आता मनसेकडून प्रत्युत्तर, 'मधुशाला’ मधली ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी

शनिवार, 25 एप्रिल 2020 (16:18 IST)
'सामना'च्या अग्रलेखातून राज ठाकरेंना चिमटे काढल्यानंतर आता मनसेकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 
 
मैं किस पथ से जाऊँ ? असमंजस हैं भोलाभाला......
खूप दिवस झाले... हल्ली कुणीच विचारत नाही मला !!!!
‘मधुशाला’ मधली ही ओळ खास बोल बच्चन राऊतसाठी. 
नागू सयाजी वाडीत बसून शब्दांचे बुडबुडे काढणारे संजय राऊत हे सध्या आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही या भावनेने पछाडलेले दिसतात. अन्यथा राजसाहेबांनी केलेली सूचना त्यांच्या कार्यकारी टाळक्यात शिरली असती. वेळ काय आणि यांचं चाललंय काय? 
 
डाईन, वाईन वगैरे शब्दांचे खेळ करत लॉकडाऊनमध्ये वेळ बरा जाण्यापलिकडे फार काही निष्पन्न होणार नाही. राजसाहेबांनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना राजसाहेब यांनी केली, हे या रडतराऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. 
 
त्यामुळेच राजसाहेबांच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा. आणखी एक, तुमचे संकटमोचक अजित पवारांनीही हीच मागणी करणारे पत्र देशाच्या प्रधानमंत्र्यांना लिहीले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असेच विधान काही दिवसांपूर्वी केले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवण्याची हिंमत या बोरूबहाद्दराला झाली नाही, की मालकांची भीती वाटली? बोला रडत राऊत बोला!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती