हो चिरायू, हो अमर...

©ऋचा दीपक कर्पे

मंगळवार, 5 मे 2020 (15:28 IST)
तुझ्याच माणसांच्या सहवासात
तुझ्याच घरात राहून ही
तू केवढा अस्वस्थ झाला
तुझ्याच मर्जीने वागून ही
 
विचार कर त्या पक्ष्यांचा
ज्यांचे पंख छाटून
केलेस पिंजऱ्यात कैद 
फक्त एक पाण्याची वाटी
अन् धान्याचे चार दाणे देऊन
 
वनात स्वच्छंद बागडणाऱ्या
त्या निरागस मूक प्राण्यांचे
स्वातंत्र्य हिरावून
तू कोंडून ठेवलेस त्यांना
बळजबरीने खूप लांब
त्यांच्या आप्तेष्टांपासून
 
फक्त स्वसुखासाठी 
त्यांचे आश्रय उध्वस्त केले
विषारी रसायने मिसळली निसर्गात
स्वतःसाठीच जगत आहेस
गर्वाने तू स्वतःच्याच तोऱ्यात
 
स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या
अरे तुच्छ मानवा ! 
निसर्ग तरी दयाळू आहे
इवलासा विषाणू पाठवून
तुला तुझी लायकी दाखवली
तुला तुझ्याच घरात बंदिस्त करून
एक लहानशी अद्दल घडवली
 
ही ताकीद समज तुझ्या भवितव्याची
स्वतःला अजूनही सावर 
फक्त कण आहेस तू
अनंत ब्रह्मांडाचा
आतातरी स्वतःला आवर
नाहीतर पुसले जाईल
इतिहासाच्या पानांवरून नाव तुझे
तुझं संपूर्ण अस्तित्व मिटेल
होता मनुष्य नावाचा 
एक स्वार्थी अभिमानी प्राणी
फक्त एवढीच तुझी ओळख उरेल...
 
तू बल बुद्धीच्या धारक
परमेश्वराची अनुपम कृती
किती धावणार?
जरा थांब क्षणभर..
प्राण्यांवर दया करून
निसर्गावर प्रेम करून
नमन करून त्या परम शक्तीचे
हो चिरायू हो अमर
हो चिरायू हो अमर....... 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती