"देवं तारी त्याला कोण मारी"

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (14:49 IST)
एकदा राजा अकबर आणि त्यांचे मंत्री बिरबल आखेटाला जाण्याचा विचार करीत असतात. तलवार काढत असताना राजा अकबरांचा अंगठा कापला जातो. ते एकाएकी कापलेला अंगठा बघून विव्हळू लागतात आणि रडायला लागतात. ते बघून बिरबल त्यांना म्हणतो की राजन वाईट वाटून घेऊ नका "जे होतं ते नेहमीच चांगल्यासाठीच होतं." 
 
राजा मनात विचार करतो की हा असा कसा माझा हितेषी आहे माझा एवढा अंगठा कापला गेला आणि तरी हा म्हणत आहे की "जे होतं चांगल्यासाठी होतं " राजाला बिरबलाचा फार राग येतो आणि तो आपल्या शिपायांना हाक मारतो आणि त्यांना सांगतो की या बिरबलाला कारागृहात टाका. आणि मी आखेटाला जाऊन आल्यावर याला फाश्यावर द्या. असे म्हणत राजा अकबर आखेटाला निघून जातात आणि बिरबलाला कोठडीत डांबून ठेवण्यात येतं. 
 
 
 
आखेटावर गेलेला राजा घनदाट अरण्यात शिरतो. तेवढ्यातच त्याला काही रानटी लोकं बंदिस्त करतात आणि आपल्या गटाच्या प्रमुखांकडे नेतात. गटप्रमुख राजाची बळी देण्याचा निर्णय देतात. बळी देण्यासाठी राजाला नेत असतांना त्या रानटी लोकांचं लक्ष्य त्याचा कापलेल्या अंगठ्याकडे जातं. ते गट प्रमुखाला याची सूचना देतात. गट प्रमुख त्याला सोडण्याचा आदेश देतो. त्यामागील कारण असे सांगतो की बळी देण्यासाठी हा माणूस पूर्ण नाही. अर्थात ह्याचे शरीरातील अवयव संपूर्ण नाही. त्यामुळे हा बळी देण्यासाठी अपात्र आहे. असे म्हणून तो अकबराला मुक्त करून जाण्यास सांगतो. तेवढ्याच राजाला बिरबलाची गोष्ट आठवते महाराज जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याला बिरबलाच्या फार हेवा वाटू लागतो. त्याला बिरबलाच्या बरोबर केलेल्या दुर्व्यव्हाराचे वाईट वाटू लागते. 
 
तो वेळ न घालवता राज्यात जाऊन थेट बिरबलाकडे जातो आणि त्याची माफी मागतो,आणि घडलेलं सांगतो. त्यावर बिरबल उत्तर देतो की महाराज मी आपणांस म्हटलं होतं  की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते तंतोतंत खरचं आहे. आणि जे आपण माझ्यासाठी केलं त्यात देखील माझ्यासाठी चांगलच होतं. ते कसे काय विचारल्यावर बिरबल म्हणतो की महाराज जर का आपण माझ्यावर रागावून मला कोठड्यात बंदिस्त केलं नसते तर कदाचित त्यावेळी त्यांनी माझी बळी दिली असती. कारण मी आपल्या बरोबर असतो. त्यावर अकबराला देखील बिरबलाच म्हणणं पटतं. ते बिरबलाचं कौतुक करतात आणि बिरबलाला मुक्त करण्यास सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती