होळी, धूलिवंदन व रंगपंचमी अत्यंत साधेपणाने साजरा करा, शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

शनिवार, 27 मार्च 2021 (08:15 IST)
कोविड-19 च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. यावर्षी होळी, धूलिवंदन व रंगपंचमी चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
 
या संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. होळी/शिमगा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी  कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तो देखील साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
अनेक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. 
 
होळी/शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
 
होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
 
कोविड-19 च्या विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती