भाविकाच्या घरातून महाराजांनी लांबवीले २१ लाख रुपये

गुरूवार, 14 मार्च 2024 (09:51 IST)
आळंदी येथील परिचित एका महाराजाने त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने भाविकाच्या घरातून 21 लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना जेलरोड येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रामदास सुदाम दोडके (रा. भैरवनाथनगर, जेलरोड, नाशिकरोड) हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते पत्नी व दोन मुलांसह राहतात. दरम्यान, दोडके यांच्या मुलीचे लग्न ठरले असून, त्यांनी लग्नासाठी नातेवाईक व काही मित्रांकडून पैशांची जमवाजमव सुरू केली होती. व ते पैसे घरातील एका लाकडी कपाटात ठेवत होते. मुलीच्या लग्नानिमित्त दोडके हे कुटुंबियांसह नोव्हेंबर 2023 मध्ये देवदर्शनासाठी जेजुरी, आळंदी येथे गेले होते. त्यादरम्यान आळंदी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथे गोपाल महाराज व त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याशी परिचय झाला. त्यानंतर गोपाल महाराज याने फिर्यादी दोडके यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला.
 
त्यानंतर महाराजांनी दोडके यांना प्रसाद म्हणून 2 हजार रुपये दिले. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये गोपाल महाराज व त्याच्या सहकाऱ्याने दोडके यांना फोन करुन सांगितले की, आम्ही पंचवटी येथे आलो आहोत, त्यानंतर फिर्यादी दोडके हे त्यांना भेटण्यासाठी रामकुंड येथे गेले. त्यावेळी गोपाल महाराज यांनी फिर्यादी दोडके यांना प्रसाद म्हणून पुन्हा 5 हजार रुपये दिले. त्यानंतर दोडके यांनी त्यांना रिक्षाद्वारे घरी घेऊन आले. त्यानंतर पुन्हा आडगाव नाका येथे सोडून दिले.
 
दरम्यान त्यानंतर महाराजांचे दोडके यांच्याशी नेहमी फोनवर बोलणे सुरू झाले. 7 मार्च 2024 रोजी दुपारी 12 ते साडेबारा वाजेच्या सुमारास गोपाल महाराज यांचा फिर्यादी दोडके यांना फोन आला. आम्ही 9 मार्च रोजी नाशिकरोड येथे येत आहोत. तुम्ही आम्हाला नेण्यासाठी या आपण सर्व मिळून त्र्यंबकेश्वर येथे जाऊ व परत येताना तुमच्या मुलीला आशीर्वाद देऊन आळंदीला जाऊ असे सांगितले.
 
त्यानंतर दोडके हे दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांची मनमाड येथील मेव्हणी मयत झाल्याने तिच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांना मनमाडला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी गेले. त्याचवेळी गोपाल महाराज याचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की आम्ही एक तासात नाशिकरोडला पोहोचत आहोत. त्यामुळे फिर्यादी दोडके हे नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ थांबून महाराजांची वाट पाहू लागले. तेव्हा सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोपाल महाराज व त्याचा सहकारी हे शिवाजी पुतळ्याजवळ आले. त्यानंतर दोडके यांनी त्यांना रिक्षाने त्र्यंबकेश्वर येथे नेले.
 
त्र्यंबकेश्वर येथे दर्शन आटोपल्यानंतर ते सर्व जण रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास दोडके यांच्या घरी आले. त्यानंतर गोपाल महाराज घरात आले. त्यांनी सांगितले की, आम्ही अंघोळ करतो तो पर्यंत तुम्ही नारळ व दूध पिशवी घेऊन या असे दोडके यांना सांगितले. त्यानुसार दोडके हे जवळच असलेल्या किराणा दुकानात नारळ व दुध पिशवी घेण्यासाठी गेले. नारळ आणि दुध पिशवी घेऊन दोडके हे घरी आले असता त्यांना घरामध्ये गोपाल महाराज व त्याचा सहकारी दिसून आले नाही.
 
त्यानंतर त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला. पण गोपाल महाराज आणि सहकारी सापडला नाही. मग दोडके यांना संशय आल्याने त्यांनी बेडरूमध्ये असलेले लाकडी कपाट उघडून पाहिले असता त्या कपाटात मुलीच्या लग्नासाठी नातेवाईक व मित्रांकडून जमा केलेले 21 लाख रुपये कपाटातून चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर दोडके यांनी गोपाल महाराज याला फोन केला असता त्याने तो फोन उचलला नाही. थोड्या वेळाने पुन्हा फोन केला असता तो फोन स्वीच ऑफ असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दोडके यांनी ही बाब कुटुंबियांना फोनवरून कळवली.
 
अखेर गोपाल महाराजने आपल्या घरातून चोरी केल्याची बाब लक्षात आल्याचे समजताच दोडके यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गोपाल महाराज व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती