सिंह आणि ससा

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (14:24 IST)
एका जंगलात एक सिंह राहत होता. दररोज तो मनाला वाटेल तितकी जनावरे मारून खायचा. त्याच्या अशा कृत्यामुळे जंगलात एकही प्राणी शिल्लक राहणार नाही अशी भीती जंगलातल्या सर्व जनावरांना वाटू लागली. म्हणून जंगलातले सर्व प्राणी सिंहाकडे गेले आणि विनंती करू लागले की महाराज दररोज आपली गरज फक्त एकाच प्राण्यापुरती असताना आपण इतर प्राण्यांचा जीव का घेता? आपल्याला त्रास नको म्हणून आम्ही ठरवल्याप्रमाणे दररोज एक जनावर आपल्यासमक्ष स्वत: येईल ज्याने आपली भूकही शमेल आणि आपल्याला शिकार करण्याची गरज भासणार नाही.
 
आळशी सिंहाला हे पटले आणि त्यांनी या शर्यतीला होकार दिला की मी बसल्या ठिकाणी एक प्राणी दररोज मिळाला पाहिजे नाहीतर कोणाचीही खैर नाही. सर्व प्राण्यांनी मान हालवली आणि ठरल्याप्रमाणे दररोज एक प्राण्यास सिंहाकडे पाठवण्यास सुरुवात केली. आधी वयस्कर, जगण्याला कंटाळलेले, दु:खी आणि कष्टी प्राणी पाठवण्यात आले आणि नंतर धष्टपुष्ट प्राण्याचा बळी जाऊ लागला. सर्व प्राणी घाबरू लागले. 
 
अशात एका सस्यावर सिंहाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा त्याने विचार केला की दररोज एका प्राण्याचा बळी देण्यापेक्षा सिंहाचा खात्मा केला तर...? असा विचार करत जात असताना त्याला रस्त्यात एक विहीर दिसली आणि त्यात त्याने झाकून बघितले. डोक्यात कल्पना सुरू झाल्या आणि तो उशिरा सिंहाकडे पोहचला. 
 
तोपर्यंत सिंह भुकेने व्याकुल झाला होता त्याने रागाच्या भरात सस्याला बघून म्हटले- कुठे होतास इतक्या वेळ? माझ्याकडे येण्यात इतका उशीर आणि तू एवढासा ससा माझ्या दाढीला देखील पुरणार नाही...आता याची शिक्षा मिळालीच पाहिजे आधी तुला संपतो मग वनात असलेल्या इतर प्राण्यांना..
 
हे ऐकून ससा घाबरतो पण मग हळूच म्हणतो- महाराज, मला वेळ झाला त्याचं कारण जाणून आपणही हैराण व्हाल...महाराज, मी ठरल्याप्रमाणेच येत होतो पण रस्त्यात एका विहिरीतून मला धमकावण्याच्या आवाज विचारण्यास आलं की कुठं चाललास? 
 
तेव्हा मी सांगितलं की सिंह महाराजाकडे. पण त्याने महाराज शब्द ऐकताच आणखीच गर्जना केली आणि म्हणाला मीच या जंगलाचा राजा आहे, तू ज्याच्याबद्दल बोलत आहे तो तर असाच कोणी बहुरुपिया असणार.. 
 
सस्याचे बोलणे ऐकून सिंह चवताळला, कुठे आहे तो दाखव... मी आज त्याला ठारच मारतो..कारण मीच राजा आहे...
 
ससा त्याला विहिरीपाशी नेतो आणि वाकून बघायला सांगतो.... तर त्यात सिंहाला स्वत:चा प्रतिबिंब दिसतो..हे बघून तो मोठी गर्जना करतो तर त्या गर्जनेचा प्रतिध्वनी विहिरीतून आल्याने अजूनच चिडतो आणि रागाच्या भरात विहिरीत उडी मारतो आणि पाण्यात बुडून मरतो. 
 
नंतर लगेच ससा वनात असलेल्या आपल्या सर्व मित्रांना ही गोष्ट कळवतो आणि सर्व प्राणी आनंदात राहू लागतात.
 
तात्पर्य: अनेकदा शक्तीपेक्षा युक्तीच श्रेष्ठ ठरते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती