‘वाघाच्या गळ्यात घड्याळ आणि हातात कमळ’, शिवसेना नेते संजय राऊत यांचे ट्विट

शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (15:17 IST)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्यंगचित्राला शेअर करताना म्हटलं आहे की, व्यंग चित्रकाराची कमाल! बुरा न मानो दिवाली है. व्यंगचित्रात वाघाच्या हातात कमळाचे फूल दाखवण्यात आलं असून त्याच्या गळ्यातील घड्याळाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
 
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार पुन्हा येणार असलं तरी दोन्ही पक्षांनी गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नसल्यामुळे आता पुन्हा त्यांना शिवसेनेच्या भूमिकेवर पुढची वाटचाल करावी लागणार आहे. यात शिवसेना म्हणेल तसं सरकारला चालावं लागेल. सध्या दोन्ही पक्षांमध्ये 50-50 फॉर्म्युल्यावर चर्चा होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असलं तरी भाजप पक्षकश्रेष्ठी काय निर्णय घेता या कडे अवघा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 
सध्या राज्याच्या राजकारणात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देतील अशी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्राचा अर्थ काय? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. शिवसेना नेहमीच स्वत:ला वाघ म्हणून दाखवत असते. तर त्या वाघाच्या गळ्यात दाखवलेलं घड्याळ हे राष्ट्रवादीचं चिन्ह आहे. दुसरीकडे हातात भाजपचे चिन्ह कमळ दाखवलं आहे.
 
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेसोबत सत्ता नाहीच असं स्पष्ट केलं आहे. परंतु भाजपकड़े बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. जर भाजपने मनाप्रमाणे सत्तेत वाटा दिला नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असा इशारा तर राऊत यांनी दिला नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळांनी मात्र आज मुख्यमंत्रीपदासह सेनेला सत्तेसाठी ऑफर दिली आहे, कदाचित त्यामुळेच शिवसेनेने भाजपवर दबाव तंत्र म्हणून हे ट्विट असल्याची चर्चा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती