष राष्ट्रध्वजाला राष्ट्रध्वज मानलं नाही.
 
"भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की प्रत्येकाला एका मताचा अधिकार देण्यात आला. भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधान एक मत देतं. हे काँग्रेसने केलं.
 
"महात्मा गांधी, नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला आणि हे संविधान भारताला दिलं. आमची विचारसरणी सांगते की या देशाची धुरा सामान्य भारतीय नागरिकांच्या हातात असायला हवी. आधीच्या काळातली राजेशाही आता असू नये असं आम्हाला वाटतं.
 
"स्वातंत्र्याची लढाई सामान्य माणसांनी लढली होती, राजा महाराजांनी इंग्रजांसोबत भागीदारी केली होती. भाजप पुन्हा एकदा भारताला राजेशाहीत ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.
 
"भाजप भारताला इतिहासात घेऊन जात आहे. संविधानाने, तुमच्या मतांनी या देशातील वेगवगेळ्या संस्था बनतात. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग या तुमच्यासाठी बनलेल्या संस्था आहेत आणि भाजप त्यांच्यावर ताबा मिळवत आहेत.
 
"भारतातील सगळ्या विद्यापीठांमध्ये एकाच संघटनेचे कुलगुरू आहेत. भारताचे कुलगुरू गुणवत्तेवर बनत नाहीत. तुम्ही केवळ एका संघटनेचे सदस्य असाल तर कुलगुरू बनवलं जातं," असं राहुल गांधी म्हणाले.
 
'देशात अनेक समस्या आहेत'
आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, "देश चालवणाऱ्या सगळ्या संस्था हस्तगत केल्या जात आहेत. असं म्हटलं जायचं की माध्यम लोकशाहीचे रक्षण करतात. पण तुम्हाला वाटत का मी प्रसारमाध्यमं त्यांचं काम करत आहेत का?
 
"माध्यमं त्यांचं मत मांडू शकत नाहीत, पत्रकार बोलू शकत नाहीत. देशातील सगळ्या संस्थांवर ताबा मिळवला आहे. सीबीआय, ईडी यांचा दबाव आहे.
 
"आम्ही देशातल्या लोकांना देशाची ताकद परत देऊ इच्छित आहोत. देशाची शक्ती देशाला परत मिळवून द्यायची आहे. लोक म्हणतात की काँग्रेसने धवल क्रांती केली पण ही क्रांती आनंदच्या महिलांनी सुरू केली आणि देशातल्या महिलांनी धवल क्रांती केली.
 
"हरित क्रांती शेतकऱ्यांनी केली. आयटीमधली क्रांती देशातल्या तरुणांनी केली. काँग्रेसने मदत केली, दिशा दिली पण तरुणांनी ते केलं. आता मी तुम्हाला विचारतो की मागच्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी किती लोकांना रोजगार दिला. मागच्या चाळीस वर्षांतली सगळ्यांत जास्त बेरोजगारी सध्या आहे. देशातल्या करोडो युवकांची ऊर्जा वाया जात आहे.
 
"आजकाल भारतातले तरुण सात ते आठ तास मोबाईलवर घालवत आहेत. देशातल्या तरुणांची ऊर्जा वाया जात आहे. एकीकडे शेतकरी, तरुणांवर आक्रमण केलं जात आहे आणि दुसरीकडे दोन ते तीन उद्योगपतींना सगळा देश दिला जात आहे.
 
"काही दिवसांपूर्वी काही तरुण माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला अग्नीवर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेतलं गेलं होतं. दीड लाख तरुणांना हवाई दल आणि लष्कराने स्वीकृती दिली होती, हे तरुण शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाले होते. मोदी सरकारने अग्नीवर योजना लागू केली आणि या दीड लाख तरुणांना नोकऱ्याच दिल्या नाहीत. ते तरुण माझ्यासमोर रडत होते. त्यांच्या डोळ्यात आश्रू होते आणि म्हणत होते की सरकारने आमचं आयुष्य संपवलं.
 
"आमची थट्टा केली जाते, गावात आम्हाला खोटे सैनिक म्हणून चिडवलं जातं. या दीड लाख तरुणांना बाहेर फेकलं आणि म्हणतात की आम्ही देश बदलत आहोत," असं राहुल यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
 
मागासवर्गाला प्रतिनिधित्व का नाही?
राहुल गांधी म्हणाले,
 
"या देशातली सगळी संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात जाते. भारताला नव्वद लोक चालवतात. आयएएस अधिकार संपूर्ण निधीचं वाटप करतात, मी संसदेत विचारलं की या नव्वद शीर्ष अधिकाऱ्यांमध्ये इतर मागास वर्गातले, दलित वर्गातले आणि आदिवासी वर्गातले लोक किती आहेत. या देशात पन्नास टक्के ओबीसी आहेत.
 
"नव्वदीपैकी केवळ तीन अधिकारी ओबीसी होते. हे कसलं ओबीसी सरकार. ओबीसी अधिकाऱ्यांना कोपऱ्यात बसवून छोट्या खात्यांचा प्रभार दिला जातो.
 
"भारतातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांची यादी करा आणि त्यांच्या मालकांमध्ये ओबीसी, दलित आदिवासी किती आहेत हे दाखवून द्या. या देशात ओबीसी पन्नास, दलित पंधरा आणि आदिवासी बारा टक्के आहेत आणि तुमचं प्रतिनिधित्व कुठेच नाही? सर्वोच्च कंपन्यांमध्ये इतर मागास वर्ग, दलित आणि आदिवासी कुठे काम करतात हे दाखवून द्या," असं राहुल म्हणाले.
 
जातनिहाय जनगणना व्हायला हवी
जात जनगणना व्हायला हवी हा मुद्दा पटवून देताना ते म्हणाले,
 
"प्रत्येक क्षेत्रात काही समुदायांना प्रतिनिधित्व मिळतच नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणालो की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. देशाला माहिती व्हायला पाहिजे की या देशात ओबीसी किती आहेत? त्यानंतर नरेंद्र मोदींची भाषणं बदलली, माझ्या मागणीनंतर ते म्हणाले की भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीब. जर असं असेल तर पंतप्रधान तुम्ही ओबीसी कसे बनलात.
 
"आमचं सरकार आलं तर आम्ही जातनिहाय जनगणना करू. मी जे सुरुवातीला म्हणालो की ही विचारसरणीची लढाई आहे. करोडो लोकांना भाजप सरकारने गरिबीत ढकललं आहे. मनरेगाच्या माध्यमातून केलेलं काम या लोकांनी वाया घातलं.
 
"आम्हाला दोन भारत नको जिथे एका भारतात उद्योगपती, पत्रकार आणि जो स्वप्नातला भारत असेल ज्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. भारतातील तरुण सोशल मीडियाच्या जीवावर जगू शकत नाहीत. त्यांना रोजगार हवा आहे आणि हे भाजप करू शकत नाही तर काँग्रेसचं करू शकतं.
 
"हे करण्यासाठी द्वेष संपवून या देशाला एकसंध करावं लागेल आणि पुढे जावं लागेल. कन्याकुमारी ते काश्मीर असा चार हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही केला. आम्ही मोहब्बत की दुकान सुरु केली.
 
"जर तुमच्या हृदयात भारताच्या लोकांसाठी प्रेम असेल, द्वेषाच्या जागी तुमच्या मनात प्रेम असेल तर तुम्ही काँग्रेसी आहात. मी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना विशेष करून सांगू इच्छितो की मी भारत जोडो यात्रेदरम्यान ज्या क्षणी महाराष्ट्रात आलो त्यावेळी मी विचार केला की महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. काँग्रेसची लढाई महाराष्ट्रातून सुरू झाली होती म्हणून आज आम्ही नागपूरला आलो आहोत.
 
"तुम्हाला कुणालाही घाबरण्याची गरज नाही तुम्ही बब्बर शेर आहात. तुम्ही आणि आम्ही मिळून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात निवडणूक जिंकणार आहोत.," असं राहुल गांधी म्हणाले.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती