ग्रहण लवकर सुटणार, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार संजय राऊत

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (16:22 IST)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. संजय राऊत यांनी त्यांची भूमिका सामना आणि पत्रकार परिषदेत ठेवली आहे. शिवसेना अजूनही नमती भूमिका घ्यायला तयार नसून, मुख्यमंत्रीपदच हवे अशी मागणी शिवसेना करत आहे. यावर परत एकदा राऊत यांनी आपले मत व्यक्त केले असून, म्हणाले की ‘शपथग्रहण होणार आहे. महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटणार असून, शपथग्रहण ही कुणाची ‘मोनोपॉली’ नाही. राज्याला मुख्यमंत्री मिळावा हा महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकारच आहे. त्यामुळे शपथग्रहण होणारच आणि मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार’, अशा खणखणीत शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला. 
 
या २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती जैसे थे असून, लवकरच मागच्आया सरकारचा कार्हेयकाळ अधिकृतरीत्या संपणार आहे. सत्तास्थापनेसंदर्भात प्रत्येक पक्ष ‘वेट अँड वॉच’ अशा भूमिकेत आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात शिवसेनेची भूमिका समोर अधोरेखित केली आहे. 
 
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली, ते म्हणाले ‘महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चेहरा बदलत आहे. तुम्ही ज्याला हंगामा म्हणतात तो हंगामा नाही. न्याय, सत्य आणि अधिकाराची लढाई आहे. विजय आमचाच होईल, लवकरच सरकार स्थापन होईल’, राज्यातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता आपापल्या पद्धतीने हालचाल करणारच. ज्या प्रकारचा जनादेश महाराष्ट्रात मिळाला आहे त्यामध्ये प्रत्येक पक्षाची एक भूमिका आहे. कुठल्याही एकाच पक्षाची भूमिका असं चित्र आता नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इतकंच काय तर एक एक अपक्षाचीही भूमिका महत्त्वाची असल्याचंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना माघार घेणार नाही असे चित्र सध्या आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कोणतेही मत व्यक्त करणार नाही असे म्हटले होते तर भाजपा नेते यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती