2019 ची निवडणूक लढणार नाही : उमा भारती

बुधवार, 5 डिसेंबर 2018 (12:25 IST)
केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचे दीड वर्ष निवडणुकीऐवजी राम मंदिर निर्माण आणि गंगा नदीच्या स्वच्छतेवर आपण सर्व लक्ष केंद्रित करणार, अशी घोषणा उमा भारती यांनी केली.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मी माझ्या या निर्णयाबाबत 2016 मध्ये चर्चा केली होती. मात्र, तेव्हा त्यांनी मला राजीनामा देण्यापासून रोखले होते. आताही माझा अंतिम निर्णय पक्षावरच अवलंबून असेल, मात्र पुढचे दीड वर्ष राम मंदिराची उभारणी आणि गंगेच्या स्वच्छतेसाठी देण्याचा माझा मानस असल्याचे भारती यांनी पत्रकारांना सांगितले. उमा यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राममंदिराबाबत मतप्रदर्शन केले आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. त्यात फायदा आणि तोट्याचा विचार करता येणार नाही. हा विषय आता आंदोलनाने नाही तर चर्चेतून सोडवायला हवा. राम मंदिराबाबत अध्यादेश आणायचा असेल तर काँग्रेसलाही त्यास पाठिंबा द्यावा लागेल. काँग्रेसने जबाबदारीने वागायला हवे. कारण काँग्रेसनेच राम मंदिरावरून वातावरण गढूळ करण्याचे काम केले आहे, असा आरोप उमा यांनी केला.
 
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेकडून राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्याची मागणी सातत्याने केली जात असताना राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेत्या उमा भारती यांनीही तोच सूर आळवल्याने केंद्र सरकारवरील दबाव वाढू लागला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती